06 May, 2008

प्रेमाची ऐसी जाती - लाभाविण प्रीति -

प्रेमाची ऐसी जाती - लाभाविण प्रीति -

आज गुढीपाडवा - सर्व वाचकांना, त्यांचे कुटुंबिय व आप्तजणांना हे नववर्ष सुख, समृद्धि आणि अखंड नामाने युक्त असे जावो ही परमेश्वराकडे आणि श्रीमहाराजांकडे प्रार्थना -
सद्‍गुरूंनी सांगितले, ' तुम्ही फक्त नाम घ्या, आणखी काही करू नका. ' आपल्यापैकी बरेचजण त्यातील गर्भितार्थाकडे लक्ष न देता केवळ शब्दच - शब्दार्थच पाहतात असे बरेच वेळेस जाणवते. मला वाटते यामागचे थोडे शास्त्र पाहणे वावगे होणार नाही. नामाबद्दल भगवद्‍गीतेचा १७.२३ श्लोक सांगतो - ॐतत्सदिति निर्देशो ब्रह्मणस्त्रिविधः स्मृतः - परब्रह्माचा ॐ तत्‌ सत्‌ अशा तीन प्रकारे नाम निर्देश केला आहे. ह्याचा अर्थ नामरूपरहित परमात्म्याला प्रथम केव्हांतरी नाम दिले गेले असे नव्हे तर परमेश्वराचा व नामरूपाचा संबंध अनादि आहे एवढेच. यावरच्या श्रीज्ञानदेवकृत दोन-तीन ओव्या पाहिल्यास भाव जास्त स्पष्ट होईल.
उपजलिया बाळकासी । नांव नाहीं तयापासीं ।
ठेविलेनि नांवेंसी । ओ देत उठी ॥ ३३० ॥
कष्टले संसारशिणे । जे देवों येती गार्‍हाणे ।
तया ओ दे नांवे जेणें । तो संकेतु हा ॥ ३३१ ॥
हे असो प्रजापती । शक्ति जे सृष्टी करिती ।
ते जया एका आवृत्ती । नामाचिये ॥ ३३५ ॥
जन्मास आलेल्या बालकास प्रथम नाम नसते, पण ठेवलेल्या नांवाने हांक मारली की हे आपले नांव आहे असे समजून ते 'ओ' देते. संसारात शिणलेले जीव आपल्या दुःख निवारणार्थ जेव्हां परमेश्वराचा धावा करतात, तेव्हां ज्या नांवाने हांक मारली असता मी धावून येतो ते ॐ हे संकेत रूप नाम हेच होय. प्रजापतीच्या ठिकाणी सृष्टी निर्माण करण्याची जी शक्ति आहे ती त्या एका नामाच्या आवर्तनामुळेच आली आहे. ह्यावरून काय दिसते ? नाम व रूपरहित निर्गुण परमात्म्यास सतत स्मृतीत ठेवणे कठीण म्हणून त्याला (जीवाने) नाम व रूप दिले, जेणेंकरून त्या (नामाच्या) योगे परमात्म्याशी अनुसंधानाने जडणे सोपे होते. ब्रह्मदेवाने (हाही एक श्रेष्ठ जीवच) जेव्हां 'नामाचिये आवृत्ति' केली तेव्हां त्याच्यासमोर कोणते रूप असेल ते असेल पण त्या नामाने त्याला थोर मात्र केले. अर्थात्‌ नामाबरोबर रूपाचीही आवश्यकता आहे. आणखी महत्त्वाचे म्हणजे नाम व रूप असलेले जे काही मूर्त स्वरूप असेल त्याच्या महतीची देखील थोडीफार तरी कल्पना असणे आवश्यक आहे. कोणी abrakadabra म्हणून जप केला तर त्याला काहीच साध्य होणार नाही हे सर्वविदितच आहे. अशा मूर्त रूपाची भक्ति करणे, प्रेम करणे शक्य होते. ह्यासाठी अमूर्त ॐ ऐवजी मूर्त देवाचे नाम घेणे सोपे. बरे इतक्या देवांमध्ये रामच कां ? कारण परमेश्वराच्या अनेकअवताररूपांत 'राम' ह्या नामाने निर्देशित रूप अत्यंत आदर्श असे आहे. रामायणाची सुरुवातच पाहिली तर दिसेल की जेव्हां श्रीनारदांना श्रीवाल्मीकि मुनिंनी विचारले की, " या जगात गुणी, वीर्यवान, धर्माचे रहस्य जाणणारा, कृतज्ञ, सत्यवचनी, प्रतिज्ञापालक, सद्वर्तनी, सर्वहितैषी, विद्वान, शक्तिमान, सुंदर, विवेकी, संयमी, तेजस्वी, अनिंदक (केवढी गुणांची यादी ही - ही माझी नव्हे, रामायणात आहे सर्ग १ श्लोक २ ते ४) ह्या सर्व गुणांनी युक्त कोण आहे ?" सर्वज्ञ अशा श्रीनारदांनाच जर ह्याशिवाय दुसरे रूप आदर्श माहीत नाही तर दुसरी आदर्श व्यक्ति असणे शक्यच नाही - मग श्रीराम ही सर्वांत आदर्श मूर्ति ठरणे हेओघाने आलेच. श्रीरामरूप भगवंताचे नाम घेणे - नामाची आवृत्ति करणे - नामस्मरण करणे म्हणजे दिव्यशक्तियुक्त देवाच्या प्रतिकाचे सतत स्मरण - अनुसंधान करणे. गुरुदेव रानडे म्हणतात - Name is a symbol of God, carrying spiritual divine power, and therefore Namasmarana is the process of constant identification with the Infinite - नामस्मरण म्हणजे देवाशी एकरूप होण्याची प्रक्रिया.
आता जरा श्रींचे आजचेच (६ एप्रिल) प्रवचन पाहू. फक्त पहिली ओळच पहा. 'व्यवहारात ज्याला चांगले वागता येत नाही, त्याला नाही परमार्थ करता येणार.' 'चांगले वागणे' म्हणजे आदर्श डोळ्यासमोर आलाच. मी माझा लोभ, माझा राग, माझी विषयासक्ति हे सर्व कायम ठेवून "नाम घेत राहिल्याने आपोआप नाहिसे होतील" असे म्हणत त्यांच्या निवृत्तिबद्दल विचारही न करणे अशाने व्यवहारात चांगले वागणे जमू शकेल का ? पुढे म्हणतात - 'भगवंतापरते कोणी नाही हे कळले म्हणजे मी कोण हे कळते.' हा संक्षिप्त उपदेश झाला. त्यावर चिंतन करा असे पुढे सांगावयाची आवश्यकता नाही. भगवंत म्हणजे सत्‌ चित्‌ आनंद - मी माझा लोभ, माझा राग, माझी आसक्ति कायम ठेऊन निरंतर समाधान, अबाधित आनंद स्थितीच्या प्राप्तीची कल्पनाही करू शकत नाही. समाधानात, आनंदात राहता आले तर भगवंत म्हणजे काय हेही कळते आणि एममेवाद्वितीयं असा भगवंत समजला, समत्व दृष्टी लाभली की 'मी' असा वेगळा राहातच नाही. श्रीरामाप्रमाणेच सद्‌गुरूंचे गुण सतत स्मरणात ठेवणे आणि ते आचरणात आणण्याचा प्रयत्‍न करणे हेही गरजेचे आहे. आधी एकच गुण पाहू - दुसर्‍यांच्या दोषांकडे दुर्लक्ष करून, दुसर्‍यावर लाभाविण प्रीति करणे. जो कोण संपर्कात येईल त्यावर श्रीमहाराजांनी निर्भेळ प्रेमाचा वर्षाव केल्याशिवाय का भक्तगण त्यांची एवढी भक्ति करायचे ? माझ्यापुरते म्हणायचे तर मी म्हणेन हा एकच गुण जरी अंमलात आणता आला तरी माझ्या ह्या जन्माचे सार्थक झाले, बाकीचे पुढच्या जन्मी बघू. 'नाम घ्या' हा श्रींचा core संदेश झाला. सर्वांगिण उपदेश लक्षात घ्यायचे म्हटले तर - नम्र व्हावे सर्वां भूता, परनारी राहो माता, आल्या अतिथा अन्न द्यावे. . . नामात मुरले पाहिजेच - पण त्याला नीतिची, सदाचरणाची, कर्तव्याची जोड देणे नितांत आवश्यक आहे हेही सांगितले. आणखी काही करू नका म्हणजे आपल्याला जे झेपणार नाहीत अशा इतर फंदात(उपासतापास, योग, ध्यानधारणा इ. साधने यांत) पडूं नका एवढाच त्याचा अर्थ.
एकोहम् -

No comments: