10 August, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक ५७

महर्षिः कपिलाचार्यः  कृतज्ञः  मेदिनीपतिः 
त्रिपद स्त्रिदशाध्यक्षो महाशृंग कृतांन्तकृत्  ।।
(५३) महर्षिः कपिलाचार्यः :  - मुनिश्रेष्ठ कपिलाचार्यांचे रूपाने प्रकट झाला तो. ज्या साधूने वेदांचा कांही भाग जाणला आहे त्यांना ऋषि असे म्हणतात. व ज्याने सर्व वेद जाणले आहेत त्यांना महर्षि म्हणतात. तत्वचिंतक कपिलमुनी हे सर्ववेदज्ञ असून सांख्य दर्शनाचे उद्‌गाते आहेत. त्यांचा गौरव करतांना भगवंत गीतेत सांगतात, 'जे पूर्ण सिद्ध पुरूष आहेत त्यामध्ये मी कपिलमुनी आहे.'[1]
(५३) कृतज्ञः :  - निर्मित (कृत) व निर्मितीचे कार्य जाणणारा. हे संपूर्ण विश्व ही त्या भगवंताची कृती असल्यानें ते कृत आहे व ते सर्व वस्तुजात जाणणारा 'ज्ञ' तोच आहे. परमतत्व हे जाणणार्‍या जीवाचे (ज्ञ) उपादान कारण आहे. व त्याचे कार्य म्हणजे सर्व सजीव निर्जीव निर्मीत जगत् (कृतम) अशा तर्‍हेने जे कार्य आहे व कारण आहे त्या दोन्हींचा जो मूलाधार तोच परमात्मा परब्रह्म होय. तो या शरीरादि मायावरणांनी मुळीच बद्ध होत नाही म्हणून तो नारायणच परमसत्य आहे. सांप्रत कृतज्ञ शद्बाचा अर्थ उपकार स्मरण किंवा आभार प्रदर्शन असा केला जातो. परंतु तो अत्यंत गौण अर्थ आहे. आपल्याला एकाद्याने केलेली मदत 'मी जाणतो' असे व्यक्त करणे म्हणजे त्याचे आभार मानण्यासारखेच असते म्हणून 'कृतज्ञ' शद्ब आभारी याअर्थी वापरणे सांप्रत तात्त्विक अर्थपूर्ण आहे.
(५३) मेदिनीपतिः :  - पृथ्वीपति, श्रीनारायण. यासर्व स्थूल जगताचे पालनपोषण करणारा श्रीविष्णु हा पृथ्वीचा पति आहे. ही कल्पना अत्यंत गूढार्थाने भरलेली असून रम्य काव्यात्मक व खोल तात्त्विक अर्थपूर्ण आहे..
(५३) त्रिपदः :  - ज्याने तीन पदन्यास केले तो. ही संज्ञा वामनावतारातील कार्य दर्शविते. त्यामध्ये त्यानी केवळ तीन पावलांत सर्व विश्व पादाक्रांत केले. त्याच्याच प्रमाणे जीवालाही म्हणजेच साधकाला या मायानिर्मित जागृत-स्वप्न-सुषुप्ति या तीन लोकांना पादाक्रांत करून पुढे जावे लागते. साधक ही तीनही जगते तीन पावलांनी मोजून पलीकडे गेलातर तो आपल्या शुद्ध स्वरूपापर्यंत येवून त्याचा साक्षात्कार करून घेवू शकतो.
(५३) त्रिदशाध्यक्षः :  - तीनही दशांचा (स्तरांचा) स्वामी. त्या तीन दशा आहेत जागृत-स्वप्न-सुषुप्ति व त्या सर्व अवस्थांचा साक्षी अध्यक्ष आहे आत्मा. दुसरा अर्थ होतो जो आपल्या क्रिडेमध्ये तीन अवस्थांचा (सात्विक, राजसिक, तामसिक) स्विकार करतो पण त्यांनी कधीही बद्ध होत नाही.
(५३) महाशृंगः :  - ज्याचे शृंग खूप मोठे आहे असा. मत्स्यावतारामध्ये श्रीविष्णूने आपल्या मोठ्या शृंगाला होडी बांधली व प्रलय सागरांत क्रिडा केली म्हणून त्याला 'महाशृंग' ही संज्ञा दिली गेली.
(५३) कृतान्तकृत् :  - सर्व कृत (निर्मित) आहे त्याचा अंत करणारा. व्यक्तिशः आपल्याही आयुष्यांत तो आपल्या सात्विक, राजसिक व तामसिक वासना व त्यांची कार्ये निर्माण करतो. जेव्हा सात्विक वासनांची वृद्धि होते तेंव्हा जीवांना स्वर्गप्राप्ती होते व जेव्हा तामसिक गुणांची वृद्धि होते तेंव्हा नीच योनीमध्ये जन्म घ्यावा लागतो. जेव्हा साधक आपल्या प्रयत्नानें सर्व वासनांचा त्याग करतो तेंव्हा तो आत्मतत्वापर्यंत जातो व त्याच्याशी एकरूप होतो. म्हणून आत्मस्वरूप श्रीनारायण ही अशी एक अवस्था आहे जिथे सर्व कृत (वासना) नाश पावते (अन्त). सर्व वासना मुक्ती म्हणजेच कृतान्त म्हणजेच मोक्ष व तो देणारा कृतान्तकृत्. जो कृत म्हणजे वासना व फले देणारा आहे तोच कृताचा अन्त करणारा कृतांतकृत मोक्षदाता आहे. तसेच जो मृत्यूचाही नाश करतो तो. (कृंदन्ति मृत्यूं इति कृतान्तकृत्) ही संज्ञा भगवान् शिव शंकरांना अनुसरून वापरली आहे. त्या शिवाने रूद्ररूप धारण केले आहे म्हणून तो कृतांत आहे.
डॉ. सौ. उषा गुणे.


[1]   सिद्धानां कपिलो मुनी । 


No comments: