24 June, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक ४५

ऋतुः सुदर्शनः कालः परमेष्ठी परिग्रहः 
उग्रः संवत्सरो दक्षो विश्रामो विश्वदक्षिणः 
(४१) ऋतुः :  - भगवान् श्रीविष्णु कालाचे आधिपती असल्याने तेचच ऋतुचेही संचालन करतात.
(४१) सुदर्शनः :  - पूर्ण भक्तिमय अंतःकरण झाल्यास भक्तांना जो सुलभतेने दर्शन देतो तो सुदर्शन. किवा ज्याच्या पवित्र दर्शनाने भक्तांच्या सर्व लौकीक चिंता नाहीशा होतात तो.
(४१) कालः :  - जो प्रत्येक प्राणीमात्रांमधील गुण व अवगुण यांची गणना करतो व त्या प्रमाणे फलप्रदान करतो तो 'काल' श्रीविष्णु होय.[1] तसेच भगवत् गीतेत म्हटले आहे 'मी गणना करणारांमध्ये  काल आहे.[2] 'काल' ही मृत्यु देवतेची संज्ञा आहे. या दृष्टिने पाहता सर्व शत्रूना जो मृत्यू स्वरूपात प्रकट होतो तो काल भगवान् विष्णु होय.
(४१) परमेष्ठि :  - जो आपल्या अपार महिम्याचाही केंद्रस्थित आहे असा परमेष्ठि श्रीविष्णु. किवा जो हृदयाकाशामध्ये असल्याने अनुभवास अत्यंत सुलभ आहे तो.[3]
(४२०) परिग्रहः :  - ग्रहण करणारा. आपल्या भक्तांनी दिलेली अगदी सामान्य वस्तू, एकादे पान फूलही जो अत्यंत [4] समाधानानें ग्रहण करतो तो. कांही टीकाकार ह्या संज्ञेचा विस्तारित अर्थ असा करतात की 'सर्व भक्तांचा जो एकमेव आश्रय आहे तो परिग्रह श्रीविष्णु होय.
(४२) उग्रः :  - भयकारी, जे अत्यंत निंदनीय व दुष्ट आहेत अशांच्या हृदयांत भीती निर्माण करतो तो उग्र[5] किवा उपनिषदांमध्ये निर्देशित केल्याप्रमाणे, ' ज्याच्या भीतीने अग्नि जळतो, ज्याच्या भीतीने सूर्य प्रकाशतो, ज्याच्या भीतीने इंद्र, वायु, मृत्यु आपापले कार्य करण्यास प्रवृत्त होतात तो श्रीमहाविष्णु उग्र आहे.
(४२) संवत्सरः :  - वर्ष. जो सर्व प्राणीमात्रांचे वस्तीस्थान आहे असा. कालाच्या विशिष्ठ विस्तारामध्ये प्राणी जगतात [6] आणि अनुभव ग्रहण करतात म्हणून तो संवत्सर- वर्ष आहे. (संवयति)
(४२) दक्षः :  - कार्यकुशल. जो ब्रह्मांडाच्या उत्पत्ति स्थिती लयाचे कार्य अत्यंत सहजतेने, कौशल्याने, मेहेनतीने व प्रतिज्ञापूर्वक करतो तो 'दक्ष' श्रीविष्णु.
(४२) विश्रामः :  - विश्रांतीचे स्थान, शांत अवस्था. ज्या अवस्थेमध्ये गेले असतां संसाराने त्रस्त झालेल्या व्यक्तिंना पूर्ण विश्रांतीचा लाभ होतो व शांतता वाटते ती सर्वश्रेष्ठ आत्मस्थिती म्हणजे 'श्रीनारायणच' होय.
(४२) विश्वदक्षिणः :  - जो अत्यंत कुशल असून तत्पर आहे असा. सर्व कार्य प्रवृत्त सजीवांच्या ठिकाणी असलेली कार्यप्रवृत्ती व कार्यकौशल्य हे त्याचेच प्रकटन आहे. कारण तोच ह्या सर्व कर्तृत्वाचा व कौशल्याचा उगम आहे. तोच या सर्व विश्वाचा कर्ता, पालनकर्ता व रक्षणकर्ता असल्याने अर्थातच सर्व प्राणीमात्रांचा अधिक्षक व नियंता आहे.



[1]   कलयति इति कालः
[2]   कालः कलयतामहम्
[3]   परमे व्योम्नि प्रतिष्ठितः । (कठोपनिषत्)
[4]  पत्रं पुष्पं फलं तोयं योमे भक्त्या प्रयच्छति । तदहं भक्त्युपहृतं अश्नामि प्रयतात्मनः  ।। (गीता ९-२६)
[5]  भयादस्याग्निस्तपति भयात्तपति सूर्यः  । भयादिन्द्रश्च वायुश्च मृत्युर्धावतिपंचमः  ।। (कठ २-५-३)
[6]  सम्यक् वसन्ति भूतानि यस्मिन् इति संवत्सरः 

No comments: