04 February, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक १०

सुरेशः शरणं शर्म विश्वरेताः प्रजाभवः  ।
अहः संवत्सरो व्यालः प्रत्ययः सर्वदर्शनः  ।।
(८५) सुरेशः :  - पुराणांमध्ये स्वर्गाचे रहिवासी तें 'सुर' म्हणून ओळखले जातात व त्यांचा ईश म्हणजे स्वामी तो सुरेश. त्यालाच देवांचाही देव - सुरेश म्हटले जाते. आपल्या भक्तांच्या कामना पूर्ण करणारा वर देण्याचे सामर्थ्य[1] ज्याच्यामध्ये आहे अशा देवांना सुर असे म्हटले जाते. भक्तांच्या कामना पूर्ण करणाऱ्यांमध्ये जो श्रेष्ठ आहे तो सुरेश. थोडक्यात तो परमात्मा अत्यंत उत्कृष्ठ अशी आनंदावस्था व सर्व कामनांपासून जीवाला मुक्ती देणारी अवस्था मिळवून देतो म्हणूनही तो सुरेश होय.
(८६) शरणं :  - आयुष्यातील अपूर्णतेच्या गुलामगिरीचे दुःख सोसणार्‍या सर्वांचा एकमेव तरणोपाय असा श्रीविष्णु. संस्कृत अमरकोशाप्रमाणे शरण या शब्दाचे दोन अर्थ होतात. (१) रक्षणकर्ता (२) गृह. परमेश्वर हेच सर्वांचे शेवटचे[2] ठिकाण आहे अर्थात गंतव्य व आश्रयस्थान आहे. ज्याला त्याचे ज्ञान होते तो त्याच्यामध्येच स्थित होतो. इतस्ततः भटकणारा जीव शेवटी ज्या ठिकाणी जावून आश्रय घेतो असे गृह - आश्रयस्थान परमेश्वरच होय.
     केवळ साक्षात्कारी सिद्धच नव्हे तर सर्व स्थावर जंगम सृष्टीही ज्याचे ठिकाणी प्रलयाचे वेळी समाविष्ट होते व विश्रांती घेऊन पुन्हा निर्मित होते असे आश्रयस्थान म्हणजेच 'शरणम्'.
(८७) शर्म :  - जो स्वतःच अपरिमित आनंद आहे असा. मनाच्या चंचल अवस्थेच्या पलीकडे आनंदाचेच साम्राज्य आहे. उपनिषदांमध्ये त्या अनंताचे वर्णन सच्चिदानंद असे केले आहे. तो त्याचा नित्य स्वभाव आहे. शान्तं - शिवं सुंदरम्
(८८) विश्वरेताः :  - रेतस् म्हणजे बीज. या जीवनवृक्षाचे जो बीज स्वरूप आहे तो परमात्मा ह्या संज्ञेने निर्देशिला आहे. विविध विषयांनी नटलेल्या ह्या जगाचा अनुभव केवळ ज्याच्याच मुळे होऊ शकतो असे कारण म्हणजेच तो विश्वरेतस्.
(८९) प्रजाभवः :  - ज्याचेपासून सर्व सजीव प्राणी (प्रजा) उत्पन्न होते (भव) तो प्रजाभव होय.
(९०) अहः :  - ह्या शब्दाचे दोन अर्थ संभवतात. दिवस आणि रात्र मिळून होणारा २४ तासांचा पूर्ण दिवस किवा १२ तासांचा दिवसाचा काल. जो स्वतः दिवसाच्या प्रकाशाप्रमाणे तेजस्वी असून दिवसाच्या प्रकाशाप्रमाणे सर्व वस्तू प्रकाशित करतो तो.
     चोविस तासांचा एक पूर्ण दिवस हा अर्थ गृहीत धरल्यास, २४ तासांचा काल हा एक कालमापनाचा घटक होतो. व तो दिवस (अहः) त्या कालस्वरूप परमेश्वराचाच एक अंश आहे. तसेच जे भक्त त्याला पूर्णपणे शरण जातात त्यांचा तो कधीच विनाश करीत नाही. (अ+हन्).
(९१) संवत्सरः :  - जो स्वतः वर्षस्वरूप आहे अर्थात कालाचाही स्वामी आहे ज्याचे पासून 'काल ' ही संकल्पना उत्पन्न होते म्हणून तो संवत्सर आहे.
(९२) व्यालः :  - व्याल म्हणजे सर्प किवा ज्याचे जवळ जाता येत नाही असा तो व्याल. ज्याच्या मनामध्ये भक्ति नाही अगर ज्याला ज्ञान नाही त्याला परमसत्य हे एखाद्या मोठ्या सर्पाप्रमाणेच भयप्रद वाटते. सर्प हातामध्ये धारण करणे अत्यंत कठीण असतो कारण तो अत्यंत चपळ व निसटून जातो. त्याप्रमाणे 'सत्यज्ञान' हे बुद्धिमध्ये धारण करणेही कठीण आहे.
(९३) प्रत्ययः :  - जो प्रत्यक्ष ज्ञानस्वरूप आहे. परमात्मा केवल 'ज्ञानस्वरूप' आहे हे सर्वास विदितच आहे. जाणिवेच्या प्रकाशामध्येच सर्व ज्ञानांची प्राप्ती करून घेणे शक्य आहे. वस्तूचे ज्ञान म्हणजेच तिच्या स्वरूपाचे भान. अर्थातच वस्तूचे भान म्हणजेच वस्तूचे ज्ञान. परमेश्वर स्वतःच ज्ञानस्वरूप असल्यानें इतर सर्व ज्ञाने ( वस्तूज्ञान वगैरे) त्याचेपासून उत्पन्न होतात. म्हणूनच त्याला 'शुद्ध ज्ञान' असे म्हटले जाते. ऐतरेय उपनिषदांत ' प्रज्ञानं ब्रह्म' अशा महावाक्यात त्याचे वर्णन केले आहे (३.३).
(९४) सर्वदर्शनः :  - सर्व पहाणारा. ही परमात्म्याची व्याख्या अत्यंत समर्थक आहे. त्याच्या परम ज्ञानस्वरूपाची व्याख्या व विवेचन करताना केनोपनिषद म्हणते, ज्याला डोळयांनी पहाता येत नाही परंतु ज्याचेमुळे डोळे पाहू शकतात.'' कारण तोच डोळयामधून पहाणारा, कानामधून ऐकणारा, मुखामधून बोलणारा, अनुभव घेणारा विचार करणारा आहे. हे ज्ञानतत्व सर्व ठिकाणी एकच आहे व ज्ञानेंद्रियातून तेच व्यक्त होत असते, त्यामुळे सर्व ठिकाणी बघण्याच्या प्रक्रियेतील 'बघणारा' तोच आहे. उपनिषदांनी म्हटलेच आहे '' विश्वतश्चक्षुर्विश्वाक्षं ''व गीतेनेही 'ज्याला सर्वतः चक्षु आहेत व सर्वतः शिरे आहेत' असे वर्णन केले आहे. '' सर्वतोऽक्षि शिरोमुखम्''

डॉ. सौ. उषा गुणे.


[1]   सुष्ठु राति ददाति इति सुरः  ।
[2]   निवासिष्यसि मय्येव अत उर्ध्वं न संशयः  ।


No comments: