07 May, 2009

बद्ध - मुक्त लक्षणे - (२) (भागवत स्कंध ११ अध्याय ११)

बद्ध - मुक्त लक्षणे - (२)
(भागवत स्कंध ११ अध्याय ११)

"भगवंता ! एखाद्या मनुष्याकडे पाहून हा बद्ध, हा मुक्त हे कसे बरे जाणावे ? जसे एखाद्याकडे बघितल्यावर हा जपानी दिसतोय, हा आफ्रिकेतला असावा, हा तर नक्कीच ऑस्ट्रेलियन असणार हे ओळखता येते तसे मुक्ताला ओळखता येईल का ? बद्ध व मुक्त यांतील वैलक्षणे कोणती ?" सांगतो, ऐक. एकाच शरीरात आत्मा तर असतोच पण "मी" ची उपाधी लावून घेतलेला जीवात्माही तिथेच वास करतो. एका झाडावर दोन पक्षी बसावेत त्यासमान एका शरीरात या दोघांचे वास्तव्य असते. एक चिदानंदस्वरूपी एकधर्मिणि आहे. त्याचा एकच धर्म आहे. कारण त्याच्या विश्वात 'अन्य' नाहीच. त्याच्या विश्वातील सर्वकाही त्याच्या अधीन असते. अर्थात् त्याचा तोच 'नियंता' असतो. . पण दुसरा आपल्याला वेगळा मानत असतो. आपण बद्ध आहोत. आपले सर्व व्यवहार कोणा अज्ञात पराशक्तिच्या नियंत्रणेनुसार घडतात आणि म्हणून आपल्याला 'नियम्य' मानत असतो. असे एकाच शरीरात ज्ञानस्वरूप, कर्मफलभोगरहित, ज्ञानानंदाच्या शक्तिने पुष्ट असा नित्यमुक्त परमात्मा असतो आणि कर्मफलरूप सुख-दुःख भोगणारा नित्यबद्ध जीवात्माही असतो. आता परमात्मा अहंकार (देहाभिमान) धारण करीत नसल्यामुळे, इंद्रिय-विषय विकारांनी रहित असल्यामुळे अविकृत राहतो. त्याचे ठिकाणी कर्म, कर्माचा कर्ता, कर्मफलाचा भोक्ता या सगळ्यांचा अभाव असतो. पण नियम्य जीव नियंता परमात्म्याच्या अधीन असल्यामुळे देहांत राहून सर्व कर्मांचा 'मी कर्ता' असा अभिमान धारण करीत असल्यामुळे मी कृश, मी लठ्ठ, मी सुखी, मी दुःखी इत्यादि विकारांनी लिप्त राहतो.

भगवंताला उद्धवाच्या चेहर्‍यावर प्रश्नचिन्ह दिसले. 'मग जीवात्म्याने बद्धच राहायचे का ? हा देह-अभिमान जाणार कसा ? आणि एकाच शरीरात हे दोघे राहात असून एक नित्यमुक्त, सदा आनंदी आणि दुसरा नित्यबद्ध, दुःखाने पीडित; असे कां ?

भगवान म्हणतात - दुःखरहित नित्य आनंदाचा अनुभव घेत असणारा सर्वज्ञ, सच्चिदानंद, सर्वव्यापी श्रीहरि शरीरात राहूनही त्याला शरीराभिमान नसल्यामुळे 'मी या शरीरात राहणारा' असे म्हणवीत नाही. त्याकरिता त्याला देहगत दुःख (वा सुखही) नाही. जसे स्वप्नातून उठलेला जागृतपणी दुःखादिकांचा अनुभव घेत नसतो कारण तो स्वप्न जगतातील दृष्यांशी संलग्न (identified) झालेला नसतो, तद्‍वत्. पण जीव शरीराशी बांधल्या गेल्यासारखा देहाशी तादात्म्य पावून देहाभिमानी झाल्याने स्वप्नातल्याप्रमाणे सुखी दुःखी होतो. मग उपाय काय ? शरीरात राहूनही देहाभिमानापासून विरक्त होणे. मग शरीराने भले झोपी जावो, उठून बसो, दृष्य पाहो, अन्नसेवन करो - हे सर्व गुणप्रभावित इंद्रियांकडून घडते - त्याच्याशी संग कशासाठी ? वायु जसा सर्वत्र गमन करीत असता सुगंध-दुर्गंधापासून असंग, अलिप्त राहतो तसे देह, विषय यांपासून अलिप्त राहण्याचा - वैराग्याचा, त्यागवृत्तिचा अभ्यास करावा. वैराग्याने मन अविचल झाले की सर्व शंका पार झाल्याच - 'न व्यतिक्रियते बुधः'. मग कोणी निंदा करो वा कोणी पूजा करो - हे सर्व व्यवहार देहाचे, शरीराचे. माझे त्याच्याशी तादात्म्य नसल्यामुळे 'माझे' नव्हेत. मग कुठे झाले सुख आणि कुठे राहिले दुःख. वैराग्य दृढ झाले की अविद्येचे आवरण जाणारच. मग असा जीव काय करतो ? 'विचरेत् जडवन् मुनि’ मुनि आहे खरा पण कधी कधी इतर संसारी लोकांच्या दृष्टीत तो एक विकारशून्य, संस्कारशून्य, परिणामशून्य जड मूढ व्यक्ति. उदाहरणासाठी पहावे 'जडभरत - (भागवत. स्कंध ५, अध्याय ९)

1 comment:

Abhijit Dharmadhikari said...

श्री.भिडे महाशय,
तुमच ही अनुदिनी फारच अप्रतिम आहे. पुढील उपयोगासाठी खूण करून ठेवली आहे. रोज थोडं थोडं करून वाचत जाईन म्हणतो!
धन्यवाद!