28 August, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक ६२

त्रिसामा सामगः साम निर्वाणं भेषजं भिषक् 
संन्यासकृच्छमः शान्तो निष्ठा शान्तिः परायणम्  ।।
(५७) त्रिसामा :  - ज्याची तीन सामाने स्तुति केली जाते असा. साम म्हणजे दिव्य गान. म्हणजेच वेद. सामगायकांकडून सामवेदाने त्याची स्तुती केली जाते. त्याची नांवे देव, व्रत व सामन अशी आहेत.
(५७) सामग:  - जो सामन-गायन करतो तो. सामवेदातील आज्ञेप्रमाणे तो कृती करतो व त्या प्रमाणे परमात्म्याला आवाहन करतो त्याला वैदिक परिभाषेप्रमाणे 'उद्‌गाता' असे म्हणतात.
(५७) साम :  - परमात्मा स्वतःच सामवेद आहे म्हणून ही संज्ञा. त्यामुळे सामवेदाचेच दिव्यत्व सुचविले जाते. भगवान् श्रीकृष्ण गीतेमध्ये म्हणतात, 'वेदांमध्ये मी सामवेद आहे.'
(५७) निर्वाणम् :  - ज्याचे स्वतःचे स्वरूप 'नित्यमुक्त' असे आहे. त्याच्यामध्ये कुठलीही अपूर्णता नाही किवा दुःखाचा लवलेश नाही, म्हणून तो आनंद स्वरूप आहे.
(५७) भेषजम् :  - औषधी जो संसाररूपी व्याधींचे एकमेव औषध आहे असा.
(५७) भिषक् :  - वैद्य. संसारव्याधीचे निवारण करतो असा वैद्यही तोच आहे व औषधीही तोच आहे. तसेच या संज्ञेचा दुसरा अर्थ होइल की, 'क्षीरसागराच्या मंथनामधून अमृत कलश घेऊन प्रकट झालेला भगवान् धन्वंतरी म्हणजेच श्रीविष्णू होय, म्हणून औषधींचा स्वामी म्हणजे स्वतः श्री महाविष्णु होय. भारतीय औषधी शास्त्राप्रमाणे (आयुर्वेदाप्रमाणे) भगवंत स्वतःच या शास्त्राची देवता आह. श्रीविष्णु या शास्त्राचे स्वामी अगर अध्यक्ष रूपाने प्रकट झाले, तसेच ते स्वतः सर्व वैद्यांचेही प्रमुख असल्यानें त्यांनाच 'भिषक्' ही संज्ञा देण्यात आली.
(५८०) संन्यासकृत् :  - चतुर्थाश्रम म्हणजे संन्यास. व त्याची स्थापना करणारा तो 'संन्यासकृत्'. जे सर्वस्वाचा त्याग करू शकतील अशा व्यक्तिकरता हा आश्रम आहे व त्याकरतां लागणार्‍या सर्व गुणांचा व वृत्तींचा तो कृपाळू दाता आहे त्यामुळे त्यालाच 'संन्यासकृत' म्हटले आहे.
(५८) शमः :  - 'शांत'. इंद्रियांच्या आसक्तिपूर्ण प्रवृत्तीबरोबर न जाता ज्याचे मन स्थिर शांत रहाते असा. संन्यास स्थितीमध्ये राहून अत्यं स्थिर व शांत जीवन कसे व्यतीत करावे हे तो शिकवितो व ह्या संग्रहित शांतीमधून परमसत्याची प्रतीती होते. स्मृतीनें मनुष्यांच्या चार अवस्थांकरतां वेगवेगळे आचारधर्म सांगीतले [1] आहेत ते असे. (१) ब्रह्मचर्य - ह्यामध्ये सेवा करणे (२) गृहस्थ - दान धर्म करणे (३) वानप्रस्थ - संयमन करणे (४) संन्यास - शांत अवस्थेत रहाणे. शमाखेरीज (संन्यास) शांतता अशक्य आहे. 'शांत' अवस्था हाच भगवंताचा स्वभाव आहे.
(५८) शांतः :  - सर्व इंद्रियांचे पूर्णपणे संयमन केलेले असल्याने जो अंतर्यामी पूर्ण शांत आहे असा. उपनिषदे या अवस्थेचे 'कर्मरहित (निष्क्रिय), अंशरहित (पूर्ण निष्कल) शांत असे गौरवपूर्ण वर्णन करतात.[2]
(५८) निष्ठा :  - सर्व जीवांचे आश्रयस्थान. केवळ जीवीत असताना नव्हे तर प्रलय कालामध्येही तोच आश्रय आहे. वैश्विक प्रलयाचे वेळी सर्व प्राणीमात्र व सृष्टी वासनारूपी बीज अवस्थेमध्ये विलीन होऊन त्याच्याच आधाराने रहातात म्हणून त्याला ’विश्वाचा आधारअसे म्हटले आहे.
(५८) शांतिः :  - त्याचा स्व-भावच शांत असल्याने तोच शांति आहे वासनांमुळे मन अस्थिर होते व त्यांच्या पूर्तीकरतां प्रयत्‍न करणे (मिळविणे) वा त्यामध्ये रममाण होणे यामुळे अशांतता निर्माण होते. परंतु जो स्वतः परिपूर्ण आहे त्याचे ठिकाणी कुठलीही इच्छा नाही. तिच्या पूर्तीकरतां जगातील क्षणभंगून वस्तू मिळविंयाची खटपटही नांही. म्हणूनच तो शांतस्वरूप आहे.
(५८) परायणम् :  - सर्वोच्च स्थान किवा गंतव्य श्रीनारायणच आहे. ज्याचे ठिकाणी गेल्यानंतर पुन्हा परत येणे नाही असा - परायण. नारायण हाच पूर्णमुक्तावस्थेचा मार्ग आहे असे ही संज्ञा सुचविते..
डॉ. सौ. उषा गुणे.


   वेदानां सामवेदोऽस्मि  । गीता १०-२२
[1]  यतीनां प्रशमो धर्मो- नियमोवनवासिनाम् ।
   दानमेव गृहस्थानां- शुश्रुषाब्रह्मचारिणाम् ।। स्मृती  ।।
[2]   निष्कलं निष्क्रियं शांतं निरवद्यम् निरंजनम्  ।। श्वेता श्वेतर ५-१९.

No comments: