26 July, 2009

श्री विष्णु सहस्त्रनाम - (प्रस्तावना -२)

।। श्री विष्णु सहस्त्रनाम ।।

सध्या दक्षिणेमध्ये प्रचलित असलेल्या व उत्तरेत प्रचलित असलेल्या विष्णु सहस्त्रनामामध्ये थोडा थोडा फरक आढळून येतो. परंतु या पाठभेदांना फारसे महत्व देण्याचे कारण नाही. तसेच विष्णु सहस्त्रनामाचे पारायण करण्यापूर्वीच्या अर्चना पद्धती मध्येही थोडासा फरक आढळून येतो.

पुराणांची रचना करणार्‍या श्रीवेदव्यासांनीच श्रविष्णु सहस्त्रनामाची रचना केलेली आहे व हे अप्रतिम स्त्रोत्र त्यांच्या विख्यात अशा महाभारत ह्या ग्रंथात समाविष्ट झालेले आपल्याला आढळते. भारतीय युद्धाचे शेवटी ज्येष्ट पांडव राजा युधिष्ठीर भीष्म पितामहांच्या दर्शनांस जातो. त्यावेळी कुरूवंशातील अपराजित व दुर्दम्य असा हा पुरूषश्रेष्ठ परमेश्वराकडे घेऊन जाणार्‍या पवित्र क्षणांची वाट पहात, तीक्ष्ण बाणांची शय्याकरून पहुडलेला असतो. धर्मज्ञ युधिष्ठीराने त्यांना सहा प्रश्न विचारले आहेत. व भगवान कृष्णाचे नित्य स्मरण करणार्‍या व महान कर्मयोगी भीष्मांनी त्यांची सहज शांतपणे उत्तरे दिलेली आहेत. अशातर्‍हेने हिंदूंच्या अक्षर वाङमय असलेल्या महाभारतात हे विष्णू सहस्त्रनाम अंतर्भूत झाले आहे.

युधिष्टीर हा धर्मपरायण व आध्यात्मिक मनोवृत्तीचा आहे. पूर्णतः नितिनिपूण असून विचक्षण व्यक्तीमत्वाचा हा राजा साधारणतः सर्वच साधकांचे समोर जे प्रश्न उठतात तेच प्रश्न ह्या ठिकाणी विचारतो आहे.

प्रश्न १ - किमेकं दैवतं लोके ?
जगतामध्ये सर्वश्रेष्ठ असे दैवत कोणचे आहे?
उत्तर १ : - पवित्राणां पवित्रं यो मंगलानांच मंगलम् ।
दैवतं देवतानांच भूतानां योऽव्ययः पिता ।

सर्व पवित्र वस्तूंना ज्याच्यामुळे पावित्र्य प्राप्त झाले आहे व जो स्वतःच मूर्तीमंत पावित्र्य आहे; जो मंगलांचे मंगल असा परममंगल आहे; सर्व दैवतांचे दैवत आहे, सर्व प्राणिमात्रांचा आद्यपिता जगत्प्रभू "श्री विष्णू''.

प्रश्न २ - किंवाप्येकं परायणम् ?
सर्वांचे 'आश्रयस्थान' असा कोण आहे ?
उत्तर २ : - परमं यो महत्तेजः परमं यो महत्तपः ।
परमं यो महद्ब्रह्म परमं यः परायणम् ।

जो महान तेजस्वी आहे, जो सर्वश्रेष्ठ नियन्ता आहे, जो सर्वव्यापी असे महान ब्रह्म आहे, तोच सर्वांचा सर्वश्रेष्ठ 'आश्रय' आहे. '' श्री विष्णू''.

प्रश्न ३ - स्तुवंतं कं प्राप्नुयुर्मानवाः शुभम् ?
कोणाची स्तुती केली असता मानवाला शुभ प्राप्ती होईल? (शांति व समृद्धी)
उत्तर ३ - जगत्प्रभुं देवदेवमनन्तं पुरूषोत्तमम् ।
स्तुवन्नाम सहस्त्रेण पुरूषः सततोत्थितः ।

जगताच्या कल्याणकरतां जो सदैव जागृत व कर्मरत आहे असा जगताचा प्रभू अनन्त पुरूषश्रेष्ठ '' श्री विष्णू''

प्रश्न ४ - कमर्चन्तः प्राप्नुयुर्मानवाः शुभम् ?
कोणाची पूजा केली असता मानवाला सर्व शुभ प्राप्ती होईल ?
उत्तर ४ : - तर्मेव चार्चयन्नित्यं भक्त्या पुरूषमव्ययम् ।
ध्यायंस्तुवन्नमस्यश्च यजमानस्तमेवच ।

त्या पुरूषोत्तमाचे नित्य ध्यान केले असता, त्याचे नित्य पूजन केले असतां व त्याला वारंवार नमन केले असता मनुष्याला सर्व शुभ प्राप्ती होईल.

प्रश्न ५ - को धर्मः सर्व धर्माणां भवतः परमो मतः ?
आपल्या मताप्रमाणे सर्वधर्मात श्रेष्ठ धर्म कोणता?

प्रश्न ६ - किं जपन् मुच्यते जन्तुर्जन्मसंसार बन्धनात् ?
कोणाचा जप केला असता प्राणी जन्म व संसार बंधनातून पलीकडे जाईल ?

उत्तर ५व ६ : - अनादि निधनं विष्णुं सर्वलोक महेश्वरम् ।
लोकाध्यक्षं स्तुवन्नित्यं सर्वदुःखातिगो भवेत् ।

शेवटच्या दोन्ही प्रश्नांचे हे उत्तर आहे. सर्वश्रेष्ठ धर्म स्वतः श्री विष्णुच आहे. ज्याला 'आदि ' नाही व 'अंत' ही नाही असा तो जगताचा महाप्रभू आहे. जो नित्यशः सहस्त्रनामाचा पाठ करतो व सर्वज्ञानी परमेश्वराची अंतरांत स्तुती करतो तो सर्व दुःखे पार करून जातो व संसार बंधनातून मुक्त होऊ शकतो.

परमेश्वराचे असे वर्णन केले जाते कि, ' ज्याचेपासून सुरवातीला सर्व नामरूपात्मक जगताची उत्पत्ती झाली, ज्याच्या आधाराने जगताचे पालन (स्थिती) होत आहे व प्रलयाचे वेळी ज्याच्यामध्ये सर्व जगत् लय पावते तो परमेश्वर म्हणजेच "श्री महाविष्णु''.

युधिष्ठीराच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर भीष्म म्हणतात, '' आता मी तुला त्याची एक हजार नावे सांगतो. ती तू पूर्ण अवधान देऊन श्रवण कर.'' अशाप्रकारे विष्णु सहस्त्रनाम हे स्त्रोत्र महाभारतात गुंफले गेले.

त्या ईश्वराची खरे पाहतां व्याख्या करतांच येत नांही, कारण तोच सर्व गुणांचा मूलाधार आहे त्यामुळे कुठल्याही नावांने त्याचे नामकरण होऊ शकत नाही. कुठल्याही उक्तीने त्याचा निर्देश करतां येत नाही, कोणत्याही भाषेत त्याची व्याख्या करता येत नांही अगर कुठल्याही वांङमयीन कृतीने त्याचे पुसटसे वर्णनही करतां येत नांही. तो सर्व ज्ञात व अज्ञात जगताच्याही पलीकडे आहे. आपले सर्व अनुभव ग्रहण करणारी व ज्ञान प्रकाश देणारी शक्ती तो स्वतःच आहे.

तरीही त्याची अनेक व्यक्तरूपेहि आहेत. त्या व्यक्तरूपांच्या संदर्भात त्याची अनेक नामेही असणे शक्य आहे. ज्या वस्तूची व्याख्या केली जाते तिचे पूर्ण स्वरूप आपल्याला सरळ त्या व्याख्येमुळे समजते. या ठिकाणी जे सत्य आहे व अनंत आहे त्याची व्याख्या एक हजार पर्यायी सीमित व नाशवंत वस्तूमधून कलेली आढळते. पूर्वी ऋषींनी ही सहस्त्रनामे तयार केली व जगताला उपदेशिली. द्रष्टेकवी श्री व्यासांनी ती सर्व नामे श्रीविष्णुस्त्रोत्र रूपाने एकत्र बांधली व मोठ्या श्रध्देने ही भक्तीमाला श्रीविष्णूला अर्पण केली.

अशा तर्‍हेने ह्यातील प्रत्येक नाम हे ज्ञाताच्या माध्यमातून त्या अज्ञात सत्याचा निर्देश करीत असल्यामुळे ज्यावेळी आपण त्या त्या व्याख्यांवर सूक्ष्मचिंतन करतो तेव्हा मन एका उच्च अवस्थेत झेप घेते व दिव्य अनुभवापर्यंत पोहोचते. त्यामुळेच हे विष्णुसहस्त्रनाम भक्त आपल्या दैवता बरोबर मधुर भक्तीभावनांची क्रिडा करण्याकरिता उपयोगात आणतात तर तत्वज्ञानाचे जिज्ञासू विद्यार्थी आपल्या तत्वचिंतनातून उच्च जाणिवेच्या अवस्थेत जाण्याचे वाहन म्हणून ह्याचा उपयोग करतात.

'कलिसंतरण उपनिषत्'१ नावाचे एक लहान उपनिषतद आहे व त्यामध्ये असा उल्लेख आहे कि एकदां परमभक्त नारद ब्रह्मदेवाकडे जातात व त्या कलीयुगातील अनिवार्य व कठीण अशा बहिर्मुखवृत्तींपासून निवारण करून मनुष्याला स्वतःचा विकास करता येईल असा उपाय विचारतात. तेंव्हा '' आदिपुरूष नारायणाच्या नामजपानेच मनुष्याचा उद्धार होईल '' असे उत्तर ब्रह्मदेवाकडून मिळाले. ह्या ठिकाणी एका गोष्टीचा मुद्दाम उल्लेख करणे अत्यावश्यक आहे किं सहाव्या प्रश्नामध्ये '' प्राणिमात्रास त्याचे श्रेष्ठ ज्ञान कसे होईल'' अशी विचारणा केली आहे. 'जन्तु ' ह्या शब्दाचा अर्थ जो जन्मास आला तो. (जनन धर्मा) त्या शब्दामुळे सर्व मनुष्येतर प्राणीहि हे ज्ञान मिळविण्यास अधिकारी आहेत असे सुचविले आहे. व ह्याचे अनेक उल्लेख आपल्याला पुराणांनी अत्यंत काव्यमय भाषेत उपलब्ध करून दिले आहेत. त्रिकुटाचलावरील तळयात असलेल्या मगरीने गजेद्राचा पाय धरला असतां त्याचे त्याचे परमेश्वराने रक्षण केले ( गजेन्द्रमोक्ष ) त्याच प्रमाणे जडभरताची कथा हेहि त्याचे आणखी एक उदाहरण आहे.

शंकराचार्यांनी आपल्या भाष्यामध्ये ह्या ठिकाणी तीन तर्‍हेच्या जपाचा समावेश केला आहे. (अ) जो जप इतरांना ही ऐकू जाईल असा (ब) जो स्वतःलाच ऐकू येतो असा (क) व जो केवळ मानसिकच आहे असा. विष्णुसहस्त्रनामाचा जप तीनही प्रकारांनी करता येतो.

ह्या सहस्त्रनामामध्ये कांही ठिकाणी क्वचित्त पुनरूक्ती झालेली आपल्याला आढळून येते. ह्यातील बरोबर ९० नामांची पुनरूक्ती झालेली आहे. त्यापैकी ७४ नामे दोनवेळा पुनरूक्त झालेली आहेत; १४ नामे ३ वेळां व २ नामे चारवेळां पुनरूक्त झालेली आढळतात. कांहीवेळां एकच नाम पुनःपुन्हा आलेले आहे. जसे विष्णु विष्णु , शिव शिव.

कांहीवेळां समानार्थी शब्दच अनेकवेळा वापरलेले आहेत. जसे श्रीपती - माधव, पुष्कराक्ष - कमलाक्ष. परंतु हे स्त्रोत्र त्याच्याच विभूतींचे वर्णन करणारे असल्यामुळे हा दोष मानण्याचे कांही कारण नाही, स्तुतीस्त्रोत्रांमध्ये पुनरूक्ती ग्राह्य मानली जाते. भावपूर्ण हृदय आपली प्रेम भावना व्यक्त करण्याकरतां हीच पद्धत स्विकारते.

ह्या सहस्त्रनामामध्ये परमेश्वराची १०३१ एकेरी नामे दिलेली आहेत. ह्यातील १०० पेक्षां जास्तीची ३१ नामे ही त्याला लागून आलेल्या आधीच्या नामांची विशेषणे समजली पाहिजेत. ज्यावेळी परमेश्वराची ह्या सहस्त्र नामांनी अर्चना२ केली जाते त्यावेळी त्या नामाचे चतुर्थी विभक्तीचे रूप वापरले जाते. ह्या स्त्रोत्रांमध्ये २० जोडनांवे आहेत व ती३ पहिल्या पांचशे नामामध्ये आली आहेत. पुढील ११ जोडनांवे स्त्रोत्राच्या पुढील अर्ध्या भागांत आली आहेत.

ह्या स्त्रोत्रात एकच अव्यय वापरण्यात आलेले आहे. (८९६ वे - सनात्), अर्चनेमध्ये 'सनात् नमः' असे त्याचे चतुर्थीचे रूप वापरले जाते. त्याचप्रमाणे ९२९वे नाम हे अनेकवचनी असल्यामुळे अर्चनेमध्ये सदभ्यो नमः असे म्हटले जाते.

आपण ह्या दिव्य नामांचा खोल अर्थ पाहू लागलो कि असे दिसून येते किं व्यासांनी कांही ठिकाणी पुल्लिंगी नामें वापरली आहेत, कांही ठिकाणी स्त्रीलिंगी तर कांही ठिकाणी नपुसकलिंगीहि नामे आहेत. ज्या ठिकाणी पुल्लिंगी नामे आहेत तेथे लक्ष्मीचा पती श्रीविष्णु ह्याचा निर्देश केला जातो. ज्या ठिकाणी स्त्रीलिंगी नामे आहेत तेथे शक्ति, सत्ता अगर महत्ता निर्देशिली आहे, व जेथे नपुंसकलिंगी नामे आहेत तेथे शुद्ध ब्रह्म, अनंतज्ञानाचा निर्देश आहे.

साधारणतः ही अर्चना भगवत्भक्त रोज करतात. व ते करणे सोईचे नसेल तर ही पूजा स्वतःचे वाढदिवशी, ग्रहणाचे दिवशी अगर सूर्य एका वृत्तामधून दुसर्‍या वृत्तांत जातो अशा संक्रमणाचे दिवशी केली जाते. शास्त्रामध्ये अशातर्‍हेचा पूजाविधी ग्रहयोग, राजाची अवकृपा, असाध्य व्याधी, दुष्टशत्रू ह्या सर्वांपासून होणार्‍या दुःखाच्या निवारणार्थ सांगितलेला आहे. परंतु सर्वात महत्वाचा परिणाम म्हणजे अंतःकरण शुद्धि व त्यामुळे साधकांस ध्यानामध्ये उत्तरोत्तर मिळत जाणारे समाधान !
----------------------------------------------------
१ सर्व श्रुतिरहस्यं गोप्यं तत् येनकति संसारं तरिप्यसि भगवतः आदिपुरूषस्य नारायणस्य नामोच्चारणमात्रेण निर्धूतकलिभवति ।। कलिसंतरण उपनिषत् .१.
२ पहिल्या शंभरांत ५ जोडनांवे आहेत ती अनुक्रमे १२, १६, ३०, ४६, ५५. दुसर्‍या शंभरांत २ जोडनांवे आलेली आहेत ती अनुक्रमे १२०, १२४. तिसर्‍या शंभरांत ४ जोडनांवे आलेली आहेत ती अनुक्रमे २१७, २३२,२७५. चवथ्या शंभरांत ४ जोडनांवे आलेली आहात ती अनुक्रमे ३३३, ३५९, ३९०, ३९९. पाचव्या शहभरांत ५ जोडनांवे आलेली आहेत ती अनुक्रमे ४०४, ४२७, ४२९, ४५४, ४९३.
३ उत्तरार्धात ६ व्या शतकांत ६ जोडनांवे आहेत. ५१४, ५३१, ५५२, ५५६, ५७२, ५७३. ७ व्या शतकांत १ जोडनांव आहे. ६२७. ८ व्या शतकांत ३ जोडनांवे आहेत. ७३२, ७९४, ७९९.
_________________________
(क्रमशः)
डॉ. सौ. उषाताई गुणे .



No comments: