03 January, 2012

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक १०५

श्लोक १०५
यज्ञभृद्यज्ञकृत यज्ञी यज्ञभुग्यज्ञसाधनः 
यज्ञान्तकृद्यज्ञगुह्यन्नमन्नाद एवच  ।।
(९७) यज्ञभृत् :  - यज्ञाचे अनुशासन करणारा. जो स्वार्थरहित समर्पित भावनेने केलेली सेवारूप सत्कर्मे (यज्ञ) करण्यामध्ये आपल्याला मदत करतो व पूर्णतेला नेतो तो यज्ञभृत् श्री नारायणच होय.
(९७) यज्ञकृत् :  - यज्ञ करणारा. किवा दुसरा अर्थ यज्ञ नष्ट करणारा. यज्ञ म्हणजे स्वार्थरहित मनाने भगवंतावरील पूर्ण श्रद्धेने, प्रेमाने व आनंदाने केलेली सेवारूप सत्कर्मे.[1] भगवंत स्वतः सर्व सृजनकर्म याच यज्ञभावनेने करत असतो. व याच यज्ञाचा शेवटही विलयरूपाने तोच घडवून आणतो. म्हणूनच तो 'यज्ञकृत्' आहे. या संज्ञेचा दुसरा अर्थ होईल सज्जनांचा यज्ञ (सत्कर्मे) तो पूर्ण करतो व दुर्जनांचे कर्म नष्ट करतो म्हणून तो यज्ञकृत् आहे.
(९७) यज्ञी :  - सतत चालणार्‍या यज्ञांचा तो नित्य भोक्ता आहे असा. ज्याअर्थी सर्व यज्ञामध्ये सर्व क्रिया नारायण केंद्रित व नारायण समर्पित होतात त्याअस्र्थी तोच 'यज्ञी' आहे, यज्ञाचा भोक्ता आहे.
(९७) यज्ञभुक् :  - यज्ञाच्या अग्निमध्ये जे जे समर्पित केले जाते व ज्या ज्या देवतांना आदरांने व आनंदानें आवाहन केले जाते ते सर्व नारायणास जावून मिळते. कारण तोच सर्व देवतांचे रूप धारण करीत असल्याने त्याचे सर्व हविर्भाव नारायणासच समर्पित होतात.
(९८०) यज्ञसाधन :  - जो सर्व यज्ञ पूर्ण करतो तो. त्याच्याच कृपेने सर्व प्रामाणिक व अंतःकरणपूर्वक केलेली सत्कर्मे अत्यंत सुयश प्राप्त करतात.
(९८) यज्ञान्तकृत् :  - जो यज्ञाचे शेवटी केले जाणारे कर्म म्हणजेच पूर्णाहूती जो पूर्ण करतो तो यज्ञान्तकृत्. यज्ञाचे शेवटी पूर्णाहूती देतांनां श्रीनारायणासच अनन्यतेनें व श्रद्धेनें आवाहन केले जाते या पूर्णाहुतीखेरीज यज्ञाची समाप्ती होत नाही. म्हणून श्रीहरिच पूर्णाहुतीरूप होतो. जेव्हा सर्व कर्मे त्याच्या सर्व साधनांसहित पूर्णपणे यज्ञांत समर्पित केली जातात तेंव्हाच आत्मस्वरूप नारायणाच्या दिव्य सौंदर्याचा साक्षात्कार घडून येतो.
     कांही टीकाकार यज्ञान्त शद्बाचा पूर्णाहुती असा अर्थ करीत नाहीत. तर अन्त म्हणजे शेवटी मिळणारे फल. अर्थातच या संज्ञेचा त्यांनी दिलेला अर्थ होईल 'हरि समर्पित अशा निस्वार्थी, प्रेमळ सेवायुक्त कर्माचे फल देणारा तो परब्रह्मस्वरूप श्रीनारायण
(९८) यज्ञगुह्यम् :  - सर्य यज्ञामध्ये ज्या परमसत्याचा साक्षात्कार होतो तो आहे 'श्री नारायण'. देहकुंडामधील ज्ञानाग्नीमध्ये (जाणीवेमध्ये) सर्व विषय द्रव्यांचे हवन केल्यानंतर ज्या आत्मस्वरूपाची प्राप्ती होते तेच हे परमगुह्य होय. हा व्यष्टिमध्ये होणारा यज्ञ गीतेमध्ये 'ज्ञानयज्ञ' म्हणून संबोधिला आहे. वेदांमध्ये यालाच ब्रह्मयज्ञ म्हटले आहे.[2]
(९८) अन्नम् :  - जो स्वतः अन्नस्वरूप झाला आहे तो श्रीनारायण. इंद्रियांचे विषय हा इंद्रिंयाचा आहार होय. (अन्न) ही संज्ञा क्रियापद स्वरूप समजल्यास प्रलयाचेवेळी सर्व विश्वाला जो खाऊन टाकतो तो नारायण. आपण झोपलो असता जसे आपले विश्व आपल्यामध्ये लीन होते त्याप्रमाणे प्रलयाचे वेळी सर्व विश्व त्याचेमध्ये विलीन होते. ज्याचेमध्ये सर्व नामरूपात्मक विश्व बीजरूपाने स्थित होते तो परमआत्मा नारायण अन्नस्वरूप आहे.
(९८) अन्नादः :  - जो अन्न खातो तो. केवळ बाह्य विश्वच नारायण स्वरूप नाही तर त्याचा आनंद घेणारा उपभोक्ता अहं  हाही नारायणस्वरूपच आहे. आपल्यामधील अनुभव घेणारा, इंद्रियांचे माध्यमातून कार्य करणारा जीवात्मा हा सुद्धा आत्मस्वरूप आहे, म्हणून आत्मा हाच एकाच वेळी अन्नही (भोग्य) आहे व अन्नाद (भोक्ता ) ही आहे. आपले जागृतावस्थेतील मनच स्वप्नावस्थेचा अनुभव घेणारा भोक्ता आणि भोग्य होते तसाच तो ’अन्नाद’ आहे.
डॉ. सौ. उषा गुणे.


[1]   सहयज्ञा प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः । अनेन प्रसविष्वध्वनेष वोऽस्त्विष्टकामधुक् ॥ गेता ३.१० – सृष्टि उत्पत्तिचे सुरवातील प्रजापतीने (ब्रह्मा) यज्ञासह सर्व प्रजेची (मानवांची) उत्पत्ति केला. त्याने आदेश दिला याच (यज्ञाचे) सहाय्याने तुम्ही वृद्धि पावाल. हाच तुम्हाला कामधेनूप्रमाणे सर्व इष्टफल देवो.
[2]  वीनच उत्पन्न झालेल्या जिज्ञासारूपी अग्नीमध्ये आम्ही आमचे अज्ञान व निकृष्ट वासनारूपी द्रव्याचे हवन करून टाकतो त्यायोगे दिव्य अशा आत्मतेजाची प्राप्ती होते.

No comments: