02 August, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक ५५

जीवो विनयितासाक्षी मुकुन्दोऽमितविक्रमः 
अम्भोनिधिरनन्तात्मा महोदधिशयोऽन्तकः  ।।
(५१) जीवः :  - जो मर्यादित होऊअहं स्वरूपाने रहातो तो (जीव). मर्यादितपणा व अलगपणा स्विकारल्यानें जीवनाच्या  [1]क्षेत्रातील अनंत सुखदुःखाचे अनुभव जो स्विकारतो तो जीव. भगवत् गीता म्हणते त्याप्रमाणे तो 'क्षेत्रज्ञ' होऊन सर्व अनुभव क्षेत्राचा ज्ञाता होतो.
(५१) विनयितासाक्षी : - जो विनम्रतेचा साक्षी आहे तो. तो चैतन्यस्वरूप आत्मा भक्तांच्या हृदयातील विनम्रतेचा साक्षी असतो. दुसरा अर्थ असा होईल की ज्यास दुसरे काही नाही असे ते शुद्ध आत्मतत्व अद्वितीय आहे. त्याच्या या वैश्विक एकत्वामुळे ते केवळ सर्वत्र स्वतःचेच साक्षीत्व करू शकते. त्या विशुद्ध अवस्थेमध्ये हे अहंनिर्मित वैचित्र्यपूर्ण विश्व त्याला द्वैत स्वरूपाने दिसतच नाही.
(५१) मुकुन्दः :  - मुक्तीदाता. (मुक्तिं ददाति इति) जे आपला मायापाश नष्ट करण्याकरतां सतत परिश्रम करतात, व मायानिर्मित अपूर्णतेतून मुक्तता मिळविण्याकरतां सतत प्रयत्नशील असतात अशा भक्तिभावनेत पूर्ण समर्पित झालेल्या आपल्या भक्तांना मुक्ती देतो तो मुकुन्द. तोच त्यांचे ध्येय व सर्वस्व असतो.
(५१) अमितविक्रमः :  - ज्याचा पराक्रम अमर्याद आहे तो किवा ज्याची परिक्रमा (विक्रम) अमर्याद आहे असा. वामनावतारामध्ये श्रीविष्णूने तिन्ही जगताचे परिमाण केवळ तीन पावलांमध्ये मोजून टाकले त्यामुळे त्याला त्रिविक्रम असे नामाभिधान मिळाले अर्थात त्याचा पदन्यास इतका अमर्याद असल्यानें त्याला अमितविक्रम असे नाम मिळाले.
(५१) अम्भोनिधिः :  - 'सागर' असा ह्या संज्ञेचा सरळ अर्थ. व भगवत गीतेत श्रीकृष्ण म्हणतात, 'सर्व जलनिधीमध्ये मी सागर आहे.'[2]  तैतिरीय ब्राह्मणांमध्ये उल्लेखिले आहे की , 'हे चार अम्भ आहेत व ते देवता, मनुष्य, पितर व असूर असे आहेत. ते परमतत्व सर्वांचा प्रत्यक्ष आधार असल्याने या चारही प्रकारच्या जीवांचा आधार आहे.’ [3]
(५१) अनंतात्मा :  - ' अनंत आत्मा'. परमात्मा आपल्या शुद्ध स्वरूपांत वस्तू-काल-दिशा यांच्या बंधनांच्या पलीकडे असल्याने तोच एक अनंत आत्मा आहे. दुसरा अर्थ असा की विश्वनिर्मितीमधील असंख्य वस्तू व प्राणीमात्रातून तो व्यक्त होत असल्याने 'तो अनंतात्मा' आहे. अनंत म्हणजे ज्याला अन्त - शेवट नाही असा. परमात्मा श्रीविष्णूच होय.
(५१) महोदधिशयः :  - जो अमर्याद सागरावर विराजमान आहे असा. विष्णुपुराणांप्रमाणे, श्रीविष्णु वैकुंठातील क्षीरसागरामध्ये आदिशेष नागावर विराजमान झालेले आहेत. दुसरा अर्थ - प्रलयाचे वेळी सर्व नामरूप अव्यक्तात विलीन करणार्‍या प्रलय सागराचे वरती वटपत्रावर बालरूपाने विराजमान होतो तो महोदधिशय श्रीविष्णु होय.
(५२०) अन्तकः :  - मृत्यु किवा काल. जो कालस्वरूपाने जगतातील सर्व वस्तूजातामध्ये सतत परिवर्तन घडवून आणतो व ज्याच्या वाचून उत्क्रांती अगर सृजन होत नाही तो.
 डॉ. सौ. उषा गुणे.



[1]   क्षेत्रज्ञं चापि मं विद्धि सर्व क्षेत्रेषु भारत  । (गीता १३-२)
[2]   सरसामस्मि सागर: - (गीता १०-२८)
[3]   तैत्तिरीय ब्रा. २.३.८

No comments: