31 January, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक ९

श्री विष्णु सहस्रनाम  श्लोक ९

ईश्वरो विक्रमी धन्वी मेधावी विक्रमः क्रमः ।
अनुत्तमो दुराधर्षः कृतज्ञः कृतिरात्मवान्  ।।
(७४) ईश्वरः :  - जो सर्व शक्तिमान आहे व म्हणूनच सर्व शक्ति ज्याचेमध्ये पूर्णतेच्या अवस्थेत रहातात तो ईश्वर. प्रत्येक बुद्धिवान मनुष्यातील चैतन्यशक्ति तीन प्रकारांनी व्यक्त होत असते. (१) शरीराची कृती करण्याची शक्ति - क्रियाशक्ति (२) मनाची इच्छा करण्याची शक्ति - इच्छाशक्ति (३) बुद्धिची ज्ञान करून घेण्याची शक्ति - ज्ञानशक्ति. ह्या तीनही शक्ति चैतन्याचीच व्यक्त रूपे आहेत म्हणून तोच सर्व ठिकाणी व्यक्त होत असतो. तोच सर्व शक्तिमान श्रीविष्णु आहे.
(७५) विक्रमी :  - जो विक्रम (शौर्य) युक्त आहे, म्हणजेच शक्ति, धैर्य व साहस युक्त आहे. दुसरा अर्थ असा की ज्याचे 'पदक्रमण' वैशिष्ठ्यपूर्ण आहे तो. विक्रमी, बटुमुर्ती वामनाने आपल्या लहानशा पावलांनी तीनही लोक व्यापून टाकले ह्या कथेची येथे आठवण दिली आहे.
(७६) धन्वी :  - भगवान् विष्णूचे दिव्य धनुष्य शारंग नावाने ओळखले जाते; व ते अत्यंत शक्तिमान असे शस्र मानले जाते. ज्याचे जवळ नित्य अत्युत्कृष्ठ असे धनुष्य असते तो धन्वी. धन्वी ह्या संज्ञेनें आपल्याला श्रीविष्णुचा सातवा अवतार 'श्रीरामचंद्र' ह्यांचे स्मरण होते. राक्षसाधिपती रावणापासून जगताचे रक्षण करण्याकरतां श्रीरामानें आपल्या आयुष्यातील बराच मोठा काळ रानात व्यतीत केला, त्यावेळी त्याला सतत धनुष्य सज्ज ठेवावे लागत असे म्हणून श्रीरामांना ' धनुष्पाणी ' असे म्हटले जाते. व शरणगताचेे रक्षण करण्याच्या त्यांच्या व्रतामुळे त्यांना 'कोदंडराम' असे संबोधिले जाते. म्हणूनच ' धन्वी - धनुष्य धारण करणारा ' ही संज्ञा श्रीविष्णुला पूर्णपणे लागू पडते. याकरतांच गीतेमध्ये ' धनुष्यधारण करणार्‍यामध्ये मी श्रीराम आहे' असे भगवंतांनी स्वतःच सांगितले आहे. गीता १०.३१
(७७) मेधावी :  - उत्कृष्ठ मेधा - बुद्धी असलेला. म्हणजेच जो सर्व ज्ञान संपन्न आहे असा. सर्व घडणार्‍या गोष्टी आपल्या बुद्धिनें जो पूर्णपणे जाणू शकतो त्याला मेधावी असे म्हटले जाते. सर्व प्राणीमात्रांमध्ये असलेली ज्ञानशक्ती ही प्रकाशमय आहे. व त्या सर्व प्रकाशानेच बुद्धि प्रकाशित होते. श्रीविष्णु हा अनंत प्रकाशमय असल्याने सर्व कालात घडणार्‍या सर्व घटनांचा ज्ञाता तोच आहे. म्हणूनच विद्या व ज्ञानदात्री श्री सरस्वती देवी ही श्रीविष्णुची प्रत्यक्ष जिव्हा आहे असे मानले जाते.
(७८) विक्रमः :  - विक्रमी या नामाचे विवरण करतांना (७५) आपण विक्रम ह्या शब्दाचे स्पष्टीकरण केलेलेच आहे. श्रीविष्णुने वामन अवतारामध्ये तीन पावलांनी तीनही लोकांचे आक्रमण (मापन ) केले ह्या दैवी कृतीला अनुलक्षून ही संज्ञा वापरली आहे.
     तसेच 'वि' म्हणजे पक्षीराज, शुभ्र मान असलेला गरूड. क्रम - पदन्यास किवा प्रवास, गमन. म्हणून ह्या संज्ञेचा अर्थ होईल जो शुभ्र मान असलेल्या गरूडावरून (मन) गमन करतो तो श्रीविष्णु. गरूड हे श्रीविष्णुचे वाहन आहे.
(७९) क्रमः :  - जो सर्वाला व्यापून राहिलेला आहे तो 'क्रम' या नावांने ओळखला जातो. त्याच्या सर्व व्यापकत्वामुळे त्या अनंतालाच श्रीविष्णु म्हटले जाते. सर्व ज्ञात सृष्टिच्याही मर्यादांचे पलीकडे जो असतो तोच 'परमात्मा' व तो विश्वस्वरूपाने व्यक्त झालेला आहे. पुरूषसूक्तामध्ये त्याचे वर्णन करतांना असे म्हटले आहे की ' केवळ ज्ञात सृष्टिस तो व्यापून आहे इतकेच नव्हे तर त्या पलिकडेही तो दहा अंगुळे विस्तार पावला आहे. ( अत्यतिष्ठत् दशांगुलम्)
(८०) अनुत्तमः :  - ज्याची दिव्यता अतुलनीय आहे असा तो अनुत्तम. संस्कृत शब्दरचने प्रमाणे जेव्हा शब्दाने सांगितलेल्या अर्थापेक्षां कांही जास्त सुचवायचे असते तेव्हां अशी रचना केली जाते. ज्याचे पेक्षा दुसरा जास्त उत्तम (उत्तमोत्तम) अस्तित्वातच नाही असा जो तो अनुत्तम. ( अविद्यमानः उत्तमो यस्मात् ) उपनिषदही म्हणते '' (अविद्यमानः परं नापरम् अस्ति किंचित्) तुझ्याइतके तुल्य कोणीही नाही तर तुझ्यापेक्षा जास्त श्रेष्ठ कोण असणार ? गीतेतही हयाच अर्थाचे वचन आहे. ( ११-४३ ) तसेच नारायण उपनिषदांत आपल्याला आढळते 'परमेश्वरापेक्षा उच्च अगर नीच तुलने करता काहीही नाही.'
(८१) दुराधर्षः :  - ज्याचेवर यशस्वीरित्या प्रहार करतां येत नाही, चढाई करता येत नाही किवा ज्यास विच्छिन्न करतां येत नाही असा. म्हणजेच जो सर्वापेक्षा शक्तिमान आहे असा. पुराणातील कथांवरून आपल्याला समजते की अनेक बलवान असूर व दैत्य हतबल होऊन त्याचे सामर्थ्यापुढे शरण आले किवा त्याच्यामुळे नष्ट झाले. ज्याला परम सत्याचे दर्शन झाले आहे त्याच्या मनातील हीनवृत्ती (दैत्य) व इंद्रियांची मायावी शक्ति (राक्षस) परमेश्वरावर विजय मिळविण्यांत हतबल ठरतात. (रसोप्यस्य परंदृष्ट्वा निवर्तते - गीता २-५९)
(८२) कृतज्ञः :  - सर्व प्राणीमात्रांची सर्व कर्मे जाणणारा ज्ञाता कृतज्ञ होय. तो सर्वांची शारीरिक कर्मे जाणतो, सर्वाच्या भावना जाणतो, सर्वांच्या बुद्धितील विचार व हेतू जाणतो तो कृतज्ञ. त्याचे मुळेच सर्वांना, सर्वकालात सर्व ज्ञान होते. म्हणून त्याला कृतज्ञ म्हटले जाते.[1]
     श्रीविष्णु भगवान हाच भक्तांची प्रामाणिक तळमळ, खरी विनम्र भक्ति व अंतःकरण शुद्धि जाणणारा आहे. व त्या प्रमाणे तो भक्तांचे हृदय आनंदाने व परमधन्यतेने भरून टाकतो.
(८३) कृतिः :  - सर्व कर्मामधील प्रत्यक्ष चैतन्य म्हणजेच श्रीविष्णु. तोच सर्व कर्मांच्या परिणामामागेही अवशतेने असतोच. जो सत्कृत्याला अभय देण्याकरतां व दुष्कृत्याला शिक्षा देण्याकरतां अवतार कार्य करतो त्यालाच कृती असे म्हटले आहे. म्हणजे तोच कर्मफलदाता आहे.
(८४) आत्ममान् :  - जो प्राणीमात्रांचा आत्मस्वरूप आहे असा. छांदोग्य उपनिषदांमध्ये शिष्य विचारतो, तो अनंत परमात्मा कोठे स्थित असतो ? ' व त्याला श्रुतीने उत्तर दिले आहे ' तो स्वतःच्या सामर्थ्याने नित्य स्थित आहे. तो आत्मा ' स्वतःच्या महिम्यात'' स्थित आहे. (स्वेमहिम्नि प्रतिष्ठितः – ७.२.१)
डॉ. सौ. उषा गुणे. 


[1]  आधुनिक समाजामध्ये हा शब्द केवळ कृतज्ञता प्रदर्शित करण्याकरता वापरला जातो. स्तोत्रातील येथपर्यंतच्या विचारसरणीचा मागोवा घेताः ’कृतज्ञता’ ही केवळ शब्दांनी प्रदर्शित करावयाची भावना नवे, तर आपल्यासाठी इतरांनी केलेल्या सर्व कृतींबद्दल सतत जाणीव ठेऊन तत्परतेने परत त्यांची सेवा करून त्यांच्या ऋणांतून उतराई होण्याचा प्रयत्‍न करणे होय. भारतामध्ये ही कृतज्ञता केवळ ’आपला आभारी आहे’ अशा दोनतीन कोरड्या शब्दात व्यक्त केली जात नाही.

No comments: