09 May, 2008

श्रीज्ञानेश्वरी महिमा

श्रीज्ञानेश्वरी महिमा
ज्ञानराजांच काव्य आत्मीय, आणि तसंच रसाळ व आस्वादक आहे. त्यांच सगळंच साहित्य त्या वलयात रमून जाण्यासारखं तर आहेच पण त्याचबोरबर गुंतून गुंग होण्यासारखं आहे. याच्या प्रभावामुळे, भक्तिभावामुळे कोठेतरी त्या माऊलीच्या परिवारातच जीव वावरत राहतो.
सगळ्याच संतमंडळाच्या आचार विचार उच्चारांनी आपण भारले जातो. त्यातून एक सूक्ष्म विचार-निवड, सत्य व अनृत वेगळं करण्याची दृष्टी प्राप्त होते. मग अभ्यास नकोसा होतो, आणि अधिष्ठानावरची नजर हालत नाही.
या संतसाहित्यात परब्रह्मस्वरूप अभिव्यक्त होत असले तरी त्याचे दर्शन सहजासहजी होत नाही. शब्द परिचय झाला, पाठ झाले, तरी त्यातला अर्थ आशय गळी उतरतोच असे नाही. संतांचे विचार आत्मारामाच्या अनुभवावर आधारलेले असतात. आपले श्रीतुकोबाराय म्हणतात, "अनुभवे आले अंगा । ते या जगा देतसे ॥"
आपल्याला शब्दार्थ कळला एकवेळ, तरी अनुभव नसतो म्हणून असे घडते. संतांचा अनुभव उत्कट तर असतोच आणि त्याबरोबरच प्रकट होण्यासाठी तो आतुरही असतो. अशी दिव्य भव्य उत्कटता आणि आतुरता, श्रीज्ञानराजांच्या सगळ्याच ग्रंथात विपुल आढळते. त्यामुळे त्यांच्या विभूतीमत्त्वाचा शोध घेतांना आपण मुग्ध होतो, स्तब्ध होतो.
श्रीगुरु माऊलीचे विभूतीमत्व असामान्य आहे, लोकोत्तर आहे, अद्वितीय आहे. त्याचबरोबर ते बहुकक्ष आहे. या चराचर विश्वातील एकही असा विषय नाही कीं तो ज्ञानोबारायांच्या ग्रंथात आला नाही. किंबहुना सगळ्याच संदर्भांना ज्ञानराजांच्या वाङ्‍मयीन स्पर्शाने अभूतपूर्व प्रतिष्ठा लाभली आहे.
आत्मनिष्ठा, अध्यात्म हा त्यांच्या रचनेचा, तसाच त्यांच्या विभूतीमत्वाचा गाभाच आहे. त्यातूनचे त्यांच्या विभूतीमत्वाचे अनेकानेक पैलू आकारास आले आहेत. हे सगळे पैलू जरी भिन्न भिन्न असले तरी एकात्म आहेत. त्यांची दृष्टीच चिन्मयी आहे. याच अलौकिकामुळे ते गगनालाही गवसणी घालतात. त्यांच्या अफाट कैवल्य स्वरूपाचा वेध घेण्यास जमिनीवरच उभ्या असलेल्या सामान्य माणसाचा अवाका अतिशय थिटा पडतो. तरीपण श्रीज्ञानदेवांच्याच "गीता जाणा रे वाङ्‍मयी । श्रीमूर्ति प्रभूची ॥" या वचनाने बोट धरून - "ज्ञानेश्वरी जाणा हे वाङ्‍मयी । श्रीमूर्ति ज्ञानदेवांची ॥" असं म्हणता येतं. नुसत म्हणणे नाही तर ते अक्षरशः अगदी खरेच आहे. श्रीज्ञानेश्वरी आणि श्रीज्ञानेश्वर महाराज दोन नाहीत, तर या अक्षर रूपांनी खुद्द श्रीज्ञानोबारायच आहेत.
श्रीगुरु ज्ञानदेवांनी आपल्या सगळ्याच ओव्या - अभंगांतुन आत्मस्वरूपापासून परमात्म स्वरूपापर्यंत सगळीच "रूपें" रेखाटली आहेत. ही सगळी रूपे अरुपाची आहेत, अक्षराच्या पलिकडे असणार्‍या उत्तम पुरुषाची आहेत. शब्दांत न गवसणारे "अरूप" माऊलीच्या अभिव्यक्ति सामर्थ्यामुळे शब्दरूपाने स-रूप झाले आहे; साकारले आहे.
या सगळ्या साहित्याचा उद्देश केवळ कला म्हणून नाही, तर विवेकाची वाण फिटावी, आणि ब्रह्मविद्येचा सुकाळ व्हावा हाच आहे. पण आत्मविद्या हा एक असा मौजेचा विषय आहे कीं तो मौनात दडत नाही आणि बोलांत सांपडत नाही. भक्ति-प्रेमभावाला हेच परिणाम अगदी तंतोतंत लागू पडते. तुकोबाराय म्हणतात - "प्रेम नये सांगता, बोलता दाविता । अनुभवे चित्ता चित जाणे ॥"
आपल्या श्रीगुरु ज्ञानमाऊलीची तर प्रतिज्ञाच अशी आहे की "ऐंद्रिय जाणिवांच्या पलिकडचे आत्मस्वरूप शब्दांत मांडावयाचे, तेही इतक्या गोड शब्दांत कीं, ज्ञानेंद्रियांत गोड भांडण लागेल आणि अमृताच्यापण तोंडाला पाणी सुटेल". म्हणून श्रीज्ञानेश्वरी म्हणजे तर शब्दांचे वस्त्रालंकार धारण केलेली प्रत्यक्ष परब्रह्म मूर्तीच. हे शब्दांचे वस्त्रालंकार परमात्म्यास नुसते सजवत नाहीत, तसेच झाकत तर नाहीतच, पण त्याला, म्हणजे परब्रह्माला, इंद्रियग्राह्य करतात. अशा ग्रंथाची साथ संगत कायम राखावी.

अण्णा -

No comments: