12 June, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक ४२


व्यवसायो व्यवस्थानः संस्थानः स्थानदो ध्रुवः 
परर्द्धि परमस्पष्टस्तुष्टः पुष्टः शुभेक्षणः  ।।
(३८) व्यवसायः :  - सुनिश्चित. स्वतः शुद्ध ज्ञानस्वरूप असल्यामुळे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे विक्षेप नाहीत अर्थात त्याचे ज्ञान सुनिश्चित आहे. संभ्रमित मन व अपरिपक्व बुद्धि यांच्याच मुळे अनिश्चितता येते. व्यवसाय या संज्ञेचा दुसरा अर्थ होतो 'योग' व याच अर्थाने तो गीतेमध्ये योजलेला आहे. योगसाधना करणार्‍याची बुद्धि [1] 'एकाग्र' झालेली असते. त्यामुळे तिच्यात कुठलीही अनिश्चितता नसते.
     [2]सत्ता व ऐश्वर्य भोग यांच्यामागे लागलेल्यांच्या वृत्तींवर टीका करताना त्याच अध्यायांत कृष्णाने  असेही म्हटले आहे की ' जे त्याच इंद्रियाच्या सुखामध्ये गरगरत रहातात व त्यामुळे ज्यांच्या बुद्धिची स्थिरता नाहीशी झालेली असते ते योग साधनेला आवश्यक असलेले सातत्य व शांतमन प्राप्त करूं शकत नाहीत.
ध्येय प्राप्ती होईपर्यंत त्यादिशेने सतत कार्यरत रहाणे यालाच 'निश्चय' म्हणतात. एकाच ठिकाणी सातत्याने स्वतःला जोडून ठेवणे म्हणजेच इतर अनात्म वस्तूंपासूनची आपली एकरूपता नाहीशी करणे व अशा तर्‍हेने आत्म स्वरूपाचे ज्ञान व अनुभूती होईपर्यंत प्रयत्नशील रहाणे यालाच 'योग' म्हणतात. म्हणूनच टीकाकार व्यवसाय या संज्ञेचा 'योग' असाही अर्थ करतात.
(३८) व्यवस्थानः :  - पाया किवा अधिष्ठान. विविधतेने नटलेल्या या विश्वाचा जो अंगभूत पाया आहे तो 'श्री महाविष्णु'. तो संपूर्ण विश्वाचे नियमन करतो व इतर घटकांना ते नियम पाळावयांस लावतो.
(३८) संस्थानः :  - सवोच्च स्थिती किवा सर्वोच्च अधिकारी किंवा ध्येय. प्रलयाचेवेळी नामरूपासहित सर्व वैचित्र्यपूर्ण विश्वाला आपल्यामध्ये जो सामावून घेतो तो. किवा ज्या स्थानामध्ये सर्व संवेदना, भावना, विचार विलय पावून सुषुप्त होतात ती स्थिती म्हणजेच 'संस्थान'. थोडक्यात लयावस्थेमध्ये किवा सर्वातीत अवस्थेमध्ये तो अनेक भेद नाहीसे करून अभेद स्थिती आणतो व आपणामध्ये सर्वांचा (नामरूपादिकांचा) लय करतो तो श्रीविष्णू संस्थान आहे.
(३८) स्थानदः :  - जो योग्यस्थान प्रदान करतो तो. प्रत्येक प्राणीमात्र आपापल्या विचार व कर्मा प्रमाणे वासना [3] निर्माण करीत असतो. व त्या वासंनांप्रमाणेच त्याला जन्म प्राप्त होत असतो. अर्थातच प्रत्येक जीवाला योग्य असे[4] 'स्थान' मिळते व ते देणारा नारायण 'स्थानद' आहे. परमात्मा हा कर्मफल दाता आहे.
(३८) ध्रुवः :  - स्थिर किवा दृढ. जो अनेक बदलणार्‍या स्थितीमध्येही न बदलतां स्थिर रहातो तो. सर्व नाशवंत [5] वस्तूंमध्येही अविनाशी असतो तो 'ध्रुव' श्रीविष्णु आहे. शरीर, मन बुद्धि व बाह्य जगत हे सतत बदलणारे व [6] अस्थिर आहे. परंतु आपल्याला या सर्वांचे ज्ञान करून देणारे चैतन्य किवा आत्मप्रकाश न बदलणाराच आहे.
(३८) परर्द्धि :  - ज्याचा अविष्कार परमश्रेष्ठ आहे असा (ऋद्धि). भगवंताच्या विभूती ह्या भगवंताचे दिव्य अविष्कारच आहेत आणि गीतेमध्ये उधृत केल्याप्रमाणे भगवंताच्या सर्व विभूती अत्यंत दिव्यभव्य आहेत. (दिव्या ह्यात्माविभूतय:  - गीता १०)
(३९) परमस्पष्ट :  - जो अत्यंत स्पष्ट आहे असा. ध्यानाचा यशस्वीरित्या अभ्यास केल्यानें आपल्या मनातील सर्व विक्षेप निर्माण करणारे विचार प्रवाह व चंचलता यावर ज्यानी विजय मिळवला आहे अशा साधकांना तो अत्यंत 'स्पष्ट' आहे. तो आपलेच 'आत्मतत्व' असल्यानें वास्तविक त्याच्याइतके स्पष्ट असे दुसरे कांहीच नाही. म्हणजेच तो विशुद्ध चैतन्य असल्यानें स्वतःच प्रकाशमान आहे. या आत्मप्रकाशावाचून बाह्य जगतातील किवा अंतर्जगतातील कुठलाच अनुभव घेणे शक्य होणार नाही. अगदी आपल्या व्यक्तित्वाचे होणारे स्वभाव हे सुद्धा त्याच आत्मप्रकाशाचे प्रतिबिंब आहे.तोच प्रत्येक प्राणीमात्राचा आत्मा आहे व व्यक्तित्वाचे सारभूत तत्त्व असल्याने तो परमस्पष्ट आहे असे म्हटले आहे.
(३९) तुष्टः :  - जो नेहमीच अत्यंत तृप्त आहे असा. भक्ताने अर्पण केलेल्या अत्यंत स्वल्प अशा नैवेद्यानेही तो पूर्ण [7] समाधान पावतो. 'प्रयत्नशील अशा भक्ताने मला भक्तिने अर्पण केलेले एकादे पान , फूल, फळ अगर थोडसे जलही मी आनंदाने स्विकारतो' असे भगवान् श्रीकृष्ण गीतेमध्ये आश्वासन देतात. ते आत्मतत्व शरीर मन बुद्धि यांचे पलिकडे असल्यानें त्यामध्ये कुठलीही अपूर्णता अगर कमतरता असण्याची शक्यताच नाही. कारण आत्म्याचे स्वरूपच 'स्वतः परिपूर्ण' असे आहे; व ते नित्य तसेच असल्याने तो स्वतः परमानंद आहे म्हणूनच त्याचे स्वरूपही सदैव तुष्ट आहे.
(३९) पुष्टः :  - जो स्वतः सदैव पूर्ण आहे असा. ते परमतत्व सर्वव्यापी असल्यानें अर्थातच नित्य परीपूर्ण आहे.  [8]त्याचेमधून कांही कमी करतां येत नाही अगर त्याचेमध्ये काही समाविष्ट करता येत नाही. ते सदाच परिपूर्ण असल्याने संपूर्ण दृश्य विश्वाची उत्पत्ति त्याच्यातून होऊन सुद्धा त्याच्यामध्ये कुठलीही अपूर्णता येत नाही.
(३९) शुभेक्षणः :  - ज्याची दृष्टी सदैव अत्यंत शुभ आहे असा. ज्याची दृष्टि भक्तांवर केवळ मांगल्याचा वर्षाव करते तो 'शुभेक्षण' आहे. तो आत्मा सर्व वासनांचे पलिकडे आहे व ज्या साधकाला त्याचे ज्ञान होते तो वासनातीत झाल्याने पापमुक्त होतो. मोक्षमार्गावरून चालणारा साधक आत्मदर्शनाकडे वाटचाल करतांना आपले अंतःकरण सर्व पापवासनांपासून शुद्ध करण्याचा प्रयत्न करतो. अर्थातच तो आपले जीवन शरीर-मन-बुद्धिच्या संवेदनांपासून मुक्त- शुद्ध करतो (शुभ-इक्षण).



[1]     व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह कुरुनंदन 
[2]        भोगैश्वर्यप्रसक्तानां तयापहृत चेतसाम् । व्यवसायात्मिका बुद्धि समाधौ नविधियते ।। (गीता २-४४)
[3]   यथाकर्म यथाश्रुतम ( कठोपनिषत् २-५-७)
[4]        कर्मफलदाता ईश्वरो नारायणः ।
[5]     नित्योनित्यानाम्  । (कंठोपनिषत् २-५-१३)
[6]         चेतनश्चेतनानाम् ( कंठ २-५-१३)
[7] पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति । तदहं भक्त्युपहृतं अश्नामि प्रयतात्मनः  ।। गीता ९
[8]   पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ।

No comments: