03 September, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक ६४


श्लोक ६५

अनिवर्ती निवृत्तात्मा संक्षेप्ता क्षेमकृच्छिवः 
श्रीवत्सवक्षाः श्रीवासः श्रीपतिः श्रीमतांवरः  ।।
(५९) अनिवर्ती :  - ज्याला निवर्तन म्हणजे पराभव कधी पत्करावा लागत नाही असा. सूर-असूरांचे युद्धांत नारायणाचा कधीही पराभव झालेला नाही. तसेच तो धर्मापासून कधीच परावृत्त होत नाही कारण तो धर्माचा रक्षक व प्रेमी आहे.
(५९) निवृत्तात्मा :  - ज्याने स्वतःला इंद्रिय विषय संबंधापासून पूर्णपणे निवृत्त केले आहे असा. जो पर्यंत आपले शरीर मन बुद्धि हे त्यांच्या विषयांत म्हणजेच वस्तू भावना विचारांच्या क्षेत्रांत भटकत असतात तो पर्यंत आत्मस्वरूपाचे ध्यान करण्याकरतां त्यांची उपलब्धता होऊ शकत नाही. श्रीनारायण हा सर्वांचे आंतर्यामी आत्मस्वरूपाने रहातो व त्याचेजवळ जाण्याकरतां आपल्यालाही ह्या आसक्तिच्या क्षेत्रातून निवृत्त होणे आवश्यक आहे म्हणून त्यालाच 'निवृत्तात्मा' म्हटले आहे.
(५९) संक्षेप्ता :  - सूक्ष्मरूपाने संक्षेप करतो तो. हे अनेकतेने विस्तारित झालेले विश्व प्रलयाचे वेळी तो  स्वतःमध्ये समाविष्ठ करतो म्हणून तो समावेशक आहे (संक्षेप्ता). श्री नारायण केवळ उत्क्रांतीचाच नव्हेतर अपक्रांतीचाही प्रेरक आहे. कांही पाठभेदांमध्ये ही संज्ञा 'असंक्षेप्ता' अशी वाचली जाते. त्याप्रमाणे तो आपल्या भक्तांचा कधीही संक्षेप (अधिक्षेप) करीत नाही तो असा अर्थही होईल.
(५९) क्षेमकृत् :  - कल्याणकर्ता. जो भक्तांचे रक्षण करतो व त्यास मार्गदर्शन करतो तो. ज्या वस्तूची प्राप्ती झालेली आहे त्याचे रक्षण संवर्धन यास क्षेम असे म्हणतात. ज्याची प्राप्ती झालेली नाही त्यासाठी प्रयत्न करणे यास योग म्हणतात. गीतेमध्ये भगवंतांनी 'मी खर्‍या भक्तांचा योग व क्षेम चालवितो' असे आश्वासन दिले आहे.[1]
(६००) शिवः :  - या ठिकाणी श्रीविष्णुलाच 'शिव' या संज्ञेने गौरविले आहे व तरीही सर्व वैष्णवपंथीय विष्णु सहस्रनामाचा पाठ करतात. मनुष्यकृत पूर्वग्रहांना कुठलाही तर्क किवा विचारसंगती नसते. श्रीनारायणच शिव म्हणजे सर्वमंगल आहे व त्या दोहोमध्ये कुठलेही भेद नाही. 'मी स्वतः विष्णु असून वैकुंठवासी आहे व आम्हामध्ये कुठलाही भेद नाही'[2] असे स्वतः भगवान् शंकर म्हणतात. विष्णुचे नामस्मरण हे मंगल पवित्र (शिव) करणारे आहे व त्याचे नामसंकीर्तन व ध्यान केले असतां मनोवृत्ती शांत होऊन परमतत्वाचे ग्रहणकरण्या इतके अंतःकरण सूक्ष्म व स्वच्छ होते.
(६०) श्रीवत्सवक्षाः :  - ज्याचे दिव्य व पवित्र वक्षावर 'श्रीवत्स' चिन्ह आहे असा.[3]
(६०) श्रीवासः :  - 'श्री'चे निवासस्थान. माता श्रीलक्ष्मीचे निवासस्थान. श्रीवसति अस्मिन् इति श्रीवासः । अशी या संज्ञेची व्युत्पत्ती होते. जे वक्षःस्थल प्रेम व सौंदर्याचे स्थान आहे तेथेच सर्व ऐश्वर्य व समृद्धि आश्रय घेते.
(६०) श्रीपतिः :  - श्री देवी लक्ष्मीचा पति. क्षिरसागराचे मंथनातून कमलपुष्प हातामध्ये धारण केलेली लक्ष्मी वर आली व तिने सर्व देवांमधून श्री विष्णुलाच आपला पति म्हणून निवडले. म्हणून श्रीनारायण श्रीपति झाले. श्वेताश्वतर उपनिषद [4]म्हणते, 'त्याची पराशक्ति अनंत आहे, विविध आहे. श्री म्हणजे वैश्विक पराशक्ति. चैतन्यस्वरूप श्रीनारायणच त्या शक्तिमधून तिला चालना देऊन कार्य करवून घेतो, व ते पूर्ण करतो.
(६०) श्रीमतां वरः :  - ऐश्वर्यवंतामध्येही श्रेष्ठ असा तो 'श्रीनारायण'. तैतिरीय ब्राम्हण सूत्रे सांगतात की, ' ऋक्, यजु व साम हे प्रज्ञावंतांचे नष्ट न पावणारे शाश्वत धन आहे.' (तैतिरीय १-२-१) अर्थात श्री या संज्ञेचा या ठिकाणी अर्थ झाला 'वेद'. श्रीनारायण शास्त्रे जाणणाऱ्यांमध्ये सर्वश्रेष्ठ ज्ञानी आहे. तो स्वतःच परमसत्य स्वरूप असल्याने वेदांचा मुख्य विषय तोच आहे. 'वर' याचा अर्थ जो उत्तम वर देतो तो. त्यामुळे या विवेचनार्थ घेतलेल्या संज्ञेचा दुसरा अर्थ होईल की ' जो आपल्या भक्तांना अगर वेदांच्या श्रेष्ठ अभ्यासकांना श्रेष्ठर संपत्ती देतो तो भगवान् विष्णु 'श्रीमतांवर' आहे.
डॉ. सौ. उषा गुणे.


[1] तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्

[2]    वैकुंठोऽहमहं विष्णुर्नावयो रस्ति वै भिदा  ।। श्री भागवत १० स्कं
[3]   पूर्वी एकदा ऋषींना ब्रह्मा विष्णू व महेशांपैकी सर्व श्रेष्ठ कोण हे ठरविण्याची इच्छा झाली व त्याप्रमाणे भृगुऋषींना अनुज्ञा मिळाली. ब्रह्मा व शिवशंकराचे श्रेष्ठत्व सिद्ध होऊ शकले नाही म्हणून भृगु ऋषी वैकुंठात गेले. त्यावेळी भगवान विष्णु आपल्या योगनिद्रेत असतां भृगुंनी त्यांच्या छातीवर हेतु पुरःस्सर लाथ मारली. तत्काळ विष्णु जागे झाले व त्यांनी झोपेमुळे भृगुंचे आगमन झालेले न समजल्या बद्दल क्षमा मागीतली. तसेच पातकी जनांचे पाप नाहीसे करणारे आपले चरण दुखावले नाहीत ना अशी पृच्छा केली व त्यांचे क्षमायाचनेसाठी पाय दाबू लागले. भृगुच्या चरणस्पर्शाने आपलेही पाप नाहीसे झाले आहे म्हणून त्या चरणांची खूण श्री आपण सतत वक्षावर धारण करूं असे स्वतः भगवंतांनी उद्गार काढले. (श्रीमत् भागवत् दशम स्कंध)
[4]  परास्य शक्ति विविधैव श्रूयते । श्वेताश्वेतर ५-८

No comments: