22 August, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक ६०

भगवान् भगहानन्दी वनमाली हलायुधः ।
आदित्यो ज्योतिरादित्यः सहिष्णुर्गतिसत्तमः ।।
(५५) भगवान् :  - विष्णु पुराणांत म्हटले आहे ज्याचे जवळ ६ दिव्य गुण, 'भग' आहेत असा. ते सहा गुण आहेत [1] ऐश्वर्य, सामर्थ्यश, धर्म, किर्ती (चारित्र्य), ज्ञान, वैराग्य म्हणून तो महाविष्णु भगवान् आहे. तसेच विष्णु पुराणांत म्हटले आहे [2] की जो विश्वाची (१) उत्पत्ती आणि विलय जाणतो (२) जो भूतांची गती परागती  (जन्म-मरण) जाणतो (३) जो विद्या व अविद्याही जाणतो तो 'भगवान्' असे म्हटले जाते. ज्याचे जवळ वरील सहा गुण आहेत त्यामुळे स्वभावतःच त्या सर्व शक्ती ज्याचे जवळ वास करतात त्यालाच भगवान् म्हटले जाते. कारण त्याचे साधन आहे ''समग्र मन''.
(५५) भगहा :  - प्रलयाचे वेळी निर्देशित सहाही गुणांचा जो नाश करतो तो. प्रलयाचे वेळी परमात्मा सर्वांचा आपणामध्ये विलय करतो म्हणून त्याला सर्व ऐश्वर्याचा नाश करणारा असे म्हटले आहे. ज्याप्रमाणे एकादा नेपोलियन सारखा योद्धा त्याचे सर्व सामर्थ्य झोपतांना स्वतःमध्ये विलीन करतो त्याप्रमाणे हे समजावे. जेव्हा ते 'समग्र मन' स्वनिर्मित जगतापासून परावृत्त होऊविश्रांति घेते, तेव्हा विविधतेचे सर्व परमात्म्यामध्ये विलीन झाल्याप्रमाणे भासते.
(५६०) आनन्दी :  - जो आनंद देतो तो. भगवान् स्वतः शुद्ध आनंदस्वरूप आहेच व जे भक्त शरणागत होऊन त्याच्या चरणाशी जातात त्यानांही तो तोच आनंद उपलब्ध करून देतो.
दुसर्‍या एका पाठभेदा प्रमाणे ही संज्ञा 'नंदी' अशीही समजली जाते. परंतु ह्या संज्ञे प्रमाणेही अर्थ तोच होतो. आणखी एका अर्थानें जो नंदगोपालाचा पुत्र श्रीकृष्ण म्हटले जाते. कारण त्या श्रीकृष्णाचे बालपणामध्ये संगोपन वर्धन नंद व यशोदेने केले होते.
(५६१) वनमाली :  - जो नेहमी पत्र पुष्पांनी युक्त अशी वैजयंती नावाची माला धारण करतो तो. वैष्णवमता प्रमाणे ही वैजयंतीमाता पंचमहाभूतांच्या सूक्ष्म तन्मात्रांनी युक्त असते असा निर्देश आहे.
(५६) हलायुधः :  - ज्याने 'हल' नांगराचे शस्र धारण केले आहे असा. श्रीविष्णुचा आठवा अवतार म्हणून श्री बलभद्र या रूपाने ते अवतरले व तेच श्रीकृष्णाचे वडील बंधू. सद्यःकालातही आपल्या देशात शेतकरी नांगरताना बलरामाचे नामस्मरण करतात व पिकाची समृद्धि व्हावी व विपूल संपत्ती प्राप्त व्हावी अशी प्रार्थना करतात.
(५६) आदित्यः :  - जो आदिती व कश्यपाचे पोटी वामन या रूपानें अवतरला तो. त्यानें बली राजाकडे तीन पावले भूमी मागीतली व त्यामध्ये तीनही भुवने व्यापली.
(५६) ज्योतिरादित्यः :  - आदित्यमध्येही ज्याची दिव्यप्रभा आहे तो. सूर्यामधील प्रकाश व उर्जा ही ज्या आत्मतत्वाचे प्रकटन आहे तो स्वतः भगवान् विष्णु होय व त्याचे सूर्यामध्ये ध्यान केले जाते (सूर्यनारायण).  ज्याने हातामध्ये शंखचक्र धारण केले आहे. जो सर्वालंकाराने अलंकृत आहे, जो पद्मासनामध्ये बसलेला आहे, ज्याची कांती तेजस्वी सुवर्णमय आहे व जो सूर्याच्या केन्द्रभागी स्थित आहे अशा विष्णुचे नित्य ध्यान करावे. सूर्याच्या मध्यवर्ती स्थित अशी देवता 'श्रीनारायण' आहे. 'अद्' या शद्बाचा अर्थ होतो 'विष्णूपासून'. इत्य म्हणजे मिळविणे. भगवान् विष्णूपासून सायुज्यमुक्तीची प्राप्ती करून घ्यावयाची आहे. म्हणून त्यास आदित्य म्हटले आहे. हे विवेचन संस्कृत भाषेतील ’सूर्य’ या शब्दाचा आणखी एक सूक्ष्म अर्थ आपल्याला सुचवितो, तो असा की सर्व प्राणीमात्र त्याच्यापासून कृपाप्रसाद प्राप्त करतात म्हणून तो भगवान सूर्य नारायण 'आदित्य' आहे, महान् दाता आहे !
(५६) सहिष्णुः :  - जो सर्व द्वंद्वे शांतपणे सहन करतो तो. तो शारीरिक, मानसिक व बौद्धिक विक्षेपांचे वर असल्याने त्याचेवर कुठल्याही द्वंद्वाचा परिणाम होत नाही म्हणून तो 'सहिष्णू' आहे.
(५६) गतिसत्तमः :  - सर्व साधकांचे जे अंतिम गंतव्य असते ते परमात्म तत्व. तेच त्यांचे परम ध्येयही आहे व तोच सत्पही आहे. श्री नारायण हेच ते परब्रह्म परमतत्व असून साधकांची अंतिम मुक्ती असून मार्गही तोच आहे. म्हणून त्याचेच ध्यान व त्याचीच पूजा केली जाते. गती या शद्बानें अंतिम ध्येय व मार्ग ह्या दोन्हीचे सूचन होते म्हणून तोच अत्युत्तम आध्यात्मिक मुक्तीचे तत्व आहे.
डॉ. सौ. उषा गुणे.


[1]    ऐश्वर्यस्य समग्रस्य धर्मस्य यशसः श्रियः । ज्ञानवैराग्ययोश्चैवषण्णां भग इतिरणा  । विष्णुपुराण ६-५-७४
[2]       उप्तत्तिं प्रलयं चैव भूतानांमगतिं गतिम् ।
   वेति विद्यामविद्यांच स वाच्यो भगवानिति  ।।विष्णुपुराण ६-५-७८
  ध्येयः सदासवितृमण्डलमध्यवर्ती । नारायणः सरसिजासनसन्निविष्टः ।
   केयूरवान् मकरकुंडलवान् किरीटी । हारी हिरण्मयवपुर्धृतशंखचक्रः ।।


No comments: