28 June, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक ४६

विस्तारः स्थावरः स्थाणुः प्रमाणं बीजमव्ययम् 
अर्थोऽनर्थो महाकोशो महाभोगो महाधनः  ।।
(४२) विस्तारः :  - विस्तृत - प्रलयाचे वेळी नामरूपात्मक संपूर्ण विश्व त्याचेमध्ये सहजतेते समाविष्ट होवूं शकते इतका व्यापक त्याचा विस्तार असल्याने त्यालाच 'विस्तार' अशी संज्ञा दिली गेली आहे. तसेच परमात्म्यामध्येच सर्व विश्व विस्तार पावते म्हणजेच प्रकट होते. परमात्मा स्वतःमध्येच सर्व विश्वाचे प्रकटीकरण करतो.
(४२) स्थावरः स्थाणुः :  - जो दृढ व स्थिर आहे असा. स्थावर - अचंचल. ह्या संज्ञेने त्याचेमध्ये कुठलीही हालचाल, चंचलता नाही असे सुचविले जाते कारण तो सर्वव्यापी आहे. स्थाणु - स्थिर. या संज्ञेचा अर्थ असा होतो की एकाद्या देशाच्या सीमा दाखविणार्‍या खांबाप्रमाणे तो स्थिर आहे. या दोन्ही संज्ञा मिळून हे एकच नाम झाले आहे. तो परमात्मा एकाचवेळी दृढ (अचंचल) आहे व स्थिरही आहे. केवळ सर्वव्यापीच नाही, तर त्याच्यामध्ये चंचलता नाही व कसली गतीही नाही. (स्थिर) अर्थात् दोन्ही संज्ञा मिळून श्रीविष्णु सर्वव्यापी आहे असे सुचविले आहे.
(४२) प्रमाणम् : प्रमाण. - सर्व बौद्धिक वादविवादामध्ये व सर्व शास्त्रीय प्रक्रीयांमध्ये अंतर्भूत असलेले पायाभूत तत्व म्हणजेच 'प्रमाण' होय व ते चैतन्यच त्याचा आधार आहे. सर्व धर्माचा अध्यक्ष तो भगवान् नारायण आहे म्हणूनच तो स्वतःच सर्व प्रमाणांच्या मागचे तात्त्विक सत्य आहे.
(४२) बीजमव्ययम् :  - अक्षयबीज. त्याचेपासून सर्व विश्वाची उत्पत्ति होत असल्यानें तोच सर्व विश्वाचे शाश्वत व अपरिवर्तनीय असे कारण (बीज) आहे. ज्याचेवाचून विश्वाचे अस्तित्व असूच शकत नाही असे जगताचे 'मूलकारण' असाही या संज्ञेचा अर्थ होईल. तोच सर्वांचे शाश्वत मूल आहे.
(४३०) अर्थः :  - सर्वाकडून जो पूजिला जातो, आवाहन केला हातो तो. श्रीविष्णूची सर्वजण इच्छा करतात. कारण त्याचे स्वरूप आनंदमय आहे. अगदी लौकीक सुखाच्या मागे धावणारा मनुष्यही त्याचेचकडे जात असतो कारण शेवटी त्याला आनंदाची इच्छा (अर्थ) असते. आणि परमात्मा स्वतःच सुख स्वरूप असल्याने सर्वांचा 'अर्थ' तोच आहे.
(४३) अनर्थः :  - ज्याचेमध्ये कुठलीही अपूर्णता नाही अजून मिळवावयाचे काही नाही, म्हणून तो अन्-अर्थ आहे. तो पूर्ण काम (सर्व इच्छा पूर्ण असलेला) असल्यानें त्याला कांही इच्छा नाही. जोपर्यंत वासना असतात तोपर्यंत इच्छा प्रकट होत राहतात. ज्याचे ठिकाणी सर्व वासना संपलेल्या आहेत अशा परमात्म्या कोणतीच इच्छा नाही व ती अवस्था म्हणजे आत्मस्वरूपाचे ज्ञान.
(४३) महाकोशः :  - ज्याचेभोवती मोठे कोश आहेत असा. आपल्यामधील आत्मतत्व अन्नमय कोशादि पांच कोशांमधून कार्य करते, तसेच भगवान् श्री नारायण स्वतः जगदीश्वर असल्यानें तो त्या विश्वव्यापी कोशाने आवृत्त झालेला आहे. म्हणूनच त्या परमेश्वराला महाकोश असे म्हटले आहे.
(४३) महाभोगः :  - तो परम सुखरूप (भोग) व आनंदरूप आहे.. भक्तांना सर्व सुखाची प्राप्ती त्याचेकडून होत असते व ते परमसुख असते. जे भक्त अनन्यतेने त्याला शरण असतात त्यांचेकरतां सर्वाच्च सुख देणारा तो स्वतःच महाभोग आहे असे ही संज्ञा सुचविते.
(४३) महाधनः :  - पूर्णानंदाच्या सर्वश्रेष्ठ धनाने पूर्ण आहे असा. जेशरणागत भक्तांना कृपा स्वरूपाने प्राप्त होणारे सर्वश्रेष्ठ 'धन' तोच आहे. व हे धन देणाराही तोच श्रीविष्णु आहे.

No comments: