04 June, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक ४०

विक्षरो रोहितो मार्गो हेतुर्दामोदरः सहः 
महीधरो महाभागो वेगवानमिताशनः ।।
(३६) विक्षरः :  - क्षर म्हणजे झिजणारे, नाशिवंत. विक्षर म्हणजे जे कधीही नाश पावत नाही ते. जेव्हा परमतत्वाच्या अव्यक्त अवस्थेचे ध्यान मनन केले जाते तेव्हा ही संज्ञा सतत वापरली जाते. सर्व जडवस्तू या कालाशी बद्ध असल्यानें कालांतराने नष्ट पावतात. परंतु परमात्मा हा स्व-रूप आत्मा असल्यानें कधीही बदलत नाही. म्हणूनच तो अक्षर - विक्षर आहे.
(३६) रोहितः :  - रोहित म्हणजे मासा. भगवान् विष्णुचा पहिला अवतार हा मत्स्यरूप होता त्यामुळे श्रीविष्णुला हे नामाभिधान प्राप्त झाले. सर्व जगत ज्यावेळी प्रलयामध्ये बुडत होते तेंव्हा त्यामध्ये जीवंत राहू शकतील असे प्राणी म्हणजे मासे . त्यामुळे त्याअवस्थेत भगवंत ह्याच स्वरूपांत प्रकट होऊ शकले. म्हणून सर्व प्राणीमात्रांच्या सेवेकरतां माशामध्ये जो 'रोहित मासा' होऊन प्रकट झाला तो भगवान श्रीविष्णु, असे ही संज्ञा सुचविते.
(३६) मार्गः :  - मार्ग - पंथ. नामरूपातीत असे भगवंताचे स्वरूप आकलन होण्याकरतां आधी मानवाला त्याचे आकारासहित दिव्यरूप समजून घ्यावे लागते व ते दिव्यरूप आहे श्रीविष्णु. त्यामुळेच तो 'मार्ग' ही आहे व ध्येय (गंतव्य) ही आहे. ज्या सर्वश्रेष्ठ परमतत्वाचे स्वरूप जाणण्याकरतां उच्चतत्त्वाची साधना करणारे साधक ध्यान करतात तो आहे भगवान् श्री विष्णु.
(३६) हेतुः :  - कारण. सर्व ब्रह्मांडाचे कारण आहे श्रीविष्णु. तो एकाचवेळी त्याचे उपादान कारण व निमित्त कारणही आहे. तोच सर्व ब्रह्मांडाच्या उत्पत्तिचा एकमेव कुशल कार्यकर्ता आहे म्हणून त्याला 'हेतु' असे म्हटले आहे.
(३६) दामोदरः :  - शमदमादिंनी शुद्ध झालेल्या अंतःकरणानें (उदर) जो जाणला जातो तो महाविष्णु म्हणजेच दामोदर असे ही संज्ञा सुचविते. महाभारत म्हणते 'दमाने जाणला जातो तो दामोदर.'[1] तसेच ब्रह्मपुराणांत वर्णन केलेला प्रसंग म्हणजे कृष्ण अवतारांत लहानपणी ज्याच्या उदराला दोराने (दाम) बांधले होते तो भगवान् विष्णु म्हणजेच दामोदर. तिसरा अर्थ होतो की ज्याच्या उदरांत सर्व ब्रह्मांड विसावले आहे तो.[2]
(३६) सहः :  - सर्व सहन करणारा. तो आपल्या भक्तांचे सर्व अपराध अगर दोष सहजतेनें सहन करून क्षमाही करतो म्हणून तो सहः श्रीविष्णु.
(३६) महीधरः :  - पृथ्वीस धारण करणारा किवा आधार देणारा. तोच सृष्टिचे उपादान कारण असल्यानें तोच तिचे 'स्वत्व' आहे. अर्थात सर्व साकार सृष्टिचा तो आधार आहेच. ज्या प्रमाणे सोने अलंकाराचा आधार असते, कापूस वस्त्राचा आधार असतो किवा सागर लाटांचा आधार असतो त्याप्रमाणे तो परमात्मा जगाचा  आधार आहे.
(३७०) महाभागः :  - ज्याचे सर्व भाग ( अवयव) महान् सौंदर्ययुक्त आहेत असा, किवा जो नेहमीच महाभाग्यवान् आहे किवा ज्याला सर्व यज्ञांमध्ये महाभाग (मोठा) मिळतो तो श्रीविष्णु.
(३७) वेगवान् :  - जो अतिशय गतिमान् आहे असा. भक्ताने प्रेमपूर्वक अंतःकरणाने स्मरण केले असता जो अतिशय  त्वरित आपल्या भक्ताकडे धाव घेतो तो. किंवा असेही सूचित होते कीजो सर्व व्यापी असल्यानें सर्वांत जास्त [3] गतीशील आहे असा. त्यामुळे त्याच्याहून जास्त गतीमान कोणीही नाही. ईशावास्योपनिषद सुचविते की तो मनांहूनही गतीमान आहे.
(३७) अमिताशनः :  - अमर्याद क्षुधा असलेला या संज्ञेचा शद्बशः अर्थ घेता येणार नाही. ज्यावेळी मन लौकिक मर्यादा ओलांडून आत्मानुभूतीचाअनुभव करीत असते तेंव्हा मनानी स्वतः निर्माण केलेल्या विविधपूर्ण जगताचा मनातच पूर्ण लोप होतो. ज्याप्रमाणे जागृतावस्थेतील व्यक्ति आपल्याच स्वप्नावस्थेतील जगताचा स्वतःमध्येच लोप करते त्याप्रमाणे तो परमआत्मा जणू कांही आपल्या अत्यंत वाढलेल्या क्षुधेने सर्व ब्रह्मांड मिळून टाकतो. अलंकारीक भाषेने सांगावयाचे तर प्रलयाचे वेळी तो जणू सर्व भक्षक होऊन द्वैताने भरलेले जग खावून टाकतो.
डॉ. सौ. उषा गुणे.




[1]   दमात् दामोदरं विदुः ।
[2]  दमानि लोकनामानि तानि यस्यउदरान्तरे । व्यासांच्या शब्दात.

[3]   नैतत् देवाः आप्नुवन् पूर्वमर्षत्  ।। इश. ४

No comments: