14 August, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक ५८

महावराहो गोवीन्दः सुषेण कनकांगदी 
गुह्यो गभीरो गहनो गुप्तश्चक्रगदाधरः ।।
(५३) महावराहः :  - जो महावराहाचे रूप घेऊन अवतरला तो. प्रलयाचे पाणी ओसरल्यानंतर झालेल्या कर्दमातून पृथ्वीचे उद्धरण करण्याकरतां त्याने वराहाचे रूप घेतले. हा भगवंताचा तिसरा अवतार होय.
(५३) गोविन्दः :  - जो वेदवाणीने (गो) जाणला जातो (विद) तो. विष्णुतिलकामध्ये म्हटले आहे, ' गोभिरेव यतो वेधो गोविन्दः समुदाहृतः । या ठिकाणी गोभिः म्हणजे उपनिषदातील अवतरणे होत.
(५४०) सुषेणः :  - ज्याची सेना समृद्ध आहे. सुंदर आहे असा. श्रीविष्णुच्या सेनेला त्याचे 'गण' असे म्हटले जाते. त्यामध्ये सर्व साधूसंतांचा समावेश होतो म्हणून ती सेना सुंदर मनोहारी आहे.
(५४) कनकांगदी :  - ज्याची बाहुभुषणे सोन्याची असल्याने चकचकीत आहेत असा. अंगदी म्हणजे  भुजबंध व हा दागिना खांदा व दंडाचा वरचा भाग झाकतो.
(५४) गुह्यः :  - अत्यंत गुढ. गंभीर. सत्याचे स्वरूपच अत्यंत गंभीर व खोल असल्याने उपनिषदातील तत्वज्ञानही अत्यंत गहन-गंभीर आहे. त्यामुळेच उपनिषदांचे तत्वज्ञान 'रहस्यमय' समजले जाते. श्रीविष्णुचे ध्यान गूढ अशा हृदयाकाशांत केले जाते म्हणून त्यास परमगुह्य म्हटले जाते.
(५४) गभीरः :  - अगाध. प्रत्यक्ष उपनिषदेही तो जाणण्यास अत्यंत कठीण आहे असे म्हणतात. मनुष्याची मर्यादित बुद्धि त्या परमात्म्याचे पूर्णपणे आकलन अगर प्रत्यक्ष साक्षात्कार करूं शकत नाही, त्यांत खोल अवगाहन करूं शकत नाही अगर त्याचे गूढ स्वरूप, त्याचे ज्ञान, सामर्थ्य, पावित्र्य, यांचे स्पष्टिकरण करूं शकत नाही.
(५४) गहनः :  - ज्याचेमध्ये खोलपर्यंत जातायेत नाही असा. त्याच्या दिव्य स्वरूपाच्या प्रांतात आपणास  स्वसामर्थ्यानें प्रवेश करता येत [1]नाही, तर केवळ शरणागतीनेच त्याच्या पायरीपर्यंत जाता येते.
(५४) गुप्तः :  - जो पूर्णपणे झाकला आहे असा. तो शद्बांनी उघड करता येत नाही किवा इंद्रियांनीही तो समजू [2] शकत नाही. उपनिषदे पुनःपुन्हा सांगतात की तो स्वतःच आत्मस्वरूप असल्याने शरीर मन बुद्धी इत्यादी साधनांनी [3] जाणला जा शकत नाही. केवळ अत्यंत स्थिर झालेल्या व निरंतर ध्यानाचे साहाय्याने शुद्ध झालेल्या मनानेच[4] तो जाणला जातो. सर्व प्राणीमात्रामध्ये त्याचे स्वरूप अत्यंत गूढ असल्यानें तो प्रकाशित होत नाही.
(५४) चक्रगदाधरः :  - ज्याने चक्र व गदा धारण केली आहे असा. त्याच्या चक्रास 'सुदर्शन' असे म्हणतात व [5] गदेस 'कौमोदकी'. पूर्वीच्या मुनींच्या मताप्रमाणे चक्राने मनाचा निर्देश केला आहे व गदेने बुद्धिचा निर्देश केला आहे.
डॉ. सौ. उषा गुणे.


[1]   न कर्मणा न प्रजया धनेन त्यागेनैकै अमृतत्वमानशुः 
    कर्म जन्म धन इत्यादिचे सहाय्याने नव्हे तर केवळ त्यागानेच त्या अमृतत्वाची प्राप्ती होईल. (कैवल्य १-३)
[2]    यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह । - ज्या ठिकाणी वाचा मनासहित परत फिरते व त्यास प्राप्त करूं शकत नाही. (तैतिरीय २ ब्रा.वल्ली.४)
[3]    ज्ञानप्रसादेन विशुद्ध सत्वस्तुतस्तु तंपश्यंते । निष्कलं ध्यायमानः ।
   जेव्हा जाणीव शांत व शुद्ध होते तेंव्हा ध्यानाने त्या शुद्ध परमात्म्याचे ज्ञान होते. (मांडूक्य ३-१-८)
[4]    एष सर्वेषु गुढात्मा न प्रकाशते । कंठ २-३-१२)
[5]   मनस्तत्वात्मकं चक्रं बुद्धि तत्वात्मिका गदाम् । धारयन लोकरक्षार्थमुक्तश्चक्रगदाधरः ।


No comments: