05 March, 2012

श्रीमद्‌भगवद् गीता - अध्याय १ श्लोक १-२

      ॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥
       ॥ अथ श्रीमद्भगवद्गीता ॥
         अथ प्रथमो अध्यायः ।

         ॥ अर्जुनविशादयोगः ॥

          धृतराष्ट्र उवाच ।
धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः ।
मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत सञ्जय  ॥ १-१ ॥


अन्वय  :  हे संजय ! धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे युयुत्सवः समवेताः मामकाः चैव पाण्डवाः किम् अकुर्वत ?


अर्थ   :  संजया ! धर्मकर्मासाठी प्रसिद्ध असलेल्या कुरुक्षेत्रासारख्या ठिकाणी माझे आणि पंडुचे पुत्र युद्धासाठी समोरासमोर आले असतां पुढें त्यांनी काय केले ? 

विवरण  :  येथे धर्मक्षेत्र आणि कुरुक्षेत्र असे दोन शब्द आले आहेत. कुरुक्षेत्र म्हणजे हस्तिनापूरच्या सभोंवारचे मैदान. कौरवांचा पूर्वज कुरु नावाचा राजा हे मैदान कष्टाने नांगरीत असे म्हणून त्याला क्षेत्र (शेत) असे म्हणतात. पुढे इंद्रानें या क्षेत्रांत जे तप करता करता किंवा युधांत मरतील त्यांना स्वर्गप्राप्ती होईल असा कुरूस वर दिला (शल्यपर्व अध्याय ५३). याच भूमीला धर्मक्षेत्र म्हणून जाबाल उपनिषदात व शतपथ ब्राह्मणात उल्लेख आहेत.   


         भगवद्‌गीतेसारख्या ग्रंथामध्ये धृतराष्ट्राचा हा एकच श्लोक आहे. आणि वरकरणी पाहता तो चमत्कारीकच वाटतो. युद्धासाठी एकत्र जमलेले आणखी काय करणार ? युद्धच करणार ना ? मग असे कां विचारावे ? परस्परांशी युद्ध करण्याचा निश्चय करून कौरवपांडव कुरुक्षेत्री गेले हे तर धृतराष्ट्राला ठाऊक होते. पण ’त्यांनी काय केले’ हे विचारण्याचा हेतु हा कीं, कदाचित् पांडवांचा युद्धासंबंधीचा उत्साह नाहीसा झाला असेल. हा उत्साह संपण्याची दोन कारणे. एक दृष्ट - म्हणजे कौरवांकडील सैन्याचा मुख्य सेनापति जो अतुल पराक्रमी भीष्म त्यास पाहून पांडवांच्या सैनिकांनी घाबरून पलायन केले असावे. दुसरे अदृष्ट कारण म्हणजे - कुरुक्षेत्रास धर्मक्षेत्र हे विशेषण. धर्मक्षेत्र म्हणजे यज्ञयागादि धर्मकर्मे करण्याचे स्थान. अशा ठिकाणी कोणाच्याही मनांत धर्मबुद्धी उत्पन्न होणार, आणि ज्याची बुद्धि आधीच धार्मिक आहे त्याच्या धर्मबुद्धीची वृद्धी होणार. पांडव हे तर मूळचेच धार्मिक. यास्तव होणार्‍या हिंसेचे पातक आपल्या माथी येणार या भावनेने त्यांनी कदाचित् युद्ध सोडून दिले असेल. असे वाटण्यासही कारण आहे. युद्ध सुरू व्हायच्या आधी धृतराष्ट्राने संजयास आपला दूत म्हणून पाठवून सामोपचाराचा सल्ला देण्याच्या निमित्ताने पांडवांचे पुरेसे brain washing करण्याचा प्रयत्‍न केला होता. धृतराष्ट्राचा सामोपचार हे त्याचे मंत्रयुद्ध. मंत्रयुद्ध म्हणजे शत्रूच्या मनात विपरीत विचार पेरणे, त्याच्या मनांत गोंधळ निर्माण करणे.  याचे वर्णनासाठी व्यासाने महाभारत - उद्योगपर्वातील २७-२९ असे तीन अध्याय खर्च केले आहेत. त्यातील फक्त दोन उतारे पाहू -


धर्मनित्या पाण्डव ते विचेष्टा
    लोके श्रुता दृश्यते चापि पार्थ ।
महाश्रावं जीवितं चाप्यनित्यं
    संपश्य त्वं पाण्डव मा व्यनीनशः ॥ १ ॥
न चेत् भागं कुरवोऽन्यत्र युद्धात्
    प्रयच्छेरंस्तुभ्यं अजातशत्रो ।
भैक्षचर्यामन्धकवृष्णिराज्ये
    श्रेयो मन्ये न तु युद्धेन राज्यम् ॥ २ ॥
अल्पकालं जीवितं यन्मनुष्ये
    महास्त्रावं नित्यदुःखं चलं च ।
भूयश्च तद् यशसो नानुरूपं
    तस्मात् पापं पाण्डव मा कृथास्त्वम् ॥ महा. उद्योग २७.३ ॥


       हे पांडुनंदना, तुझी प्रत्येक कृति नित्य धर्माला अनुसरून असते अशी तुझी लोकात प्रसिद्धी आहे व मलाही तसेच दिसते. पांडुपुत्रा, हे जीवन चंचल व अशाश्वत आहे हे लक्षांत घेऊन क्रोधाने तूं कौरवांचा नाश करूं नकोस. अजातशत्रो, युद्धाशिवाय जर कौरव तुला भाग देत नसतील तर तूं अंधक व वृष्णि (कृष्ण वृष्णिकुळातला) यांच्या राज्यांत भिक्षा मागून राहणे हे चांगले. परंतु युद्ध करून राज्य मिळविणें हे श्रेयस्कर नाही. मनुष्याचे जीवन हे अल्पावधी आहे. ते सदा दुःखमय व चंचल आहे. तेव्हां युद्ध करून राज्य मिळविणे हे तुझ्या कीर्तीला शोभणारे नाही. यासाठी पांडवा, तूं युद्ध करण्याचे पाप करूं नकोस.


पापानुबन्धं को नु तं कामयेत
    क्षमैव ते ज्यायसी नोत भोगाः ।
यत्र भीष्मः शान्तनवो हतः स्याद्
    यत्र द्रोणः सहपुत्रो हतः स्यात् ॥ २४ ॥
कृपः शल्यः सौमदत्तिर्विकर्णो
    विविंशतिः कर्णदुर्योधनौ च ।
एतान् हत्वा कीदृशं तत् सुखं स्याद्
    यद् विन्देत्यास्तदनु ब्रूहि पार्थ ॥ २५ ॥
लब्ध्वापीमां पृथ्वीं सागरान्तां
    जरामृत्यू नैव हि त्वं प्रजह्या ।
प्रियाप्रिये सुखदुःखे च राजन्
    नैवं विद्वान् नैव युद्धं कुरु त्वम् ॥ २६ ॥
अमात्यानां यदि कामस्य हेतोः
    एवं युक्तं कर्म चिकीर्षसि त्वम् ।
अपक्रामेः स्व प्रदायैव तेषां
    मा गास्त्वं वै देवयानात् पथोऽद्य ॥ २७ ॥


    पापच ज्याचे मूळ आहे अशा क्रोधाची जोपासना कोण करील ? युधिष्ठिरा, तुझ्यासारख्याला तर राज्यभोगापेक्षां क्षमा हेंच सर्वश्रेष्ठ आहे. ज्या भोगासाठी शांतनुनंदन भीष्म मारला जाईल, ज्यासाठी द्रोण, अश्वत्थामा मारले जातील तो सुखोपभोग चांगला नाही. कृपाचार्य, शल्य, भूरिश्रवा, विकर्ण, विविंशती, कर्ण व दुर्योधन या सर्वांचा वध करून तुला असे कोणतें सुख प्राप्त होणार आहे ? राजा, समुद्रवलयांकित या सार्‍या पृथ्वीचें राज्य मिळाले तरीही तुला जरा-मृत्यू, प्रिय-अप्रिय, सुख-दुःख ही सुटणार नाहीत, हे तूं जाणतोस. म्हणून तूं युद्ध करूं नकोस. स्वकीयांचा वध करून देवमार्गापासून भ्रष्ट होऊं नकोस.
[ वरील दोन उतारे द्यायचे कारण म्हणजे पुढे अर्जुनाने गतधैर्य झाल्यावर युद्ध न करण्याची जी कारणे सांगितली त्यात नेमकी वरीलप्रमाणेंच शब्द योजना केली आहे.]


       धृतराष्ट्राला खात्री होती की आपल्या मंत्रणेचा युधिष्ठिरावर नक्कीच परिणाम होणार, म्हणून त्याचा संजयास ’त्यांनी काय केले’ असा प्रश्न. पण जरी वरील मंत्रणेचा युधिष्ठिरावर व भीमावर परिणाम झाला नाही तरी त्याचा अर्जुनावर परिणाम झालाच. असो. आता कुरुक्षेत्राला धर्मक्षेत्र विशेषण लावताना धृतराष्ट्राला असा विचार चाटून गेला की त्या पुण्यक्ष्रेत्राच्या प्रभावाने आपल्या पुत्रांची अंतःकरणे शुद्ध होऊन त्यांनी कपटाने मिळविलेले राज्य भोगणे निंद्य व पापमूलक आहे असे वाटून ते रणभूमीवरून परतले तर नाहीत ना ? असे असेल तर ते जिवंत असून मेल्यासारखेच आहेत. कारण तो स्वतः मायापाशात बद्ध असल्यामुळे आपल्या पुत्रांसच यश आणि वैभव प्राप्ती व्हावी अशी त्याची इच्छा होतीच. आपल्या पुत्रांना ’मामका’ संबोधून 'त्यांनी काय केले’ एवढेच विचारले असते तर प्रश्नाचे स्वरूप वेगळे होते. पण ’मामका’  बरोबर ’पाण्डवाश्चैव’ शब्द योजून त्याने पांडूपुत्रांबद्दल दूजाभाव व राज्याच्या भोगाचा संबंधात द्वेषबुद्धी जाहीर केली हे उघडच आहे.


भाष्यकारांनी या संवादाचा काढलेला पारमार्थिक अर्थ :
       धृतराष्ट्र म्हणजे शरीररूपी राष्ट्र धारण करणारा, मायेच्या आवरणानें अंध झालेला, आणि हे माझे, हे तुझे अशा भेदबुद्धींत गर्क झालेला जीव होय. ह्या जीवावर मायेचा पूर्ण पगडा असल्या कारणाने काम, क्रोध, मोह, मद, मत्सर या दुर्वृत्ति ज्या मायेची अपत्यें होत, त्यांना तो आपलें म्हणत आहे, आणि ज्यांच्यात शुद्धस्वरूप अशा शम, दम, करुणा, विवेक वैराग्यादि सद्‌वृत्ति आहेत त्यांस आपले शत्रू मानित आहे. ह्या दोन्ही वृत्तिंचा संग्राम, धर्मक्षेत्र म्हणजे धर्माचरण करण्याचे साधन जो देह त्याच्यात चाललेले आहे. संजय हे इंद्रियदमन करून ती स्वाधीन ठेवणारी जी बुद्धि त्याचे प्रतीक आहे. अशा संजयाला जीवाचा कोण हरले, कोण जिंकले असा प्रश्न आहे.

सञ्जय उवाच ।
दृष्ट्वा तु पाण्डवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा ।
आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत् ॥ १-२ ॥


अन्वय  :  तदा व्यूढं पाण्डवानीकं दृष्ट्वा दुर्योधनः राजा आचार्यम् उपसंगम्य वचनं अब्रवीत् ॥


अर्थ   :   संजय म्हणाला, त्या वेळी पांडवांचे सैन्य व्यूहरचना करून युद्धास तयार झाले आहे असें पाहून, दुर्योधनराजा द्रोणाचार्याकडे जाऊन म्हणाला;
विवरण  :  येथे दुर्योधनाने युद्धारंभी काय केले ते अगोचर सांगण्याचे प्रयोजन एवढेंच दिसते कीं, आपले पुत्र भितीमुळे युद्ध करण्याचे सोडून देतील असा संशय धृतराष्ट्राच्या मनांत आला असला तर तो नाहींसा करावा, असे संजयास वाटले असावे. आता दुर्योधन हा स्वतः राजा असून आपण होऊन द्रोणाचार्यांपाशी गेला याचे कारण तो मोठा कार्यसाधु व धूर्त होता. द्रोणाचार्यासारख्या युद्धकलेंत कुशल वीराशी नम्रतापूर्वक व्यवहाराने, त्यांना मान देण्याने, तो आपल्याला मनापासून साहाय्य करील असे वाटणे सहजिक होते. कारण त्याला माहित होते की द्रोणाचा पांडवांकडे व त्यांतल्या त्यात विशेषतः अर्जुनाकडे फार ओठा होता. कौरव पाण्डवांना धनुर्विद्या शिकवीत असतांना तो सर्वांमध्ये अत्यंत बुद्धिमान शिष्य आढळल्यामुळे द्रोणाचे त्याच्यावर विशेष प्रेम होते. दुसरे कारण असे सांगितले जाते की दुर्योधनाला आपल्याकडील सैन्य संख्येने पांडवांच्या सैन्यापेक्षा अधिक आहे हे माहित होते तरी तो पांडवांच्या सैन्याची रचना पाहून घावरला होता. भीष्माने कौरवांच्या सैन्याची ’पतत्रि’ नामक व्यूह रचना केली होती. ही साधारण पक्ष्याच्या आकाराची असून या सैन्याचे तोंड केव्हांही कुठेही फिरवले जाऊ शकते. अर्जुनाने हे पाहून द्रुपदपुत्र धृष्टद्युम्नाला आपल्या सैन्याची रचना ’वज्र’ नामक व्यूहाने केली. असला व्यूह सुईच्या टोकानुरूप अणकुचिदार असतो आणि शत्रूसैन्यावर हल्ला करण्यास अत्यंत उपयुक्त असतो. अशा प्रकारे उत्तम प्रकारची रचना केल्यामुळे पांडवांचे सैन्य कमी असले तरी ते कौरवांच्या सेनेला भारी पडणारे होते. विशेष म्हणजे धृष्टद्युम्न हाही द्रोणशिष्य होता आणि त्याने केलेली ही रचना पाहून द्रोणाचार्य - जे अर्थात् सर्वांचे गुरु असल्याकारणाने - आपल्याकडील व्यूहरचनेचा फेरविचार करतील, जेणे करून आपल्या विजयाची खात्री व्हावी.

 

No comments: