20 June, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक ४४

वैकुण्ठः पुरुषः प्राणः प्राणदः प्रणवः पृथुः 
हिरण्यगर्भः शत्रुघ्नो व्याप्तो वायुरधोक्षजः  ।।
(४०) वैकुण्ठः :  - मनुष्यांची अयोग्य मार्गात इतस्ततः होणारी गती कुंठीत करणारा तो 'वैकुंठ'. महाभारतात असा उल्लेख आहे की 'मी पृथ्वीला जलतत्वाशी संयोजित केले, [1] आकाश व वायु यांना जोडले व वायूला अग्नि बरोबर जोडून ठेवले त्यामुळे मला वैकुंठ हे नाम प्राप्त झाले.
(४०) पुरुषः :  - जो सर्व शरीरांत (पुरींमध्ये) रहातो तो पुरुष.[2] बृहदारण्यक उपनिषदांत म्हटले आहे की जो सर्वांच्या पूर्वीचा असून अग्नि रूपाने सर्व पाप त्याने नाहीसे केले (औषत्) म्हणून त्याला पुरूष म्हटले जाते. अर्थात् तोच सर्व सजीवांमध्ये सर्व काल सर्व ठिकाणी राहतो व प्रेरणा देतो.
(४०) प्राणः :  - जो प्राण स्वरूपांत सर्व सजीवांमध्ये राहून त्यांच्या इंद्रिंयामार्फत त्यांच्या कार्यक्षेत्रात कार्यरत असतो तो. विष्णुपुराणांत तोच श्रीविष्णु पंच प्राणांचे स्वरूपांने सर्व शरीराला चालना देतो असे म्हटले आहे. प्राण स्वरूपाने तोच हालचाल घडवितो.
(४०) प्राणदः :  - या संज्ञेचे दोन अर्थ होतात (१) जो प्राण अर्पण करतो तो व (२) जो प्राण हरण करतो तो. कारण 'द' या मूळ क्रियापदाचे देणे किवा तोडणे असे दोन अर्थ होतात. म्हणून परमात्मा विष्णूच सर्व जीवांना उत्पत्तिचेवेळी प्राणदान करतो व प्रलयाचे वेळी प्राणांची हालचाल थांबवितो.
(४०) प्रणवः :  - ज्याचे सर्व देवांकडून नमन (प्रणमन) केले जाते किवा स्तुति केली जाते तो 'प्रणवः'. सनतकुमार असे उदघोषित करतात की [3]'त्या परमात्म्याचे सर्व देव नमन पूजन करतात व स्तवन करतात, म्हणून तोच प्रणव आहे. ह्या सत्याचे प्रतिपादन वेदांमध्ये '''' ह्या प्रतिकाने केलेले आहे. अर्थातच काराला प्रणव म्हटले आहे. व तो परमात्माच कारस्वरूप विष्णु आहे.
(४०) पृथुः :  - जो विस्तारलेला आहे तो. ज्याचा विस्तार अनंत जगताच्या आकाराने, स्वरूपाने प्रकट झाला आहे असा. अर्थात् तो सर्व व्यापी आहे. पुराणांचे मते तो पूर्वी वेन राजाच्या पुत्राच्या रूपाने पृथुच्या रूपाने जन्मास आला व त्याने ह्या भूमीवर सर्व समृद्धी आणली तोच श्रीविष्णु नारायण होय.[4]
(४१) हिरण्यगर्भः :  - वेदांतामध्ये ही संज्ञा सृष्टिकर्ता या अर्थी उपयोजिली आहे. (ब्रह्मदेव) व ती परमात्मा नारायणाची 'सृजनशक्ती' सूचित करते. ज्यामधून सर्व व्यक्त जग प्रकट होते, उत्पन्न होते त्या सृष्टिकर्त्यास ह्या ठिकाणी हिरण्य-गर्भ असे म्हटले आहे. अर्थात ह्या संज्ञेने असे सूचित होते की सृष्टिकर्त्याची (ब्रह्मदेवाची) संपूर्ण सृजनशक्ती ही त्या परमात्मा नारायणाच्याच शक्तिचे प्रकटन आहे.
(४१) शत्रुघ्नः :  - शत्रुंचा नाश करणारा. भगवंत देवांच्या सर्व शत्रूंचा नाश करतो याचाच अर्थ असा की भगवंतास पूर्ण शरणागत असलेल्या साधकांच्या मनांतील सर्व अनिष्ट विकार नाहीसे करतो तो शत्रुघ्न 'श्रीमहाविष्णु'.
(४१) व्याप्तः :  - सर्वव्यापी. कार्य हे कारणांखेरीज असू शकत नाही व कारण हे कार्यामध्ये नेहमीच अतंर्भूत व सुसंगत असते. अर्थातच हे विश्व ज्या अनंतापासून उत्पन्न झाले आहे त्या अनंतानेच व्याप्त झालेले असणार. म्हणूच जो सर्वव्यापी आहे तोच श्रीविष्णु होय.
(४१) वायुः :  - जो प्राणवायूच्या रूपानें सर्व ठिकाणी, सर्व सजीवांना चेतनता देतो तो. अर्थातच तो केवळ वायू नव्हे तर त्या वायू मधील चैतन्यदायी शक्ति होय.
(४१) अधोक्षजः :  - महाभारतात म्हटले आहे, 'माझी शक्ति केव्हांही [5]अधोमुख होन वहात नाही म्हणून मी अधोक्षज म्हणून ओळखला जातो.
     तसेच जो ज्ञानेंद्रियांच्या शक्तिने प्राप्त हो शकत नाही तो अधोक्षज असाही अर्थ हो शकतो. किवा असा अर्थ होईल की अध (पृथ्वी) व अक्ष (आकाश) यांच्याखाली (मध्ये) राहून त्यांना आधार देतो तो भगवान् श्रीविष्णु 'अधोक्षज' होय.



[1]    मयासंश्लेषिता भूमिरद्भिर्व्योम चवायुना । वायुञ्चतेजसा सार्ध वैकुंठश्च ततोमम  ।।
[2]   पुरीशयनात् पुरुषः ।
[3]  प्रणवन्ति ह्यमुं देवास्तस्मात् प्रणव उच्यते ।
[4]  अत्र तु प्रथमो राज्ञां पुमान् प्रथयिता यशः । पृथुनमि महाराज्ञो भविष्यति पृथुश्रवाः ॥
[5]   अधो न क्षीयते जातु यस्मात् तस्माधोक्षजः । (महा. उद्योग ७१.१०)

No comments: