06 January, 2012

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक १०६

श्लोक १०६
आत्मयोनिः स्वयंजातो वैखानः सामगायनः 
देवकीनन्दनः स्रष्टा क्षितीशः पापनाशनः  ।।
(९८) आत्मयोनिः :  - जो स्वतःच स्वतःचे उपादान कारण आहे. जो स्वयंभू, मूलभूत कारण आहे असा श्रीनारायण.
(९८) स्वयंजातः :  - जो विश्वाचा स्वामी असल्यामुळे त्याला व्यक्त होण्याकरतां दुसरे कुठलेही निमित्तकारण आवश्यक नसते असा. या विविधतेच्या जगात प्रत्येक कार्याकरता तीन कारणांची आवश्यकता असते. घट निर्मितीमध्ये उपादान कारण माती, निमित्त कारण आहे चक्र व कर्ता आहे कुंभार. श्रीनारायणाच्या या निर्मिती विश्वामध्ये या तीनही कारणस्वरूपांत तोच व्यक्त झालेला असतो. जसे मनुष्यास पडणारे स्वप्न विषय, त्यातील विषय. व पहाणारा सर्व तोच असतो. [1]
(९८) वैखानः :  - जो पृथ्वीचे खनन करतो. अध्यात्मिक मूल्ये नष्ट करणार्‍या असूरी प्रवृत्तीच्या भयानक हिरण्याक्ष राक्षसाला मारण्याकरतां पृथ्वीची दृढ घनता आपल्या दातांनी खणून भगवंत पाताळात पोहोचले व त्याचे सूक्ष्मरूप ओळखून त्यांनी त्या राक्षसास नष्ट केले. त्याचप्रमाणे आत्मप्रकाश आपल्या आतपर्यंत (अंतरंगात) पोहोचला तर अहंकार नष्ट होईल व शरीर मन बुद्धिच्या दुष्ट आसक्तीतून आपली सुटका होईल.[2]
(९८) सामगायनः :  - जो स्वतः सामगायन करतो तो.
(९८) देवकीनन्दनः :  - कृष्णावतारामध्ये जो देवकीचे पोटी जन्मला तो. जन्मापासून देवकी त्याला केवळ दुरूनच पाहूं शकली. तो गोकुळांत असल्यानें त्याच्या बाललीला, क्रीडा लांबूनच अनुभवू शकली व त्यात तिने आनंद मानला म्हणूनच तो देवकीनन्दन.
(९९) स्रष्टा :  - जो सृष्टी उत्पत्ती करतो तो. प्रत्यक्ष ब्रह्मदेवही आपले कार्य करण्याकरतां लागणारी शक्ति व कौशल्य त्या परमात्म्या नारायणापासूनच प्राप्त करतो.
(९९) क्षितिशः :  - क्षिती म्हणजे पृथ्वी, तिचा स्वामी. श्रीनारायण हा भूमातेचा पति असल्याने तिचा रक्षणकर्ता, पालनकर्ता व पोषणकर्ता आहे. येर्थ क्षिती म्हणजे जड प्रकृती किवा माया असाही अर्थ होतो व तो नारायण लक्ष्मीपति होय.
(९९) पापनाशनः :  - ज्याचे ध्यान केले असता सर्व वासना पाप नष्ट होते असा. जेव्हा भक्त त्याच्या प्रेमामध्ये समर्पित होऊन आपली सर्व कर्तव्य कर्मे करतो तेंव्हा त्याच्या सर्व वासना नष्ट होऊन जातात. व नवीन निर्माणच होत नाहीत. वेदांमध्ये प्रतिपादन केलेल्या कर्मयोगाचे हेच मूलतत्व आहे. आत्मस्वरूप नारायणाचे ध्यान केले असतां सर्व पापे नाहीशी होतात व कायमची दूर केली जातात.
डॉ. सौ. उषा गुणे.



[1]   हेच ९८, ९८ या संज्ञांनी सुचविले आहे.
[2]  अहं = जीव. हिरण्य = सोने. अक्ष = डोळा, दृष्टि. सोन्याचा डोळा (दृष्टि) असलेला म्हणजेच इंद्रियांकडून मिळणार्‍या विषसुखाकडेच ज्याची दृष्टि आहे असा. केवळ भगवंतच त्याचा पूर्ण नाश करू शकतात.

No comments: