16 June, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक ४३


रामोविरामो विरजो मार्गो नेयो नयोऽनयः  ।
वीरः शक्तिमतां श्रेष्ठो धर्मो धर्मविदुत्तमः  ।।
(३९) रामः :  - जो प्रत्येक आकारात अत्यंत रममाण होतो किंवा ज्याच्यामध्ये योगीजन ध्यानद्वारा पूर्ण आनंदीत होतात तो राम.[1]  द्मपुराणांत अशी व्याख्या आहे की जो अनंत, नित्यानंद, शुद्धचैतन्य स्वरूप आत्मा आहे, [2]म्हणून ज्याच्यामध्ये योगीजन रममाण होतात तो 'राम'. अर्थात् राम या संज्ञेने परमात्म्याचे निर्देशन केले आहे. तसेच या संज्ञेचा दुसरा अर्थ ज्याचे व्यक्तिमत्व अत्यंत रमणीय आहे व तो अत्यंत सौंदर्यवान् आहे.
(३९) विरामः :  - ज्याचेमध्ये सर्व प्राणीमात्र विश्रांति पावतात तो. पूर्ण विश्रांतीचे स्थान असा तो विराम. ज्या स्थानी पोहोचल्यावर अनुभवाच्या क्षेत्रांत पुन्हा यावे लागत नाही अशी अवस्था म्हणजे विराम. कांही टीकाकारांच्या मते या संज्ञेचा अर्थ, सर्व विविधतेने नटलेले विश्व प्रलयाचे वेळी ज्या ईश्वरामध्ये विलीन होते तो 'विराम' असाही होतो.
(३९) विरजः : विकाररहित - ज्याच्यामधील रजोगुणात्मक चांचल्य पूर्णपणे नाहिसे झाले आहे असा. बाह्य जगतातील वस्तूमात्राबरोबर मन जेव्हां संलग्न होते तेंव्हा ते अत्यंत चंचल होते. शुद्ध आत्मस्वरूपाला अशी कुठलीही संलग्नता नाही. म्हणूनच तो परमात्मा वि-रज अर्थात् वासनाशून्य आहे.
(३९) मार्गः :  - पंथ. ज्याला जाणण्याकरतां दुसरा कुठलाही पंथ नाही. पूर्ण मुक्ती प्राप्त करण्याकरितां परमात्मस्वरूप नारायणाच्या स्वरूपाचे ज्ञान करून घेण्याखेरीज दुसरा कुठलाही मार्ग नाही.
(३९) नेयः :  - मार्गदर्शक - मार्गावरून नेणारा. जो मार्गदर्शन करतो आणि साधकांना अंतिम सत्याचे ज्ञान करवितो तो प्रत्यक्ष महाविष्णु, ते सगुणब्रह्म होय. त्या नारायणाला शरण गेले असतां साधकाला आंतरिक एकाग्रता प्राप्त होते. व त्या एकाग्रतेच्या सहाय्याने तो ध्याता (ध्यान करणारा) होतो. व ध्यानाचे सहाय्याने परमोच्च तत्व प्राप्त करतो. म्हणून महाविष्णूस येथे 'नेय' म्हटले आहे.
     तसेच या संज्ञेचा दुसरा अर्थ जो परमोच्च अवस्थेला नेला जातो तो 'नेय' असाही होतो. जीव आपल्या स्वरूपाचे ज्ञान करून घेण्याचा प्रयत्‍न करत असतो व ते स्वरूप आहे त्याचा आत्मा ज्याने आपल्या असत् विचारांच्या आसक्तिचा त्याग केला आहे व ध्यान साधनेने स्वतःस जीवंत आनंदात स्थिर केले आहे तोच जीव उन्नत जाणीवेच्या प्रवेशद्वाराकडे जाण्यास योग्य होतो. तो जीव अर्थातच परमात्म स्वरूपच होतो. म्हणून त्या परमात्म स्वरूपालाच येथे 'जीव' (नेय) असे म्हटले आहे.[3]
(३९) नयः :  - जो नेतो तो. खरा साधक जेव्हा सावकाश परंतु निरंतर प्रयत्‍नानें बाह्य जगतापासून स्वतःस मुक्त करूं लागतो तेव्हां हळूहळू तो परमात्मस्वरूपाच्या उच्चतर व सुक्ष्म अवस्थेकडे नेला जातो. परमात्म्याच्या कृपेने आत्मबलानेच त्याला मार्गदर्शन केले जाते म्हणून तो नय - नेणारा (नेता) आहे.
(४००) अनयः : - जेव्हा जीवात्म्यास स्वतः परमात्मा (नय) अवस्थेकडे नेतो तोच जीवात्मा ती अवस्था प्राप्त करतो तेव्हा त्यास पुढे कुठल्याही मार्गदर्शकाची आवश्यकता राहात नाही. ईश्वर सर्वांचा मार्गदर्शक आहे परंतु त्याचा मार्गदर्शक कोणी नाही. कारण तो सर्वव्यापी असल्यामुळे त्याला 'पुढे' नेणारा असा कोणी असू शकत नाही. तो सर्व वेळी सर्व ठिकाणी असतोच.
(४०) वीरः :  - पराक्रमी. जो आपल्या पराक्रमानें राक्षसांच्या हृदयांत भीती निर्माण करतो तों 'वीर'.
(४०) शक्तिमतांश्रेष्ठः :  - शक्तिमंतांहूनही श्रेष्ठ शक्तिमान्. अस्तित्वात असलेल्या सर्व शक्तिंचा ३ वर्गामध्ये समावेश केला आहे. ते वर्ग असे (१) ज्ञानशक्ति (२) इच्छाशक्ति (३) क्रियाशक्ति. ह्या सर्वशक्ति आत्म- स्वरूपाच्याच असून अनुक्रमे ज्ञानशक्ति बुद्धिमधून, इच्छाशक्ति अंतर्मनातून व क्रियाशक्ति शरीरातून व्यक्त होते अर्थात आत्मस्वरूप हेच सर्वशक्तिमान् असून सर्व शक्ति त्याचेच स्वरूप आहेत.
(४०) धर्मः :  - ही संज्ञा हिदू तत्त्वज्ञानामध्ये असंख्य अर्थाने वापरली जाते व अपरिपक्व विद्यार्थ्याचे मनांत तिचा अर्थ गोंधळांत लुप्त होतो. धर्म असे तत्व आहे की जिच्यामुळे वस्तूचे अस्तित्व (असणे) टिकते व त्या तत्वा अभावी वस्तूचे अस्तित्व राहू शकत नाही. म्हणूनच धर्म या शद्बाचा अर्थ 'अस्तित्वाचा नियम'असा केला जातो. जसे सूर्याचा धर्म प्रकाश, अग्निचा धर्म उष्णता, साखरेचा धर्म गोडपणा. मग व्यक्तीचा, मानवाचा धर्म कोणता? व्यक्तिचा धर्म त्याचे 'आत्मस्वरूप' होय. कारण त्याच्यावाचून व्यक्तिचे अस्तित्व असूच शकत नाही व व्यक्तिच्या ज्या शारीरिक, मानसिक व बौद्धिक संवेदना व्यक्त होतात त्यासर्व या माध्यमातून होणारे आत्मतत्वाचे प्रकटन असते. म्हणूनच सर्व व्यक्तिंचा धर्म म्हणजे त्यांचे 'आत्मतत्व'च होय.
     [4] कुठल्याही वस्तूचा अत्यावश्यक धर्म म्हणजे जे तत्त्व त्या वस्तूचे अस्तित्व टिकवते. आत्मतत्व हे सर्व वस्तूंचे ठिकाणी राहून त्यांना धारण करते म्हणून तोच सर्वांचा मुख्य धर्म आहे असे समजले जाते.
(४०) धर्मविदुत्तमः :  - 'जो सत्य जाणणार्‍यामध्ये सर्वश्रेष्ठ आहे तो'. ज्यांना सत्य प्रतीती झालेली असते ते आत्मस्वरूप जाणतातच ( आत्मस्वरूप होतात) अर्थात ते आत्मस्वरूपच धर्म जाणणाऱ्यांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे.



[1]   रमन्ते योगिनो अस्मिन् इति रामः ।
[2]     रमन्ते योगिनोऽनन्ते नित्यानन्दे चिदात्मनि ॥ (पद्मपुराण)
[3]   ब्रह्मवित् ब्रह्मैव भवति । उपनिषद्
[4]  धारयति इति धर्मः । देवैरत्रापि विचिकित्सितं पुरा- नहि सुविज्ञेयमणुरेष धर्मः  । ( कठोपनिषत्)

No comments: