18 May, 2008

श्रीज्ञानेश्वरी महिमा - २

श्रीज्ञानेश्वरी महिमा - २

श्रीज्ञानदेवांसारखे वैष्णव नेहमीच अतिशय विनयाने पण तेवढ्याच आत्मविश्वासाने, श्रवणातून ब्रह्मरसाचा आस्वाद कसा घ्यावा याचा परिचय करून देत असताना श्रोत्यांचा अनुनय करतात. "वक्ता तो वक्ता नव्हे । श्रोतेनविण ॥" यात वक्त्याचे समाधान आणि श्रोत्यांचे अवधान सतत उत्सुक आणि उत्साहपूर्ण आहे. संवादातील वातावरण सदैव ताजेतवाने आहे. तोंड भरून विचारावे असे अर्जुनासारख्या श्रोत्याला वाटते आणि कान ओसांडून वाहतील इतके बोलावे असे भगवान श्रीकृष्णाला वाटते; आणि वक्ता व श्रोता यांच्या परस्परामधील प्रेमामुळे, भक्तिमुळे कधी कधी विषयांतराचा, पुनरुक्तिचा तसाच पाल्हाळाचा भागही रुचीने बोलला - ऐकला जातो.
"चातकाचिये कणवे । मेघु पाणियेंसी धावें । तेथ चराचर आघवें । निवालें जेवि ॥" अशी वाचकांचीही अवस्था होते. स्वतः आत्मतृप्तीने निवून श्रीगुरु थांबलेले नाहीत तर त्यांनी वाचकांनाही स्वानंदसाम्राज्याच चक्रवर्तीत्व बहाल केलं आहे. "मने काये वाचा । जो सेवकु होईल इयेचा । तो स्वानंद साम्राज्याचा । चक्रवर्ती करी ॥"
हे चराचर विश्व म्हणजे मूर्त-अमूर्ताची सुंदर, सुरेख, नयनरम्य, लोभसवाणी क्रीडाच आहे. कधी अमूर्त प्रकट होते, तर कधी मूर्त अनंतात लपून राहते. एकदा का आपल्याला मूर्तामूर्ताच्या या खेळाची गोडी लागली, की मग ज्ञानेश्वरीच्याच काय पण साऱ्याच संतसाहित्यातील कोडी अलगद, हळूवारपणे आपोआप उलगडू लागतात, मग अरुपाचे रूप दिसते, रुपातील अरूपता जाणवते, आणि त्याचबरोबर रुपारुपांतील द्वैतही, भेदपण मावळून जातो.
श्रीज्ञानेश्वरीच्या सर्वांगी हा खेळ कसा छान रंगला आहे. अगदी पहिल्याच ओवीत वेदप्रतिपाद्य आद्यतत्त्व आणि स्वसंवेद्य आत्मरूप यांचे आपल्याला चर्मुचक्षूंनी न दिसणारे पण तत्त्वतः असणारे ऐक्य श्रीगुरुंनी अतिशय चपखलपणे दाखवले आहे, आणि पाठोपाठ लगेचच या आत्मस्वरूपालाच "देवा तूंचि गणेशु" म्हणून सावयव, सगुण साकार केलं आहे.
आपल्या डोळ्यांसमोर अशी आपल्या परिचयाची गणेशमूर्ती पुढ्यांत दिसते न दिसते तोंच तिला वाङ्‍मय गणेशाचे रूप उभे केले आहे. श्रीज्ञानराजांच्या वाङ्‍मयीन आणि आध्यात्मिक रुपकांनी गणेशाचे रुपडे स्पष्ट होते. अठरा पुराणांची मणिभूषणे, षड्दर्शनांच्या भुजा, तर्कशास्त्राचा परशू, वेदांचा रसाळ मोदक असा गणराज साकार होतो. सगळे शब्दब्रह्मच मंगलमूर्तीस्वरूप होऊन जाते.
मूर्तास अमूर्त आणि अमूर्तास मूर्त करण्याची किमया हा श्रीज्ञानराजांच्या प्रतिभेचा, ऋतंभरा प्रज्ञेचा सहज विलास आहे. या सगळ्यामध्ये एकाच वेळी रुपाचे अरुप आणि अरुपाचे रूप होऊन जाते. श्रीज्ञानाईस यांत सगुण-निर्गुणाचे मूलभूत असलेले ऐक्यच अभिप्रेत आहे. या अभेद - अद्वैत सिद्धांताच्या बैठकीमुळे येथील भाषा सीमीत असलेली दिसली तरी अर्थाच्या अंगाने विस्तारतच जाणारी आहे. अशा वेळी श्रीज्ञानोबारायांच्या शब्दातील आशय पकडतांना, अर्थाला मनाची मिठी घालतांना जरी दमायला झाल्यासारखे वाटले तरी या दमण्यातही पूर्ण विसावा आहे. या विसाव्यातच आनंद आहे. समाधिसुख आहे.
अनंत अरूप संकल्पना श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या मनःचक्षूसमोर शब्दरूप घेत असतात आणि त्याचवेळी, प्रत्यक्षांतील रूपसंपन्न आकारांतील व्यापक अरुप चैतन्यतत्त्वही श्रीज्ञानोबारायांच्या अंतःचक्षूंना दिसत असते, आणि ही सगळीच रूपे त्यांनी शब्दबद्ध केली आहेत.
अरुपाला रूप आले, निराकार साकार झाले, निर्गुण सगुण झाले की त्याला नटवण्या सजवण्याची हौस ही भक्त भगवंताच्या - महाभागवतांच्या मनी जागी होत असते. म्हणून तर हा अक्षरांचा खेळ, अनुभवांतून - स्वानुभवांतून सतत कागदावर उतरत असतो.

अण्णा -

No comments: