18 August, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक ५९

वेधाः स्वांगोऽजितः कृष्णो दृढः संकर्षणोऽच्युतः ।
रुणो वारुणो वृक्षः पुष्कराक्षो महामनाः ।।
(५४) वेधाः :  - सर्व सृष्टिचे विधान (निर्माण) करणारा तो वेधा, परमात्मा. विश्वनिर्मितीच्या ह्या प्रकट उद्देशाने तो परमात्मा ह्या जगताच्या विविधतेमधून व्यक्त होत असतो. ते परमतत्व जेव्हा विश्वमनातून कार्यकारी होते तेव्हां त्याला 'हिरण्यगर्भ' असे म्हटले जाते. अमरकोषाप्रमाणे सृष्टिकर्त्यास स्रष्टा, प्रजापती, वेधा अशी नावे आहेत.
(५४) स्वांगः :  - ज्याची सर्व अंगे प्रमाणबद्ध आहेत व जो अत्यंत सुंदर आहे तो, असे 'स्वांग' ह्या संज्ञेचे विवरण काही आचार्य करतात. त्याप्रमाणे अत्यंत मनोहर सौंदर्यवान् व दिव्यरूप असलेल्या विष्णुचाच येथे मुख्यतः निर्देश होतो. तसेच जो आपल्या अगांनी (साधनांनी) परिपूर्ण आहे तो, असाही अर्थ या संज्ञेचा होतो. या विविधतापूर्ण विश्वाची निर्मिती करण्याकरतां त्याला स्वतःखेरीज इतर कोणत्याही साधनांची गरज भासत नाही. परमात्मा स्वतः जगताची उत्पत्ती करतोच म्हणजे ’कर्ता’ तोच आहे, व स्वतःच निमित्त कारणही आहे. आपण पूर्वी पाहिलेच आहे की कोणत्याही कार्यास तीन कारणांची आवश्यकता असते. (१) उपादान कारण- जसे घट निर्मितीकरता माती (२) निमित्त कारण- जसे चक्रादी उपकरणे (३) कर्ता - कुंभार - कार्याचे ज्ञान असलेला. विश्वनिर्मितीचे बाबतीत ही तीनही कारणे त्या परमात्म्यामधेच एकरूपतेने समाविष्ट झालेली आहेत. त्यामुळे तो स्वतःच साधनरूपाने स्वतःमधूनच विश्व निर्मिती करतो. स्वांग ह्या अत्यंत मनोहर संज्ञेने भगवंताच्या ह्या सुंदर कार्याची संकल्पना स्पष्ट केली आहे.
(५४) अजितः :  - जो कोणाकडूनही जिंकला जात नाही असा. अजिंक्य. सर्व अवतारांमध्ये तो अजिंक्य असाच आहे. अत्यंत सामर्थ्यवान् दुषप्रवृत्तींसमोरही तो कधीच पराभूत झालेला दिसत नाही.
(५५०) कृष्णः :  - ज्यानें यादव कुळांत वसुदेव देवकीच्या पोटी पुत्ररूपाने अवतार घेतला तो. तसेच दुसरा अर्थ होतो ज्याने आध्यात्मिक जगताची 'कृष्णद्वैपायन' या रूपाने सेवा केली तो. तोच पुराण वाङ्‌मयाचा कर्ता 'श्रीव्यासमुनी'. कृष्ण ह्या शद्बाचा अर्थ होतो 'काळा रंग'. ज्या शाश्वत आत्मतत्त्वामुळे आपण या सृष्टिचा अनुभव घेत असतो ते आत्मतत्व नित्य आपल्यामधूनच कार्य करीत असते. परंतु त्या मुर्तीमंत चैतन्यतत्वाचे आपल्याला प्रत्यक्ष ज्ञान होत नाही. कृष्ण हा ’अज्ञात घटक’ आपल्यामधून व्यक्त होत असतो व त्याचेच कार्य म्हणजे आपल्या शारिरीक, मानसिक, बौद्धिक क्षमता. म्हणून तो असा ’अज्ञात’ काळा म्हणजेच कृष्ण होय.  
(५५) दृढः :  - दृढ - स्थिर. जो आपल्या संकल्पना, निर्णय, प्रेम व दया याबाबतीत अत्यंत दृढ असतो तो. परंतु ह्याच कारणांकरतां भक्तिमार्गी आचार्य त्याला ' अदृढ' असेही म्हणतात. कारण जेव्हा पापी व्यक्ती त्याला शरण जातात तेंव्हा तो 'द्रवित' होतो. जेव्हा पश्चातापपूर्ण अंतःकरणाने अपराधी व्यक्ती त्याच्या पायाशी शरण जातात तेंव्हा त्याला त्या पाप वासनेतून व दुष्कृत्यामधून बाहेर काढण्याकरतां त्याचे दयापूर्ण न्यायी अंतःकरण द्रवते. तो परमात्मा आपल्या भक्तांना आपल्या ज्ञान स्वरूपामध्ये 'स्थिर' करण्याकरतां सदैव जागृत असतो. तेच त्याचे सत् स्वरूप आहे.
(५५) संकर्षणोऽच्युतः :  - ज्यावेळी सर्वनामरूप यांनी युक्त अशी सृष्टी प्रलयांत विलीन होते त्यावेळी ती सर्व विविधता स्वतःमध्ये समाविष्ट करून घेणारा तो परमात्मा 'संकर्षण' या नांवाने ओळखला जातो. जेव्हा एकादी व्यक्ती पूर्ण निद्राधीन होते तेंव्हा त्याचे सर्व अनुभवविश्व त्याच्यामध्येच विलीन होते व  वासनारूपाने त्याच्या कारणदेहांत स्थिर होते. ज्याला आपल्या स्वरूपापासून च्युति - खाली पडणे' माहीत नाही तो 'अच्युत'. आपल्या अवस्थेंत तो नित्य स्थिर असतो तो अच्युत. संकर्षणोऽच्युतः ही संपूर्ण संज्ञा वरील दोन्ही संकल्पना एकत्रित करून परमात्म्याचा निर्देश करते. तो नारायण सर्व सृष्टि आपल्यामध्ये विलीन करतो म्हणजेच (संकर्षण) आणि आपल्या सत्यस्वरूपापासून कधीही च्युत होत नाही म्हणून तो अच्युत.
(५५) वरुणः :  - (रश्मीनां संवरणांत् वरूणः) - संध्यासमयी सूर्य वरूण दिशेला जातो म्हणजेच पश्चिमेला जातो म्हणून सूर्यालाच रुण म्हटले आहे.. तसेच संपूर्ण दिवसाचे कार्य संपल्या नंतर तो आपली प्रखर किरणे आवरून घेतो व दृष्टिआड होतो. मावळणार्‍या सूर्याप्रमाणे प्रलयाचेवेळी तो परमात्मा सर्व विविधात्मक सृष्टि आपल्यामध्ये समाविष्ट करून घेतो. तसेच ते परमतत्व या प्रत्यक्ष दिसणार्‍या सूर्याप्रमाणे त्याच्या शक्ति व प्रकाशाचे द्वारा आपल्याला प्रतीत होते म्हणूनच त्याला 'हिरण्यमय' अशा संज्ञेने उपनिषदांत आवाहन केले आहे म्हणून श्री नारायणांस 'वरुण' म्हणणे संयुक्तिकच आहे. सूर्य नारायण ही संज्ञा तर पुराणाच्या अभ्यासकांना परिचितच आहे.
(५५) वारुणः :  - 'वरुणाचा पुत्र तो वारुण' अगस्ति व वसिष्ठ हे दोघेही रुणाचे पुत्र असे परंपरेने समजले जाते. म्हणून भगवंत स्वतःच अगस्ति अगर वसिष्ठ ह्यांच्या रूपाने अवतरले असे या संज्ञेने सूचित होते. 'ज्या ज्या ठिकाणी उर्जितावस्थेचे दिव्य प्रकटन असते ती ती माझीच विभूती आहे असे समज' असे भगवंत स्वतः श्रीगीतेमध्ये सांगतात. कांही टीकाकार त्या संज्ञेची 'अ-वरूण' अशीही फोड करतात व त्याचा अर्थ होतो' ज्याला कसलेही आवरण घालता येत नाही तो 'वारूण'.
(५५) वृक्षः :  - परब्रह्मामधून प्रकट होणार्‍या विश्वाला 'वृक्ष' असे उपनिषदांनी रूपकाने म्हटले आहे. तसेच कठोपनिषत् व गीतेत त्याचे 'संसारवृक्ष' अशा रूपकाने विस्तृत वर्णन केले आहे. तसेच पुराणांमध्येही ३-४ ठिकाणी जगताच्या प्रकटीकरणास 'अश्वत्थवृक्ष' असे म्हटले जाते.
(५५) पुष्कराक्ष :  - ज्याचे नयन कमलाप्रमाणे (पुष्कर) सुंदर आहेत तो. तसेच संस्कृतमध्यें 'पुष्कर' म्हणजे अवकाश. त्या संज्ञेप्रमाणे तो परमात्मा सर्व आकाशव्यापी आहे असे सुचित होते.
(५५) महामनाः :  - ज्याचे मन महान आहे तो. तो परब्रह्म नारायण, ईश्वर स्वरूपांत म्हणजेच समष्टि मनाचे स्वरूपांत ह्या सर्व विश्वाची उत्पत्ती-स्थिती व लयाचे कार्य करीत असते व ह्या संसार क्रीडेची निरंतर पूर्तता करीत असतो.
डॉ. सौ. उषा गुणे.


   यद्यद् विभूतिमत् सत्वं श्रीमदूर्जितमेववा । 
    तद्तदेवागच्छ त्वंमम तेजोंऽश संभवम् ।। गीता १०-४१
   उर्ध्वमूलोऽवाक् शाख एषोत्थ सनातनः । कंठोपनिषत् २-६-१  -   
    ऊर्ध्वमूलमधः शाखमश्वत्थं प्राहुरव्ययम् (गीता १५.१)


No comments: