01 April, 2014

सौन्दर्यलहरीस्तोत्रम् - प्रास्ताविक

संस्कृत भाषेतील स्तोत्रवाङ्‍ग्‍मयात सौंदर्यलहरी या स्तोत्राचे स्थान फारच उच्च कोटीचे आहे. हें स्तोत्र म्हणजे आदिशक्तीच्या उपासनेचा आत्मा आहे. श्रीशक्तिदेवीच्या उपासनाक्षेत्रांत कांहीं घडले नाहीं तरी निदान सौंदर्यलहरी या स्तोत्राचा पाठ तरी अवश्य घडावा. या स्तोत्राच्या पाठानेंही श्रीविद्येची उपासना घडते असे या स्तोत्राचें माहात्म्य आहे. प्रायः सात्विक, सुविद्य आणि सुस्थितीतील लोकच या उपासनेच्या क्षेत्रांत पदार्पण करीत असतात. अथवा भाग्याने जे कोणी श्रीविद्येची उपासना करतात, त्यांना ते सात्विक, सुविद्य आणि सुस्थितीतील म्हटलें जाईल अशीच अवस्था श्रीदेवी भगवतीच्या कृपेने प्राप्त होत असते असें दृष्टीस पडते. असा हा श्रीविद्येच्या उपासनेचा महिमा आहे. या सर्व फलापेक्षांही तात्विकदृष्ट्या शुद्ध समाधानाचा लाभ होणें हे श्रीविद्येच्या उपासनेचें असाधारण फल आहे. तांत्रिकदृष्ट्या श्रीविद्येची उपासना घडणे हें अत्यंत दुरापास्त आहे. श्रीविद्येच्या उपासनेत श्रीचक्रपूजेला अथवा श्रीयंत्राच्या पूजेला अग्रस्थान आहे. या श्रीयंत्राची माहिती श्रीसौंदर्यलहरीस्तोत्राच्या अकराव्या श्लोकांत दिलेली आहे. श्रीचक्राच्या पूजेचे फल अत्यंत श्रेष्ठ असेल यांत नवल काय, केवळ भक्तियुक्त अन्तःकरणानें श्रीयंत्राचे दर्शनही घेतलें तरी सांगोपांग शंभर यज्ञ केल्याचे, सोळा महादानें दिल्याचें आणि साडेतीन कोटि तीर्थामध्ये स्नान केल्याचे फळ मिळतें, असा श्रीचक्राच्या दर्शनाचा महिमा शास्त्रांत वर्णिलेला आहे. [तीनरंगी श्रीचक्रचित्रांतील लोक पहा.]

श्रीविद्येच्या उपासनेच्या दृष्टीने आचार्यांनीं केलेली भवानीभुजंगमस्तोत्र, देवीभुजंगमस्तोत्र, कल्याणवृष्टिस्तोत्र, मंत्रमातुकामानसपूजास्तोत्र ही स्तोत्रे अत्यंत महत्त्वाची आहेत. मानसपूजेच्या दृष्टीने आचार्यांनी केलेली श्रीत्रिपुरसुंदरी देवीची आणखी एक-दोन स्तोत्रे चांगली आहेत. पण तीं मोठी असल्यामुळें त्यांचा अंतर्भाव इथे करतां येत नाही. तथापि जी स्तोत्रे इथे दिली आहेत तीं श्रीललितामहात्रिपुरसुंदरीच्या उपासनेला अत्यंत उपयुक्त अशींच आहेत. त्यांतही ही सौदर्यलहरी म्हणजे फारच महत्त्वाचे स्तोत्र आहे  'सर्वे पादा हस्तिपदे निमग्नाः' या न्यायाने सर्व स्तोत्रांचा भाव यांत समाविष्ट झालेलाच आहे. भगवद्‌गीतेच्या शब्दांत सांगावयाचे झाल्यास हे स्तोत्र "सर्वतः सम्प्तुतोदके" अथांग जलाने भरलेल्या महासागरासारखे सर्वांग संपूर्ण आहे: अथवा श्रीविद्येच्या उपासना-साधन-मंदिराचा हे स्तोत्र कळस आहे असें म्हटलें तरी त्यांत अतिशयोक्ति होणार नाहीं. या स्तोत्राने संस्कृत भाषेतील महा-महा विद्वानांची मने आपल्याकडे आकृष्ट करून घेतलेली आहेत. या स्तोत्रावर प्राचीन विद्वानांच्या छत्तीस टीका उपलब्ध आहेत, हीच एक गोष्ट या स्तोत्राचे बड्या-बड्या विद्वान्  लोकांना केवढे आकर्षण वाटत आहे, हें लक्षांत घेण्यास पुरेशी आहे. अशा या अधिकारी आणि  विद्वान लोकांनी पुरस्कारलेल्या श्रीसौंदर्यलहरीचा महिमा मी काय वर्णन करणार ? आणि तो कोणत्या शब्दानी वर्णन करणार ? असें हें अत्यंत महत्त्वाचे स्तोत्र मराठी भाषेच्या भाविक भक्तांच्या हातीं देतांना मनाला अत्यंत आनंद वाटत आहे. हें स्तोत्र म्हणजे आचार्यांनी श्रीविद्येच्या भाविक भक्तांना दिलेला हा एक अपूर्व आनंदाचा निधीच आहे.

आचार्यांना हें स्तोत्र कोणत्या वयांत व कसें स्फुरले ! याचा इतिहास, मोठा मनोरम आहे. [तो वाचकांनी सुबोधस्तोत्रसंग्रहाच्या पहिल्या भागांत दिलेल्या आचार्यांच्या संक्षिप्त चरित्रांत पान एक्कावनमध्यें "काव्यस्फूर्ति" या सदरांत अवश्य पहावा.]  हे स्तोत्र आचार्यानीं केलेले नसावे अशी शंका एक-दोन विज्ञानांनी घेतलेली आहे. पण त्यांचा युक्तिवाद अगदीच पोकळ असल्यामुळें असंख्य विद्वानांनीं तिकडे लक्षच दिलेले नाही. एवढेच नव्हे तर हें स्तोत्र निश्चित आचार्यांनींच केलेले आहे असा आपला निर्वाळा देऊन बहुसंख्य विद्वज्जनांनी या स्तोत्राचा पुरस्कार केलेला आहे. आपणही या निरर्थक असलेल्या शंका-कुशंकांच्या कर्दमापासून आपल्याला अलिप्त ठेवावे हेंच श्रेयस्कर होय.

अशीही एक आख्यायिका आहे कीं, एकदा भगवाच आद्य श्रीशंकराचार्य कैलासावर गेले. तेथें पार्वतीसह विराजमान असलेल्या शंकरांना पाहून त्यांनीं भक्तिभावानें साष्टांग प्रणिपात केला. आशुतोष भगवान् शंकर प्रसन्न झाले. म्हणाले काय पाहिजे आहे ? आचार्यांनी उत्तर दिलें, कृपा करून आपण मला सौंदर्यलहरी द्या. शंकरांनी सौंदर्यलहरीचीं लिहिलेली पाने आचार्यांच्या स्वाधीन केली ! आचार्य तीं पाने घेऊन निघाले तोंच नंदिकेश्वराची दृष्टि त्यांच्यावर गेली. तो नंदी आचार्यांच्या अंगावर झपाड्याने धावला ! त्यानेंआचार्यांच्या हातांतील कांहीं पाने तोंडाने हिसकावून घेतली. राहिलेली पाने, हातांत घेऊन आचार्य मोठ्या लगबगीने धूम ठोकून भूमंडलावर आले. निवांतपणे बसून श्लोकांची जुळवाजुळव करूं लागले. तो काही श्लोक खंडित असल्याचें आढळून आलें. त्यांनीं पुन्हा शंकरांची आराधना केली. शंकरांच्या कृपेने त्रुटित झालेले श्लोक त्यांना स्फुरले आणि संपूर्ण सौंदर्यलहरी हातीं आल्याचा आनंद झाला. तीच ही सौंदर्यलहरी आहे. कांहीं असो, आख्यायिका या निर्णायक नसल्या तरी सौंदर्यलहरी हें स्तोत्र अलौकिक आहे यांत शंकाच नाही. अशा या अलौकिक स्तोत्राचा लाभ आचार्यांकडूनच जनतेला झाला आहे हेही तितकेच निश्चित होय.

कांहीं लोक सौंदर्यलहरीचे दोन भाग मानतात. एक्केचाळीस श्लोकांच्या पहिल्या अंशाला आनंदलहरी असें म्हणतात, तर एकूणसाठ श्लोकांचा दुसरा अंश सौंदर्यलहरी म्हणून मानला जातो. कांहीं लोकांच्या मताने सौंदर्यलहरीचे लोक एकशेएक आहेत, तर कांहीं ग्रंथांत एकशेदोन व एकशेतीनही श्लोक असल्याचें दृष्टीस पडते. पहिला अंश मननाला योग्य अशा त्रिपुरसुंदरीच्या तात्त्विक स्वरूपाचे प्रतिपादन करीत आहे, तर दुसरा अंश ध्यानाला योग्य अशा तिच्या सगुण स्वरूपाचें प्रतिपादन करीत आहे. प्रायः लोकव्यवहारामध्ये या दोन्ही अंशांना मिळून सौंदर्यलहरी हें एकच नांव दिलेले आढळतें.

साहित्यशास्त्राच्या दृष्टीनेंही या स्तोत्राकडे दृष्टि टाकल्यास हें स्तोत्र हें एक अद्वितीय काव्य आहे, असेंच कोणालाही मान्य करावे लागेल, अशीच या स्तोत्राची रचना आहे. तंत्रशास्त्र, मंत्रशाख, योगशास्त्र, आणि तत्त्वज्ञान यांतील गूढ रहस्ये इतक्या सहज रीतीनें यांत समावलेलीं आहेत कीं, सामान्यपणे स्तोत्र म्हणतांना चटकन् तीं लक्षांतही येत नाहींत. अनेक विद्वानांनी याच्यावर इतक्या टीका लिहिल्या त्यांतील रहस्यही हेंच आहे. शाखीय सिद्धान्त अवघड, पण ते मोठ्या गोड शब्दांत येथें मांडलेले आहेत. "कान्तासंमिततयोपदेशयुजे" प्रिय पत्नी आपल्या पतिराजाच्या मनांत ज्याप्रमाणें गोड गोड शब्द बोलून सुविचार भरविते त्याचप्रमाणें काव्याचाही उपयोग होत असतो. हा जो काव्याचा एक हेतु सांगितला जातो तोही या स्तोत्रांत पूर्णपणे सिद्धीस गेलेला आहे.

ज्ञानेश्वरमहाराजांनी म्हटल्याप्रमाणे "वाचे बरवे कवित्व । कवित्वींहि रसिकत्व । रसिकत्वीं परतत्त्व । स्पर्श जैसा" असा हा उत्तरोत्तर उत्कर्षाकडे धांव घेणारा उत्कृष्ट काव्याचा जो स्वभाव तोही या स्तोत्रांत पहावयास सापडेल. आचार्यांच्या शब्दांत कवित्व तर आहेच, पण त्या कवित्वांतही रसिकत्व म्हणजे रसिक जनांच्या चित्ताला आकृष्ट करणारे शृंगार, करुणा, अद्‌भुत आणि शांत इत्यादि विविध रसही ठिकठिकाणी दृष्टीस पडतात. शांतरस हा तर आचार्यांच्या स्तोत्रांतला जणूं कांहीं आत्माच आहे ! शरीरांत जसा आत्मा नांदत असावा त्याप्रमाणें आचार्यांच्या स्तोत्रांत शांतरस हा आपल्या अद्वितीय वैभवाने विराजत आहे.आचार्यांच्या स्तोत्रवाङ्‌मयांत परतत्त्वाला - शिवाद्वैत, शाक्ताद्वैत अथवा ब्रह्माद्वैत कांहीं म्हणा सर्वश्रेष्ठ अद्वैततत्त्वाला सहजच स्पर्श करतां येतो म्हणून आचार्यांच्या या स्तोत्ररूपी काव्याने उत्कर्षाच्या परंपरेची चरम सीमा गाठलेली आहे. या विधानाचे पूर्ण सत्यत्व आपल्याला सौंदर्यलहरी या स्तोत्रांत पहावयास सापडेल. या स्तोत्रांत ओज आहे, प्रसाद आहे, माधुर्य आहे, विविध अलंकार आहेत. इष्ट देवतेची स्तुति करण्याच्या दृष्टीने योजिले शिखरिणीवृत्तही अत्यंत बहारीचे आहे.

आचार्यांचे सौंदर्यलहरी हें स्तोत्र तंत्रशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. यांतील प्रत्येक श्कोक मंत्रस्वरूप आहे. प्रत्येक श्लोकांत कांहीं बीजभूत मंत्र अंतर्भूत असतातच. प्रत्येक श्लोकाला पृथक पृथक यंत्रही आहे. त्याची पूजा-अनुष्ठानपद्धति आहे. त्या सर्वांची फलेही पण पृथक पृथक निर्दिष्ट केलेली आहेत. श्रीयंत्र हें तर या स्तोत्रांतील मुख्य यंत्र आहे. श्रीविद्या ही या स्तोत्राची अधिष्ठात्री देवता आहे. श्रीचक्राच्या निरूपणाच्या मिषाने आपल्या देहालाच श्रीचक्र समजून देहातील षदचक्राचें या स्तोत्रांत विषयसंदर्भानें अत्यंत उत्तम विवेचन केले असून उपासकाची कुंडलिनी कशी जागृत होते व तो कुंडलिनीशक्तीच्या जागृतीने अन्तर्मुख होऊन शिवशक्तिस्वरूपाशी कसा समरस होतो, हाही विषय मोठ्या बहारीने प्रतिपादन केलेला आहे. अष्टांगयोगाच्या अनुष्ठानानें योगी ज्या निर्बीज समाधि-अवस्थेला पोहोंचतो ती अवस्था या स्तोत्राच्या पाठाने, मननानें व निदिध्यासाने उपासकाला प्राप्त होईल अशीच या स्तोत्राची रचना आचार्यांनी मोठ्या कुशलले केलेली आहे. रचना म्हणण्यापेक्षा कांहीं विचारवंत लोक या स्तोत्रालाआचार्यांची स्फूर्तिच मानतात. अशा या स्तोत्राचा लाभ होणे हें एक आपलें मोठे भाग्यच आहे यांत संशय नाहीं. जगज्जननी श्रीललितामहात्रिपुरसुंदरी आम्हांला आत्मस्वरूपाचा साक्षात्कार करून देऊन कृतार्थ करो हीच तिच्या चरणी आमची अनन्यभावाने प्रार्थना आहे.

अनुष्ठान पद्धतीने या स्तोत्राचा पाठ करावयाचा झाल्यास आचमन आणि प्राणायाम करून देशकाल संकीर्तन करावे. गोत्रोच्चारपूर्वक स्वतःच्या नांवाचा उच्चार करून संकल्प करावा. अस्य श्रीसौन्दर्यलहरी-स्तोत्रमन्त्रस्य गोविन्द ऋषिः अनुष्टुप् छन्दः ।  श्रीमहात्रिपुरसुन्दरीदेवता मम अभीष्टसिध्यर्थे जपे विनियोगः । ॐ ह्रां ॐ ह्रीं याप्रमाणे सहा बीजाक्षरांनी करन्यास आणि हृदयादि न्यास करावेत. ॐ भूर्भुवः सुवरोमिति दिग्बन्धः असें म्हणून दिग्बंध करावा. श्रीगोविन्दर्षये नमः शिरसि । अनुष्टुपच्छन्दसे नमो मुखे । श्रीललितामहात्रिपुरसुन्दरीदेवतायै नमः हृदये । अभीष्टसिद्ध्यर्थे जपे विनियोगाय नमः सर्वाड्रेगषु । अथ ध्यानम् ।

लौहित्यनिर्जित-जपा-कुसुमानुरागां
पाशाङ्‍कुशौ धनुरिषूनपि धारयन्तीम् ।
ताम्रेक्षणामरुण-माल्य-विशेषभूषां
ताम्बूल-पूरित-मुखीं त्रिपुरां नमामि ॥

श्रीललितामहात्रिपुरसुंदरीदेवतायै नमः लं पृथिव्यात्मकं गंधं परिकल्पयामि । याप्रमाणे पंचमानसोपचार पूजा करून मंदस्वराने स्तोत्राचा पाठ करावा. या स्तोत्राचे ऋषि आणि छंद यांविषयी मतभेद दृष्टीस पडतात. कांहीं ग्रंथांत गोविंद ऋषि आणि अनुष्टुपछंद असा उल्लेख आहे, तर कांहीं ग्रंथांत सदाशिव ऋषि आणि जगतीछंद असा उल्लेख आहे. कोठे कोठे ईशानभैरव ऋषि आणि गायत्र्यनुष्टुप् असा दोन छंदांचा जोडीने उल्लेख आहे. या भेदाचें मूळ संप्रदाय भेदांत असावेसें वाटतें. तांत्रिक संप्रदायांत एखाद्या स्तोत्रामध्ये जो मंत्र अभिप्रेत असेल त्या मंत्राचाच छंद त्या स्तोत्राला लावतात असा सामान्यपणे संकेत आहे. प्रस्तुत सौंदर्य-लहरी स्तोत्रांत कादिविद्या, हादिविद्या अथवा पंचदशी, षोडशी इत्यादि स्वरूपाचे अनेक मंत्र अभिप्रेत आहेत. गुरुपरंपराप्राप्त संप्रदायाला अतुलक्षून छंदांचा उल्लेख होणें हें योग्यच आहे. ऋषींच्या बाबतींतही आचार्यांनी या स्तोत्राचे द्रष्ट्टत्व आपल्या गुरूंकडे गोविदयतींकडे दिले असल्याचें दिसत आहे, तर मतभेदाने ते सदाशिवाकडे अथवा ईशानभैरवाकडे मानले जात आहे. आम्ही मात्र श्रीशृंगेरीपीठ अथवा श्रीकांची कामकोटिपीठ या पीठांना अभिप्रेत असलेला शांकरसंप्रदायानुसारी पाठ स्वीकारलेला आहे. असो, आतां पुढील पोस्ट्स्‌मध्ये या स्तोत्राच्या अर्थाचे मनन करूं या.] 
 [ विवेचन - महामहोपाध्याय पं. पांडुरंगशास्त्री गणेशशास्त्री गोस्वामी - सुबोधस्तोत्रसंग्रह]

No comments: