05 May, 2009

बद्ध - मुक्त लक्षणे (भागवत स्कंध ११ अध्याय ११)

बद्ध - मुक्त लक्षणे
(भागवत स्कंध ११ अध्याय ११)
:
आत्मा बद्ध का मुक्त ? जीव बद्ध का मुक्त ? मनात प्रश्न उठतो तेव्हांच जाणवते की मी काही मुक्त नाही. माझ्यावर कोणा अज्ञात शक्तिचे नियंत्रण आहे. मला सदा कसले ना कसले तरी भय असतेच. या पृथ्वीतलावरील कोणाचेही नसेना का ? ईश्वराचे तरी आहेच. माझ्यावर शासन करणारा कोणीतरी आहे. सामान्यतः मनुष्याचे जीवन फारफार तर शंभर सव्वाशे वर्षाचे. पण लोकपाल, दिक्‍पालांचे एक कल्प आहे. ब्रह्मदेवाचे दोन परार्ध आहे. कितीही का असेना पण मर्यादित आहे. मर्यादा घालणारा 'कोणीतरी' आहे. 'कोणीतरी' दुसरा म्हटले की द्वैत आले. द्वैत म्हणजे भेद. भेद कोणाशी ? 'ब्रह्माशी, परमात्म्याशी, आत्म्याशी. 'यदा हि एवैष एतस्मिन् अंतरं कुरुते । अथ तस्य भयं भवति' (तैत्ति उप. २-७). मनुष्य (जीव) जेव्हां आत्म्यामध्ये थोडेसेही अंतर, छिद्र, भेददर्शन करतो - भेद करणे हेच अंतर करणे आहे - अल्पही भेद पाहतो, तेव्हां भेददर्शन करणार्‍या आत्म्यालाच भय होते. भय असल्यास कसला मुक्त ? बद्धच तो. म्हणून तर दैवी संपत्तीत (गीता अध्याय १६) 'अभयं' पहिल्या क्रमांकावर आहे.


हा विचार करून उद्धव [भागवत स्कंध ११] दहाव्या अध्यायाच्या शेवटी भगवंताला म्हणतो - "आपण म्हणता एकच आत्मा गुणांचा संबंध आला असता नित्यबद्ध होतो आणि मोक्ष नित्य असल्यामुळे (पारतंत्र्यरहित) तो नित्यमुक्तही असतो. मला हे जरा गोंधळात टाकणारे वाटते. जरा मला स्पष्ट स्पष्ट समजेल असे सांग पाहू." भगवंताच्या नित्य सहवासातले अर्जुन व उद्धव यांसारख्या श्रेष्ठ भक्तांनाही भगवंत जे सांगतात ते व्यामिश्रेणेव वाटते, तर अध्यात्म्यात 'पडलेल्या' आमच्यासारख्यांना संतमहात्मे जे सांगतात ते कसे समजावे ?

साधन करीत असताना जसजशी दोन-चार पावले योग्य दिशेने पडतात तेव्हां साधकाला वाटते - This world is a big chaos - हा संसार एक प्रचंड मोठा गडबडगुंडा आहे - असाच प्रत्यय यायला लागतो. साधकाला अपेक्षित असते ते watertight division. एक तर मी मुक्त तरी आहे वा बद्ध तरी आहे. भगवंत व संत तेच सांगतात. 'तू मुक्तच आहेस. पण तू आपल्याला गुणांच्या (मायेच्या) प्रभावामुळे मर्यादित (conditioned) करून घेतले आहेस. गुणांच्या प्रभावाखाली असलेल्या इंद्रियांचे मर्यादित्व (limitation) तू मानतोस. मग त्यापलीकडील तुला काही दिसत नाही, जाणवत नाही, उमजत नाही. थोडक्यात मुक्त आहेसच, पण मायेच्या आवरणामुळे (conditioned by trigunas) बद्धही आहेस."

भगवान् पुढे म्हणतात - उद्धवा ! जेव्हां कोणामध्ये सात्त्विकतेचे विपुल दर्शन व्हायला लागते., त्याच्या शांत चित्तामुळे त्याच्या सत्त्वगुणाची उन्नत अवस्था होऊन त्याच्या आचरणात गुणांचा अभाव दिसायला लागतो, तेव्हां इतर लोक म्हणतात, "तो मुक्त आहे". अर्थात् असे म्हणणारे स्वतः रजोगुण, तमोगुणाच्या प्रभावाखाली असून सदा सुख-दुःख अनुभवीत असतात म्हणून ते बद्ध होत.

"बद्धोमुक्त इति व्याख्या गुणतो मे न वस्तु्तः" - पण एक लक्षात घे. बद्ध, मुक्त यांची व्याख्या मीच केली आहे. खरे सांगायचे तर कोणी बद्धही नाही वा कोणी मुक्तही नाही. गुणांच्या संगाने बद्ध वा मुक्त म्हटले जाते. आणि गुण तर मायेचे आहेत. म्हणून 'न मे मोक्षो न बंधनम्' - माझ्या (परमात्म्याच्या) स्वरूपभूत जो जीवात्मा आहे त्याला न बंधन आहे, ना तो मुक्त आहे. देहाशी तादात्म्य पावून देहाभिमानी ('मी' चा प्रादुर्भाव) उत्पन्न झाल्यास मायेचे अविद्यारूपी आवरण पडते आणि लगेच सुख, दुःख, मोह, शोक इत्यादि संसार सुरू होतो. थोडक्यात संसृतिचा परिणाम अविद्या आणि त्यामुळे संसार. पण मुळात ही संसृतिच (माया) वास्तविक आहे का ? ती केवळ आभासमय आहे. जसे स्वप्न व त्यात दिसणारे सर्व दृष्यजगत् बुद्धिमुळे भासमान होते. ते काय खरे असते का? म्हणजे विद्या अविद्या दोन्हीही खर्‍या नव्हेत. मानलेल्या. तसेच जीव (देहाभिमानी) मी बद्ध, मी मुक्त 'मानतो' एवढेच. हा जीव अविद्येमुळे बद्ध 'मानून' त्याच्या प्रभावाखाली असेपर्यंत "मी" चे अस्तित्व वेगळे मानतो. पण ज्ञानप्राप्तीनंतर "मी" जेव्हां आत्म्यापासून अविभाज्य होतो, म्हणजेच विद्येची प्राप्ति होते, तेव्हां तोच "मी" आपल्याला मुक्त मानतो.
(क्रमशः)

No comments: