02 July, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक ४७

अनिर्विण्ण स्थविष्ठोभूर्धर्मयूपो महामखः 
नक्षत्रनेमिर्नक्षत्री क्षमः क्षामः समीहनः 
(४३) अर्निर्विण्णः :  - ज्यास 'निर्वेद' नाही असा तो श्रीविष्णु अनिर्विण्ण आहे. अंतःकरणातील अत्यंत तीव्र कामनांची पूर्ती न झाल्याने येणारी उदासिनता म्हणजेच निर्वेद. हा निर्वेद त्याच्या ठिकाणी संभवनीय नाही. कारण तो भगवंत इच्छारहितच असल्यानें अपूर्तीचे दुःख त्याच्या ठिकाणी शक्य नाही. त्याच्या परिपूर्ण अवस्थेमुळे आणखी कांही इच्छांची परिपूर्ती संभवतच नाही म्हणूनच त्या श्रीहरीस अशातर्‍हेचा निर्वेदही नाही अर्थात् तो 'अनिर्विण्ण' आहे.
(४३) स्थविष्ठः :  - जो अत्यंत स्थूल आहे असा. सर्व विश्व हाच त्याचा आकार आहे, कारण तोच हे विश्व आहे. [1] म्हणून ह्या प्रकटनात तो अत्यंत 'स्थूल' झाला आहे. त्या भगवंताने सर्व विश्व,पृथ्वी, स्वर्ग व त्यामधील आकाश व सर्व अंतरिक्ष व्यापले आहे असे गीतेत वर्णन आहे.[2] तसेच उपनिषदांमध्ये सर्व आकाश हेच त्याचे मस्तक आहे व चंद्र सूर्य त्याचे नयन आहेत अशाप्रकारचे वर्णन आले आहे.
(४३) अभूः :  - ज्याला जन्म नाही असा, किवा ज्याचे ज्ञान झाले असता साधकाला पुन्हा जन्म येणार नाही असा तो अ-भू. कांही विवेचक यापूर्वीची स्थविष्ठ ही संज्ञा व ही संज्ञा मिळून 'स्थविष्ठोऽभूः' अशी एकच संज्ञा मानतात. तेथे अ+भू असे न म्हणता त्यांनी त्या अर्थी भगवंतास 'भू' म्हणजे पृथ्वी असे म्हटले आहे. जीवनाच्या भव्य नाट्याला जशी ही पृथ्वीच आधार आहे (रंगभूमी) त्याप्रमाणे भगवान नारायणाचेच आधाराने विश्वातील सर्व अनुभूतींचे नाट्यविश्व चालू असते.
(४३) धर्मयूपः :  - यागामध्ये यज्ञपशू बांधण्याचा स्तंभ (यूप). यज्ञामध्ये बली द्यावयाचा पशू ज्या खांबाला बांधला जातो त्याला धर्मयूप असे म्हणतात. परमात्मा हा असा यूप आहे की ज्याला सर्व धर्म बांधले जातात. म्हणजेच तो सर्व धर्माचा आधार किवा सत्व आहे.
(४३) महामखः :  - महान् यज्ञ. त्याला समर्पित केलेल्या यज्ञांमुळे पूर्णमुक्ती (निर्वाण) मिळते म्हणून तो महायज्ञ - महामख आहे. तसेच गीतेमध्ये म्हटले आहे,[3] 'जे अर्पण अर्पण आहे ते ब्रह्म आहे. ज्यात अर्पिले आहे तो अग्नि ब्रह्म आहे, जे अर्पिले जाते ते ब्रह्म आहे अर्पण करणारा ब्रह्म आहे व ज्या समर्पित केले जाते तेही ब्रह्मच आहे  जेथे पोहोचते ते ध्येय (गंतव्य)ही ब्रह्मच आहे.
(४४०) नक्षत्रनेमिः :  - सर्व नक्षत्र मंडळाचा मध्य असा तो नक्षत्रनेमि. ज्या केंद्राभोवती चंद्र सूर्यासहित सर्व ग्रह गोल व नक्षत्रे फिरत असतात तो मध्यबिंदु. अर्थातच हे तेजोमंडल ज्याच्याभोवती फिरत असते तो नक्षत्रनेमि (आंस) श्री नारायण आहे.
(४४) नक्षत्री :  - सर्व नक्षत्रांचा अधिपती. 'नक्षत्र तार्‍यांचा अधिपती चंद्र आहे व सर्व नक्षत्रांमध्ये चंद्र तो मी आहे'[4] असे गीता म्हणते.
(४४) क्षमः :  - सर्व कार्य करण्यामध्ये जो पूर्णपणे कुशल, समर्थ आहे असा. तसेच भक्तामधील दोष सहन करण्यामध्ये जो अत्यंत क्षमाशील आहे तो श्रीविष्णु 'क्षम' होय.
(४४) क्षामः :  - जो सर्वदा अपूर्णतारहित आहे असा. महान् प्रलयाचे वेळी सर्व वस्तू नाश पावतात व त्यांचा विलय होतो. परंतु तो परमात्मा प्रलयाच्या नाशापासून अस्पर्शित रहातो म्हणून क्षाम होय.
(४४) समीहनः :  - [5] ज्याच्या इच्छा (इहा) पवित्र आहेत असा. परमात्मा मंगल इच्छा करणारा आहे म्हणून तो सर्व जीवांचे सर्वकाळी कल्याण-मंगल इच्छितो. आपल्या इच्छाशक्तीचे योग्य नियंत्रण व नियमन कसे करायचे ते तो जाणतो म्हणून तो समीहन आहे. अर्थात् सृजनकार्यात पूर्ण कुशल आहे.



[1]   द्यावा पृथिव्योर्रिदमन्तरं हि व्याप्तं त्वयैकेन दिशश्च सर्वाः । (गीता ११.२०)
[2]      अग्निमूर्धा चक्षूंषी चन्द्रसूर्यो दिशः श्रोत्रे वाग् विवृत्ताश्चवेदाः । स्वर्ग हे त्याचे मस्तक, चंद्र सूर्य त्याचे नेत्र, दिशा त्याचे  कर्ण व त्याची वाणी वेदांचे प्रकटन करते.
[3]   ब्रह्मार्पणं ब्रह्म हवि ब्रह्माग्नौ ब्रह्मणा हुतम् । ब्रह्मैव तेन गंतव्यं ब्रह्म कर्मसमाधिना ॥ (गीता ४.२४)
[4]   आदित्यानामहं विष्णुर्ज्योतिषां रविरंशुमान् । मरीरिर्मतुतामस्मि नक्षत्राणामहं शशी ॥ (गीता १०.२१)
[5]   'सम्यगीहति इति समीहनः'

No comments: