08 February, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक ११

अजः सर्वेश्वरः सिद्धः सिद्धिः सर्वादिरच्युतः  ।
वृषाकपिरमेयात्मा सर्वयोगविनिःसृतः  ।।
(९५) अजः :  - जन्म न घेतलेला. जन्म परिवर्तन अगर बदल सुचवितो. पूर्वीच्या परिस्थितीचा अंत झाल्याखेरीज नव्या परिस्थितीचा जन्म होऊ शकत नाही. ते सनातन अनंतत्व विकाररहित असल्याने त्याचे मध्ये जन्म अगर मृत्यू संभवत [1] नाही. जे जन्मास येते ते अवश्य मृत्यू पावतेच. ( जातस्यही ध्रुवो मृत्युः गीता २-२७). तो अजन्मा आहे म्हणूनच अंतरहित - अमृत्यू आहे. [2]
(९६) सर्वेश्वरः :  - सर्व देवांचे देव अगर सर्वांचे श्रेष्ठ स्वामी. म्हणजेच तो सर्वश्रेष्ठ, सर्वशक्तिमान आहे. बृहदोपनिषद् म्हणते, 'तो सर्वांचा स्वामी आहे. ( ६-४-२)
(९७) सिद्धः :  - जे प्राप्त व्हावे असे वाटते ते सर्व ज्याला नेहमीच प्राप्त आहे असा. कारण तोच स्वतःच सर्वांचे प्राप्तव्य अगर अंतिम लक्ष्य आहे. दुसरा अर्थ जो सर्व प्रसिद्ध आहे तो.
(९८) सिद्धिः :  - ज्याचे स्वरूप हे शुद्ध ज्ञान स्वरूप असल्यानें सर्व क्षेत्रामध्ये त्याची सदैव प्राप्ती (सिद्धि) होते. सिद्धि ह्या संज्ञेचा दुसरा अर्थ कर्मफल असाही होतो. व ह्याच संदर्भाने 'जो मोक्ष अगर कैवल्यरूपी अपरिमित फल देतो तो ' असा अर्थ होईल.
     इतर सर्व कर्माची फले (स्वर्गप्राप्ती वगैरे) नेहमीच सापेक्ष आनंद देणारी असतात. परंतु साधकास आत्मज्ञान प्राप्त झाले असतां अपरिमित समाधान मिळते. व त्याचेपासून पुन्हा केव्हाही पुनरावर्तन नसते असे गीतेत वर्णन आहे. [3]
(९९) सर्वादिः :  - जो सर्वांच्याही पूर्वी (आदि) असतो. कोठल्याही वस्तूच्या पूर्वी त्याचे अस्तित्व असते, व कार्य उत्पन्न होण्याच्या पूर्वीचे कारण ह्या स्वरूपांत तो असतो. सर्व विश्वाच्या उत्पत्तीपूर्वी ते परमतत्व होते त्याचे पासूनच कार्यस्वरूप विश्वाची उत्पत्ती झाली म्हणून तेच मूल कारण (आदि) आहे.
(१००) अच्युतः :  - च्युत - पतित. अ-च्युत म्हणजे जो कधीच पतित होत नाही तो. नित्यशुद्ध असे ब्रह्म कधीच संसाराच्या भ्रांत स्वरूपांत 'पतित' होत नाही, शुद्ध ज्ञानामध्ये अज्ञानाचे किल्मिष कधीच मिसळले जात नाही. भागवतामध्ये श्रीभगवंत स्वतःच सांगतात ' मी माझ्या शुद्ध स्वरूपापासून कधीच च्युत होत नाही म्हणून मी 'अच्युत' आहे. (यस्मान्न च्युतपूर्वोऽहं अच्युतस्तेन कर्मंणा)
(१०१) वृषाकपिः :  - या संज्ञेबद्दल शास्रवेत्या पंडीतांमध्ये निरनिराळे परस्पर विरोधी मतप्रवाह आहेत. परंतु भगवंताचे स्वतःचे शब्द लक्षांत घेतल्यास सर्व विरोध नाहीसे होतील. ते असे, ''कपी या शब्दाचा अर्थ वराह व  [4]वृष् या शब्दाचा अर्थ धर्म असा होतो. म्हणूनच प्रजापती कश्यपांनी मला वृषाकपि म्हटले आहे.'' तसेच संस्कृत भाषेमध्ये कपि शब्दाचा अर्थ होतो पाण्या बुडण्यापासून वर काढणारा. वराह अवतारामध्यें प्रलय काळांत परमेश्वराने पृथ्वीला पाण्यातून वर काढले. म्हणून वराह तोच कपि होय. वृष म्हणजे धर्म. अधर्माच्या सागरांत बुडणार्‍या जगताला वर काढून  धर्मस्तरावर आणणारा तो वृषाकपि.
(१०२) अमेयात्मा :  - ज्याची व्यक्त रूपे (आत्मा) अगणित ( अमेय) आहेत असा. सर्वांचा स्वामी असलेल्या विराट पुरुषाचे वैश्विक रूप या ठिकाणी निर्देशित केले आहे. सर्व आकार हे त्याचे पासून उत्पन्न झाले, त्यांचे अस्तित्वही त्या पुरुषामध्येच आहे व सर्व आकार त्याचे मध्येच लीन पावणार आहेत. म्हणून सर्व आकार ही त्याचीच रूपे आहेत.
(१०३) सर्वयोगविनिसृतः :  - योग हा शब्द युज् या धातू पासून तयार झाला आहे. व त्याचा अर्थ आहे जोडणे - एकत्र बांधणे. जो सर्व संबंधापासून पूर्णपणे मुक्त आहे (विनिसृत) तो सर्वयोगविनिसृत. ज्यावेळी बांधली जाणारी वस्तू ज्याचेशी बांधायची त्यापासून वेगळी असते तेव्हांच दोन्हीमध्ये 'बंध' अस्तित्वात येतो. परमसत्याला कशाचेच बंधन असणे शक्य नाही. कारण परमसत्या व्यतीरिक्त इथे बंध निर्माण करणार्‍या दुसर्‍या कशाचेच अस्तित्व नाही त्यामुळे दुसर्‍या बरोबर बंध निर्माण होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. परमेश्वर हा प्रेमाचे मूर्त स्वरूप आहे व त्याचेमध्ये संग अगर आसक्ती नाही. बंध वा आसक्ति निर्माण होण्याला प्रेमामध्ये स्वामीत्वाची भावना अगर सुखाची लालसा असावी लागते . परंतु बृहदोपनिषद् म्हणते , ' हा पुरूष खरोखरच निस्संग आहे.' (६-३-१५)
     सर्वयोगविनिसृत या शब्दाचा दुसरा अर्थ असा होऊ शकेल की ' जो शास्त्रामध्ये संगितलेल्या सर्व योगांच्याही मर्यादे पलिकडे आहे' असा. सर्व योग पद्धती या मनःशांतिकरतां, सत्याबद्दल असलेले विपरीत ज्ञान दूर करण्याकरतां किवा मायेचे बंधन दूर करण्याकरतां आहेत. यासर्व पद्धतींच्या पलिकडे, साधनेच्याही पलिकडे भक्तांच्या हृदयांत वास्तव्य करून राहिलेला असतो तो ' श्रीविष्णु ' सर्वयोगविनिसृत होय.

डॉ. सौ. उषा गुणे.

[1]    न जायते म्रियते वा कदाचित् । नायं भूत्वा भविता वा न भुयः  ।।
    अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो  । न हन्यते हन्यामाने शरीरे ।।
[2]   महाभारतातील शांतीपर्वात (शांतीपर्व ३४३) म्हटले आहे ; '' मी जन्म घेतलेला नाही अगर भविष्यात मला जन्म घेणेचा नाही. मी सर्व जीवांमधील क्षेत्रज्ञ असल्याने मला अजन्मा म्हटले जाते.
[3]   द्‍गत्वा ननिवर्तते तद्धाम परमं मम । गीता १५.६
[4]  कपिर्वराहः श्रेष्ठश्च धर्मश्चवृष उच्यते  । तस्मात वृषाकपिं प्राहकश्यपो मां प्रजापतिः  ।।

No comments: