17 March, 2008

मानसमणिमाला (५)


मानसमणिमाला (५)


हिंदी : सुनिसमुझहि जन मुदित मन मज्जहिं अनुराग ॥
लहहिं चारि फल अछत तनु साधु समाज प्रयाग ॥ २ ॥ बालकाण्ड.
मराठी: परिसुनि समजति मुदित मन मज्जति अति अनुरागिं ॥
लाभचारि फल या तनूं साधुसमाज-प्रयागिं ॥ प्रज्ञानानंद
अर्थ : साधुसमाजरूपी प्रयागांत, त्रिवेणी संगमात जे भक्त अत्यंत मुदित मनाने व प्रेमाने (साधुजनांच्या उपदेशाचे) अवगाहन करतील, श्रवण करून एकाग्र मनाने समजून घेतील, त्यांत खोल बुडी मारतील त्यांना याच तनुंमध्ये, याच जन्मी धर्म, अर्थ, काम व मोक्ष ही चारी फळे प्राप्त होतील.

या ठिकाणी संत तुलसीदासांनी साधुसमाजाला त्रिवेणीची म्हणजेच प्रयागाची उपमा दिली आहे. तीर्थक्षेत्र प्रयागांत गंगा, यमुना व गुप्त रुपाने असलेली सरस्वती अशा तीन नद्यांचा संगम आहे. तसेच साधु समाजरुपी प्रयागांत भक्तिरुपी गंगा, कर्मविचाररुपी यमुना व ब्रह्मविचाररुपी सरस्वती यांचा संगम झालेला असतो. संतसज्जन आपल्या आचरणाने, कर्मयोगाने (ईश्वरार्पणबुद्धीनें केलेले निष्काम कर्म) ब्रह्मविचाराच्या सूक्ष्म सतत अनुसंधानाने (ज्ञानयोगाने) व या दोन्ही प्रवाहांना आपल्यात समाविष्ट करणार्‍या भक्तियोगानें समाजापुढे एक महान आदर्श ठेवत असतात.
सामान्य माणसांचा प्रायः अर्थ व काम या पुरुषार्थाची प्राप्ति करावी असाच कल असतो। त्याची जीवनांत आवश्यकता असतेच, पण त्यांची दिशा व मर्यादा माणसाला माहित असणेआवश्यक असते. ही दिशा आहे धर्माने दाखविलेली ! पण त्याचेही ज्ञान हवेच. हीच आहे ब्रह्मविचाररुपी सरस्वती ! सर्वांत अंतर्भूत असूनही न दिसणारी ! हा ब्रह्मविचार केवल मोक्ष पुरुषार्थाचीच दिशा दखविणारा आहे असे अनेकांना वाटते, त्यामुळे सामान्य माणसे त्याच्या वाटेलाच जात नाहीत. परंतु भक्तिगंगेने जसे कर्मयोगाला, यमुनेला आपल्यात समाविष्ट करून घेतले तसेच ज्ञानसरिता सरस्वतीलाही घेतले आहे. म्हणून संत असतात कर्मयोगी ज्ञानीभक्त. जगाच्या कल्याणाकरितां या संताच्या विभूति अर्थ कामाच्याच मागे लागलेल्या सामान्य माणसांना त्यांचे खरे स्वहित साधण्याकरितां या प्रयागांत अवगाहन करण्याचे आवाहन करतात. संतांचे स्वतःचेच जीवन एक विशाल त्रिवेणी संगम प्रयाग असतो. त्यांच्या चरित्राचे ज्ञान करून घेणे (श्रवण-सुनि) खोल मनन करणे (समुझहि) त्यांत बुडी मारणे (मज्जहि) आपल्या जीवनाशी पडताळून पाहणे, या सर्व प्रक्रियांमधून सामान्य माणसाला आपल्या खर्‍या स्वहिताचा मार्ग निश्चित सापडतोच. श्रवण-मनन-निदिध्यास ही भक्ति ज्ञानाचीच प्रक्रिया गोस्वामीजी आपल्याल येथे सुचवित आहेत. त्याच्यामुळे लौकिकातले पुरुषार्थ तर साधतां येतीलच पण श्रद्धेने प्रेमाने संतांचे अनुगमन केल्यास संतांच्य अनुभवास येणारे निजसुख आपल्यालाही प्राप्त झाल्याशिवाय कसे राहील ?

डॉ. सौ. उषा गुणे.

No comments: