25 August, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक ६१

सुधन्वा खण्डपरशु र्दारूणो द्रविणप्रदः ।
दिवःस्पृक् सर्वदृक्व्यासो वाचस्पतिरयोनिजः  ।।
(५६) सुधन्वा :  - ज्याचे धनुष्य अत्यंत दिव्य आहे असा. त्या धनुष्याचे नांव आहे शारंग. काहींचे मते 'धनुष्' शद्बाने इंद्रिये व त्यांची कार्ये सुचविली जातात.
(५६) खंडपरशु :  - ज्याने 'परशु' नांवाचे शस्र धारण केले आहे असा. भगवंतांनी आपल्या जमदग्नीपुत्र 'परशुराम' ह्या अवतारांत हे शस्र धारण केले व सज्जनांच्या अन्यायी शत्रूंचा नाश करण्याकरिता ते शस्त्र अपार सामर्थ्यसंपन्न होते म्हणून तो खंडपरशु. जो आपली अपराजित परशु सतत चालवितो तो खंडपरशु.
(५६) दारूणः :  - सन्मार्ग विरोधकांचे बाबतीत जो अत्यंत कठोर 'दारूण' आहे असा. कांही एक मर्यादेपर्यंत भगवंत अत्यंत दयाशील किवा क्षमाशील आहे. परंतु ऑपरेशन करणार्‍या सर्जन प्रमाणे ती व्यक्ती सुधारण्याचा दुसरा कुठलाही उपचार शिल्लक रहात नाही तेंव्हा तो अत्यंत कठोर दारूण होतो.
(५७०) द्रविणप्रदः :  - जो आपल्या भक्तांनी इच्छिलेली संपत्ती उदारतेने देतो तो. व्यासांच्या मताप्रमाणे भगवान् विष्णु आपल्या खर्‍या भक्तांना शास्रज्ञानाची संपत्ती देतो. ते शुद्ध व सूक्ष्म ज्ञान त्यांना परमसत्याचे असते.
(५७) दिवःस्पृक् :  - अंतरिक्ष -स्पर्शी. भगवंतांनी आपले अंतरिक्ष स्पर्शी दिव्य विश्वरूप अर्जुनाला दाखविले असे भगवत गीता सांगते.
(५७) सर्वदृग्व्यासः :  - या संज्ञेतील सर्व शद्बाचा संकलीत अर्थ होईल की जो अनेक सर्वज्ञ व्यक्तींनां निर्माण करतो तो. तो ज्ञानाच्या प्रसाराला उत्तेजन देतो. त्यामुळे अनेक सूज्ञ व्यक्तिंना जगताचे व जीवनाचे सूक्ष्म ज्ञान होते. या संज्ञेतील दोन शद्ब विलग करून अर्थ निष्पत्ती केल्यास 'जो सर्वदृक म्हणजेच सर्वज्ञ आहे व जो व्यास आह तो' असा अर्थ होइल. म्हणजेच सर्वज्ञ भगवंताने श्रीवेद व्यासांचे रूपाने आपले स्वतःचे प्रकटन केले हे स्पष्ट होते. श्रीव्यास हे कवी व तत्वज्ञ होतेच तसेच त्यांनी सर्व वेदांचा संग्रह करून त्याचे वर्गीकरण व संपादन केले. व चार स्वतंत्र वेदांच्या रूपानें त्यांचे प्रकाशन केंले. ऋक्वेदाच्या २१ शाखा, यजुर्वेदाच्या १०१ शाखा, सामवेदाच्या १००० शाखा व अथर्व वेदाच्या ९ शाखा सहित सर्व वेदांचे प्रकाशन केले. तसेच त्यांनी १८ पुराणे व ब्रह्मसूत्रांची निर्मिती केली म्हणून त्यासांना सर्वदृक् (सर्वज्ञ) व्यास असे म्हणतात.
(५७) वाचस्पतिरयोनिजः :  - 'जो सर्व विद्यांचा ज्ञाता आहे (वाचस्पती) स्वामी आहे परंतु ज्याचा जन्म मातेच्या उदरातून झालेला नाही असा भगवान् श्री विष्णु.
डॉ. सौ. उषा गुणे.

No comments: