31 August, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक ६३

शुभांगः शांतिदः स्रष्टा कुमुदः कुवलेशयः ।
गोहितो गोपतिर्गोप्ता वृषभाक्षो वृषप्रियः ।।
(५८) शुभांगः :  - ज्याची सर्व अंगे व आकार अत्यंत सुंदर आहेत व त्यामुळे जो अतिशय मनोहारी व रूपवान् आहे असा.
(५८) शांतिदः :  - श्री नारायण अशी शांति प्रदान करतो की ज्यामुळे सर्व राग द्वेष इत्यादि द्वंद्वे नाहीशी होऊन जातात. तो आपल्या भक्तांचे अंतःकरण पूर्ण शुद्ध करतो त्यामुळे त्यांना शांती व आनंदाची प्राप्ती होते.
(५८) स्रष्टा :  - सर्व प्राणीमात्रांचे सृजन करणारा. सर्व प्रथम त्याने स्वतःमधूनच पंचमहाभूतांची संरचना केली व त्यातून सृष्टिची उत्पत्ती केली (विरंची).
(५८) कुमुदः :  - कु म्हणजे पृथ्वी. तिच्यामध्ये मुदित होणारा तो 'कुमुद' श्रीनारायण.
(५९) कुवलेशयः :  - जो पाण्यामध्ये (कुवल) शयन करतो तो. पाणी पृथ्वीला (कु) वलयांकित करते म्हणून कुवल म्हणजे पाणी. कुवल शद्बाचा दुसरा अर्थ होतो सरपटणारा सर्प. त्या श्रेष्ठ सर्पाची शय्या करणारा शेषशायी भगवान श्रीविष्णु कुवलेशय आहे, असाही या संज्ञेचा अर्थ होतो.
(५९) गोहितः :  - जो नेहमी गाईचे हित रक्षण करतो तो. श्रीकृष्णाने अनेक प्रसंगी पवित्र गोमातेच्या  रक्षणाकरता संवर्धनाकरताअनेक प्रकारे कार्य केलेले आहे. कारण भारतभूमीचे यथायोग्य संवर्धन हे गाईवर अवलंबून आहे. भारतीय कृषीचा गोधन हा केंद्र बिंदू आहे. 'गो' या शद्बाचा दुसरा अर्थ आहे 'पृथ्वी'. अर्थात गोहित म्हणजे पृथ्वीचे हित रक्षण करणारा. लौकीक महत्वाकांक्षा आणि त्यांची अमर्याद आसक्ती अपूर्ण विकृत दृष्टि यांच्या दुष्परिणामांपासून त्याने पृथ्वीचे रक्षण केले. भारतीय संस्कृतीची वैशिष्ठ्ये व तिचे रक्षणकर्ते ऋषीमुनी यांचेही त्याने रावणांसारख्या हितशत्रूंपासून व दुष्टांच्या दुष्कृत्यापासून रक्षण केले.
(५९) गोपतिः :  - पृथ्वीचा पति. किवा दुसरा अर्थ वासना व इच्छांच्या प्राबल्यानें ज्यांचे सांसारिक आयुष्य अत्यंत त्रस्त झालेले असते अशा दीन जीवांचे रक्षण करणारा परमेश्वर तो गोपति होय. कारण दुराचाराच्या गवताळ रानात चरण्याकरता हिंडणारे व जगतातील घटनांनी दुर्बल झालेले त्रस्त जीव रानात चरणार्‍या गाईप्रमाणेच असतात. त्याचेही तो रक्षण करतो म्हणून तो गोपति - गोपाल होय. गो शद्बाचा आणखी एक अर्थ होतो 'इंद्रिये ' व त्यांचा स्वामी म्हणजे आत्मस्वरूप श्रीविष्णु.
(५९) गोप्ता :  - 'गुप्' या क्रियापदाचे दोन अर्थ होतात. (१) रक्षण करणे (२) झांकणे. म्हणून गोप्ता म्हणजे जो (१) जो विश्वाचे रक्षण करतो तो (२) जो आपल्या मायेने आपले अंतर्यामी दिव्य आत्मस्वरूप झाकू ठेवतो तो असे दोन अर्थ होतात.
(५९) वृषभाक्ष :  - भक्तांच्या सर्व आशा आकांक्षांवर पूर्णतेचा वर्षाव करणारे डोळे असलेला तो वृषभाक्ष. भक्तांच्या मनातील अप्रकट इच्छाही त्याला कळतात आणि तो त्या सहजतेने पूर्ण करतो. दुसरा अर्थ असा की त्या नारायणाचे डोळे 'धर्मस्वरूप' आहेत.म्हणजेच त्याला नेहमी योग्य तेच (धर्ममय) स्पष्टपणे दिसते व भक्तांनाही ही धर्मदृष्टि प्राप्त व्हावी अशी इच्छा असल्यास त्यांनीही श्रीनारायणदृष्टि जोपासली पाहिजे.
(५९) वृषप्रियः :  - वृष म्हणजे धर्म व ज्याला धर्म प्रिय आहे असा वृषप्रिय होय. म्हणून या संज्ञेची उकल होईल  :  वृषः प्रिय यस्य सः ।  किंवा दुसरा अर्थ होईल जो गुणवान् श्रेष्ठ लोकांना प्रिय आहे असा.
डॉ. सौ. उषा गुणे.


  तस्मान्मच्छरणं गोष्ठं मन्नाथं मत्परिग्रहम्  । गोपाये स्वात्मयोगेन सोऽयं मे व्रत आहितः  ।। भागवत  ।।
   ज्या गोधनाने माझा आश्रय घेतला आहे व मलाच शरण आले आहेत अशा गोधनांचे स्वतःच्या योग सामर्थ्यानें रक्षण करण्याचे मी व्रत घेतलेले आहे.

No comments: