16 February, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक १३

रूद्रो बहुशिरा बभ्रुर्विश्वयोनिः शुचिश्रवाः ।
अमृतः शाश्वतः स्थाणुर्वरारोहो महातपाः ।।
(११४) रूद्रः :  - रोदयति इति रूद्रः  । जो सर्व लोकांना विलाप करण्यास भाग पाडतो तो रूद्र. अंतकाली अगर प्रलयाचे वेळी सर्व लोकांना दुःख होते व विलाप करावा लागतो. भक्ताचे दृष्टिकोनातून बघितल्यास  या संज्ञेची अशी उकल होईल की रूद्र म्हणजे जो सर्व दुःखे विरघळवून टाकतो तो. ( रूत् द्रवयति । ) भगवन् श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात. सर्व रूद्रांमध्ये मी शंकर आहे. (रूद्राणां शंकरश्चास्मि. गीता १०.२३) वैदिक वांङ्‌ग्मयाचे अनुसार एकूण अकरा रूद्र असून त्यातील अकरावा रूद्र शंकर आहे. शं करोति इति शंकरः - जो सर्वास मंगल, शुभ प्रदान करतो तो.
(११५) बहुशिराः :  - ज्याला अनेक शिरे आहेत असा. ऋग्वेदांतील पुरूषसूक्तामध्ये परमेश्वराचे वैश्विक रूपाचे वर्णन आले आहे ते असे की, त्या पुरुषाला सहस्र शिरे आहेत, सहस्र डोळे आहेत, सहस्र पाय आहेत. तसेच गीतेमध्येही याच अर्थाचे परमेश्वराच्या विश्वरूपाचे वर्णन ११ व्या अध्यांयात आले आहे. गीतेमध्येच १३ व्या अध्यांयात मनुष्याचे अंतिम लक्ष्य ज्ञेय वर्णन करतांना भगवान् सांगतात - '' सर्वतः पाय असलेला, सर्वतः हात , सर्वतः डोळे व सर्वतः मुख असलेला'' अर्थातच ज्याचे साकार प्रकटीकरण म्हणजेच हे सर्व विश्व आहे त्याला अनेक शीर्षे आहेत असे म्हटले जाते.
(११६) बभ्रुः :  - जो राजाप्रमाणे सर्व लोकांवर राज्य करतो तो. आत्मबोधामध्ये या अर्थाचे विवरण आले आहे. ज्याच्या उपस्थिती मध्येच केवळ सर्व संवेदनेची साधने (इंद्रिये) अनुभवाची व भावनेची उपकरणे (बुद्धि व मन) एकमेकाच्या सहाय्याने कार्य करू शकतात तो आत्मा म्हणजेच 'श्रीविष्णु' होय.
(११७) विश्वयोनि:  - विश्वस्य योनिः विश्वयोनिः  । :  - ज्या एकमेव मूलकारणापासून सर्व विश्वाची (व अनुभवविश्वाची) उत्पत्ती होते ते कारण म्हणजेच विश्वयोनी. त्याच उत्पत्ती स्थानापासून सर्व विचार (ज्ञान) व क्रिया (कर्मे) यांची उत्पत्ती झाली आहे.
(११८) शुचिश्रवाः :  - ज्याला अत्यंत सुंदर व पूर्ण कार्यक्षम असे कान (श्रवस) आहेत तो. ज्याचे कान सर्व बाजूस आहेत (सर्वतः श्रुतिमत् - गीता १३-१३). म्हणजेच सर्व श्रवण करणार्‍या कानांमध्ये प्रत्यक्ष श्रवण करणारा तोच असतो. श्रवस् ह्या शब्दाचा एक अर्थ कान असा होतो तर दुसरा अर्थ होतो 'नाम', अर्थात शुचिश्रवस् म्हणजे ज्याला पवित्र व दिव्य नामे आहेत असा. जेव्हा भक्त त्याला त्या सहस्रनामांनी आळवू लागतात तेंव्हा ती हाक त्याला त्वरीत ऐकू येते व भक्ताच्या हृदयातील शुद्धभाव व सखोल दृढभक्ती त्याला समजू शकते. ह्या संज्ञेचा तिसरा अर्थ होईल की ज्याचे नांव भक्तांनी ऐकणे योग्य आहे असा - शुचिश्रवाः
(११९) अमृतः :  - जो अविनाशी व अमर आहे असा. (मृत - मरणारा) ब्रह्म हे अजर अमर व अव्यय आहे. दुसरा अर्थ - जो स्वतःच अमृत स्वरूप आहे त्यामुळे जे अज्ञानरूपी व्याधीने पिडले आहेत अशाकरतां दिव्यौषधी (अमृत) आहे. अमृत म्हणजेच मोक्ष. म्हणजेच जो नित्यमुक्त आहे, सत्यस्वरूप आहे त्याचेच या संज्ञेने निर्देशन केले आहे.
(१२०) शाश्वतस्थाणुः :  - जो शाश्वतही आहे व त्याचचेळी स्थाणुप्रमाणे स्थिरही आहे असा. तो अमर असल्यामुळे त्याचेमध्ये कुठलाही बदल, विकार संभवत नाही. तिन्ही कालामध्ये तो सम आहे कारण तो शाश्वत आहे. त्याचेमध्ये विकार होत नसल्याने ज्ञानरूपाने तो स्थाणु (स्थिर ) आहे. 'शाश्वत स्थाणु' ही एक संयुक्त संज्ञा आहे म्हणून त्याचा अर्थही संयुक्तरित्याच घेतला पाहिजे. शाश्वत -नित्य, स्थाणु -स्थिर म्हणजेच जीवनामध्ये जे स्थिर तत्व नित्य आहे ते 'श्रीविष्णु' होय.
(१२१) वरारोहः :  - जे जीवनातील सर्वश्रेष्ठ (वर) असे साध्य (आरोह) आहे ते परमतत्व. जड प्रकृतीमधील अपूर्णता ही पुरुषाचे (आत्म्याचे) ठिकाणी संभवत नाही म्हणूनच आत्मप्राप्ती ही सर्वोत्कृष्ठ स्थिती आहे. प्रकृतीच्या जड बंधनातून मुक्तता करून घेणे म्हणजेच आत्म्याच्या अनंतत्वाकडे वाटचाल करणे होय (आरोह) तो परत येत नाही '(न च निवर्तंते') छांदोग्य उपनिषदांमध्ये हा विचार त्रिवार ठासून सांगितला आहे की  जे विष्णुपद मनबुद्धिच्या पलिकडे आहे तेथे एकदा जो जातो त्याला तेथून या अहंकारग्रस्त व दुःखी जगतामध्ये परत यावे लागत नाही.
(१२२) महातपाः :  - ज्याची तपस्या सर्वश्रेष्ठ आहे असा. संस्कृत भाषेमध्ये ' तपस् ' ह्या शब्दाचे तीन अर्थ होतात. (१) ज्ञान (२) ऐश्वर्य (३) प्रताप. आपल्याला आपले सर्व अनुभवज्ञान आपणामधील ज्ञानशक्ति (जाणीव) मुळेच होऊ शकते. एकाद्या वस्तुची अगर कल्पनेची जाणीव म्हणजेच त्या वस्तूचे अगर कल्पनेचे ज्ञान. ज्या स्तूची मला जाणीव नसते तिचे मला ज्ञानही नसते. सर्वत्र, सर्वकालामध्ये, सर्व प्राणीमात्रांना सर्वांच्या हृदयात होणारे त्या त्या वस्तूंचे ज्ञान हे त्यांच्यामधील जाणीव प्रक्रियेखेरीज अशक्य आहे. म्हणूनच उपनिषदांनी हे ज्ञानतत्व (जाणीव) शुद्धज्ञान ह्या शब्दानी निर्देशित केले आहे. व त्याच्या अस्तित्वामुळेच कोणतेही ज्ञान होणे शक्य आहे. सर्व र्प्राणिमात्रांचे सामर्थ्य व त्यानी मिळवलेले जगतातील सर्व ऐश्वर्य हे केवळ त्यांच्या जीवितावस्थेतच (चैतन्य) शक्य आहे. हे चैतन्य तत्व म्हणजेच महाविष्णु होय. ज्ञान हीच ज्याची तपस्या आहे तो महाविष्णु होय असे मुंडकोपनिषद् (१.१.९) म्हणते.

 डॉ. सौ. उषा गुणे

No comments: