08 June, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक ४१


उद्भवः क्षोभणो देवः श्रीगर्भः परमेश्वरः ।
करणं कारणं कर्ता विकर्ता गहनो गुहः  ।।
(३७) उद्भवः :  - उत्पत्तिकर्ता - परमात्मा जगताचे उपादान कारण असल्याने त्याच्यापासूनच सर्व सृष्टिची उत्पत्ति झाली आहे. अर्थात् तो ब्रह्मांडाचे मूळ कारण आहे. दुसरा अर्थ असा होईल की, ' जीवांच्या स्वतःच्या वासंनामुळे अगणित जीवांच्या रूपाने तो पुनःपुन्हा उत्पन्न होत रहातो तो.
(३७) क्षोभणः :  - क्षुब्धता उत्पन्न करणारा - जर उपकरणांमध्ये त्याचे अस्तित्व नसतेच तर उपकरणे (साधने) कार्यकारी झालीच नसती; व कार्यही पूर्ण झाले नसते. तो परमात्मा शुद्धचैतन्यरूपाने जडप्रकृती व चेतन पुरूष या दोघांसही प्रेरित करतो (क्षुब्ध करतो) व संपूर्ण जीवांची (जगताची) उत्पत्ती घडवून आणतो व त्याचेमुळे जगत् पुढे गतीशील रहाते. जर चैतन्यतत्व नसतेच तर जीवनाचे कोणतेच लक्षण अगर हालचाल तिथे दिसून आली नसती. सर्व वस्तूजात पूर्णतया निर्जीव व संवदनाशून्य राहिले असते. तोच परमात्मा चैतन्य देत असल्याने हे संपूर्ण जगत् इतके सौदर्यपूर्णरित्या जीवनाने स्पंदित झाले आहे. म्हणूनच त्याला 'क्षोभण' अशी संज्ञा प्राप्त झाली आहे.
(३७) देवः :  - जो प्रकट करतो, होतो तो देव. संस्कृतमध्ये दीव्यति या शद्बाचे -  'जिंकणे, चमकणे, स्तुती करणे असे अनेक अर्थ होतात. म्हणूनच श्रीविष्णुला देव म्हटले आहे ते सार्थकच आहे. आपल्या उत्पत्ति-स्थिती-लयाच्या कार्यातून तो एक क्रीडाच करीत असतो. तो विश्वचैतन्य रूपानें चमकतो व सर्व प्राणीमात्रांतून प्रकाशमान् होतो. म्हणूनच सर्व भक्तांकडून त्याचीच स्तुती केली जाते. श्वेताश्वेतरोपनिषद म्हणते, 'येथे एकच देव आहे.
(३७) श्रीगर्भः :  - ज्याच्यामध्ये सर्व ऐश्वर्य समाविष्ट झाले आहे तो 'श्रीविष्णु'. हे संपूर्ण विश्व हे त्याचेच वैभव आहे. व हे विश्व त्यामध्येच राहते. अर्थातच विश्वातील सर्व शक्ति आणि मूर्तीमंत झालेले वैभव त्याचेमध्येच असते .
(३७) परमेश्वरः :  - परम ईश्वर. कांही आत्यंतिक धर्मवेडे या शद्बाचा असा अर्थ करतात की, 'ईश्वर एकच आहे आणि त्याच्या संबंधीच्या इतर सर्व कल्पना चुकीच्या आहेत. परंतु आपल्या उदार अंतःकरण असलेल्या पूर्वीचा सहिष्णु ऋषींना हे मान्य नाही. तो परमईश्वर म्हणजेच विश्वात्मक चैतन्य व इतर देवता ह्या त्याचेच व्यक्तरूप आहेत. ईश्वर ही संज्ञा सामर्थ्य व ऐश्वर्य निर्देशित करते. अर्थातच परमेश्वर म्हणजे सर्व शक्तिमान् व सर्व ऐश्वर्य असलेला असा तो भगवान् 'श्रीविष्णु'.
(३७) करणम् :  - उपकरण - साधन. एकादे कार्य पूर्ण करण्याकरतां अत्यंत [1]उपयुक्त होणार्‍या वस्तूला उपकरण अगर साधन म्हणतात. जगताच्या उत्पत्तिचे तों 'निमित्त कारण' आहे.
(३७) कारणम् :  - कारण. हेतु. या आधीच्या संज्ञेत तो सर्व विश्वाचे निमित्त कारण आहे हे स्पष्ट झाले आहे. आता ह्या संज्ञेने असे स्पष्ट केले आहे की तो संपूर्ण विश्वाचे उपादान कारणही आहे. ह्या ठिकाणी कारण अशीच संज्ञा वापरली असल्यानें असे सुचविले आहे की तो केवळ उपादान (आधार) कारणच नाहीतर त्याचवेळी निमित्तकारणही आहे. उपादान कारण या संज्ञेने असे सांगतात की सर्व विश्वाची उत्पत्ति त्याचेपासून होते तर दुसरी संज्ञा असे सुचविते की विश्वाची व्यक्त दशा होण्यास तोच कारणीभूत होतो.
(३८०) कर्ता :  - कार्य करणारा. त्याच्या अस्तित्वामुळेच केवळ सर्व क्रिया हो शकतात तोच कर्ता होय. जरी उपकरणांच्या द्वारा कार्य होत असते असे म्हटले जाते तरी विषेशत्वाने आत्म्यालाच कर्ता म्हटले जाते. जो स्वतंत्रपणे उत्पत्ति-स्थिती-लयाचे कार्य करतो [2]तो कर्ता 'श्रीविष्णु' होय.
(३८) विकर्ता :  - ज्याने विश्व परिपूर्ण आहे अशा असंख्य विविधता निर्माण करतो तो विकर्ता (विचित्रं भुवनं क्रियते इति विकर्ता) किवा ज्याने स्वतःमधूनच असंख्य अवतार मालिका व्यक्त केल्या तो भगयान् श्रीविष्णु 'विकर्ता' आहे असाही अर्थ होऊ शकतो.
(३८) गहनः :  - जाणता येत नाही असा. जाणण्याच्या कुठल्याही साधनानें ज्याचे संपूर्ण ज्ञान होत नाही असा. तो जाणण्याचा विषय होऊ शकत नाही तर स्वतःच सर्व इंद्रियांतील ज्ञाता आहे.
(३८) गुहः :  - जो हृदयाच्या गुहेत रहातो तो गुहः म्हणजेच तो प्रत्येक प्राणीमात्राच्या अगदी अंतस्थ आहे. तो सर्व उपकरणांनी व आवरणांनी झाकला गेला आहे त्यामुळे आपल्या धर्मग्रंथात तो अंतःकरणाच्या गुहेत रहातो असे वर्णन आलेले आहे. [3] स्मृतीमध्ये असे वर्णन आहे की 'हा श्रेष्ठ पुरूष सर्वेश्वर असून, सर्वसाक्षी होऊन गूढपणे अंतस्थ गुहेत रहातो. मुंडकोपनिषत् म्हणते, 'निहितं गुहायाम्' भगवान् [4]गीतेमध्ये स्वतःही म्हणतात की, ' मी सर्वांना ज्ञात होत नाही कारण मी माझ्याच मायेने झाकलेला आहे.'
 


[1]   वैय्याकरणी याची उकल अशी करतात – साधनतमं करणम्
[2]  पाणिनी म्हणतात - ’स्वतन्त्रः कर्ता ।
[3]       गूढो गुहाशयः साक्षी महापुरूष ईश्वरः । (विष्णु भागवत १०-३७-११)
[4]       नाहं प्रकाशः सर्वस्य योगमायासमावृत्तः ।

No comments: