12 February, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक १२

वसुर्वसुमनाः सत्यः समात्मा सम्मितः समः ।
अमोघः पुंडीरकाक्षो वृषकर्मा वृषाकृतिः  ।।
(१०४) वसुः :  - जो सर्व पंचमहाभूतांचा आधार आहे व तत्वतः जो स्वतःच पंचमहाभूत रूपांनी व्यक्त झाला आहे तो वसु होय. ज्याप्रमाणे संपूर्ण स्वप्नसृष्टि ही आपल्याच मनाने निर्माण केलेली असते व ते स्वप्नही मनाच्या आधाराने मनातच क्रीडा करते त्याच प्रमाणे सर्व सृष्टि त्या परमात्म्यामध्ये रहाते व तो सर्व सृष्टिमध्ये रहातो.
     वसूनां पावकश्चास्मि (गीता १०-२३) 'मी वसूंमध्ये पावक आहे' असे गीतेमधून भगवान् श्रीकृष्ण आपल्याला सांगतात. वायू सर्वांना आपल्यामध्ये समाविष्ट करून घेतो व सर्वांमध्ये प्रविष्ट होतो तद्वतच आत्म्यामध्ये सर्वांचे अस्तित्व असते व आत्मा सर्वांमध्ये रहातो.
(१०५) वसुमनः :  - ज्याचे मन अत्यंत विशुद्ध आहे असा. अर्थातच त्या मनामध्यें आसक्ति वा दुःखाचा कलंक नाही, रागद्वेषाची वादळे नाहीत अगर प्रिय-अप्रियतेचे कंपही नाहीत.
(१०६) सत्यः :  - जो सत्य स्वरूप आहे तो. सत्य या शब्दाला तत्वज्ञानामध्ये एक विशिष्ठ गर्भितार्थ आहे. जे तीनही कालामध्ये 'सम' असते ते सत्य. जे असल्याप्रमाणे भासते परंतु ज्याचे अस्तित्व पूर्वी कधीच नव्हते अगर पुढेही भविष्यांत ते असणार नाही ते ' असत्य '. जो सृष्टिरचनेपूर्वी ही होता, त्याच्या स्थितीमध्येही जो असतो व प्रलयानंतरही जो रहाणार आहे तो परमात्मा म्हणजेच सत्य. तैतरिय उपनिषदांमध्ये स्पष्ट वर्णन केले आहे ते ब्रह्म सत्य, ज्ञान व आनंद स्वरूप आहे. (सत्यं ज्ञानमनन्तंब्रह्म - तैत्ति उप. २.१).
     या संज्ञेचे इतरही अर्थ आहेत व तेही या ठिकाणी उद्धृत करणे आवश्यक आहे. सज्जनांमधील साधुत्व म्हणजे सत्य. (सत्सु साधुः सत्यः). तसेच 'सत्यम्' हा शब्द सत्+ति+यम् अश तीन घटकांनी तयार झालेला आहे. व उपनिषद् सांगते की ' सत् म्हणजे प्राण, ति म्हणजे अन्न व यम् म्हणजे सूर्य ' म्हणजेच 'सत्यं' हा एक असा निसर्ग नियम आहे की जो अन्नाला प्राण धारण करण्यास प्रवृत्त करतो. व अन्न व प्राण दोन्ही धारण केले जातात सृष्टितील मुख्य शक्तिस्त्रोतामुळे व तो आहे सूर्य.
(१०७) समात्मा :  - जो सर्वामध्ये सम आहे तो, कठोपनिषदांत नचिकेताला उपदेश करतांना साक्षात् मृत्युदेव विशद् करून सांगतात की, 'तेच एक सत्य वेगवेगळया रूपांनी वेगवेगळया आकाराप्रत येन प्रकट झाले. ( एकोवशी सर्वभूतांतरात्मा एकं रूपं य बहुधा करोति तमात्मस्थं येऽनुपश्यन्ति धीरास्तेषां सुखम्.) जे क्षणभंगुर व अशाश्वत आहे त्यामध्ये तसेच जे शाश्वत आहे, त्यामध्येही जे समानतेने असते त्या परमेश्वराचे अस्तित्व पहाण्याकरतां दिव्य दृष्टिची आवश्यकता असते. कौषितकि उपनिषदांमध्ये म्हटले आहे (३-९) आत्मा हा सर्वत्र समतेने भरून राहिला आहे हे प्रत्येकाने जाणले पाहिजे. तसेच गीतेमध्येही म्हटले आहे, ' अनुभवक्षेत्रामध्ये प्रत्येक ठिकाणी मीच अनुभव घेणारा साक्षी असतो. ( क्षेत्रज्ञं चाऽपि मां विद्धि सर्वक्षेत्रेषु भारत - गीता १३- ३)
(१०८) सम्मितः :  - ग्रहण करण्यास योग्य - ग्राह्य. तत्वज्ञानातील तर्क संगत व सूक्ष्म विचारांच्या सहाय्याने ऋषींनी उपनिषदांतील जे सत्यज्ञान सिद्ध केले व ग्राह्य मानले ते एकमेव सत्य म्हणजेच 'सम्मत' व हाच ह्या संज्ञेचा सरळ व स्पष्ट अर्थ आहे. कांही टीकाकार विष्णुसहस्रनामातील १०७ वे 'समात्मा' व १०८ वे 'सम्मित' हे नांव एकत्र करून समात्मा-असम्मित असे जोडनांव तयार करतात. व त्याचा वेगळाच अर्थ होतो. असम्मित या शब्दाचा अर्थ होतो अनुपम्य किवा अतुलनिय. ज्याच्याशी तुलना करतां येईल असे काहीही नाही असा.
(१०९) समः :  - सारखा. सत्य हे सर्व ठिकाणी सम (सारखेच) असते. तेच एक ब्रह्म अनेक तत्वातून प्रतीत होते असे कठोपनिषदात म्हटले आहे. 'एकच अग्नितत्व जगतात प्रविष्ट होऊन अनेक साधनांमधून त्या त्या प्रकारांनी (आकारांनी) प्रदीप्त होतें त्याचप्रमाणे एकच सत्य अनेक जीवांमधून प्रकट होते. म्हणून त्याला सम असे म्हटले आहे.
     या संज्ञेचा दुसरा अर्थ लक्ष्मी अर्थात मायेसहित जो आहे तो समः (स+मा).

(११०) अमोघः :  - मोघ म्हणजे निरर्थक, निष्फल शक्ति- अवस्था. अमोघ अर्थातच विरूद्ध अर्थाने जो नेहमीच यशस्वी, पूर्णतेस जाणारा म्हणूनच भक्तांच्या मनांतील सर्व इच्छा पूर्ण करणारा असा श्रीविष्णु. छांदोग्य उपनिषदांत म्हटले आहे, ' त्याचा संकल्प अगर इच्छा सत्य असते व सत्य हाच त्याचा संकल्प (निश्चय) आहे तो अमोघ आहे.
(१११) पुण्डरीकाक्षः :  - ज्याचा स्पर्श (दर्शन) व पूर्ण अनुभव हृदयामध्ये (पुंडरीक) होतो तो. नारायण उपनिषदांमध्ये हीच संज्ञा वापरलेली आढळून येते (१०). '' शरीराचे अंतस्थ हृदयाकाशांत परमेश्वराचे वास्तव्य आहे'' चिंतनशील साधकाला हृदयाचे ठिकाणी सत्याचे ज्ञान लवकर व जास्त स्पष्टपणे होते. म्हणूनच सर्वव्यापक परब्रह्माचे वर्णन 'हृदयगुहेत रहाणारा ' असे केले आहे.
(११२) वृषकर्मा :  - वृष म्हणजे धर्म. ज्याची प्रत्येक कृती धर्म संमत असते व प्रत्येक कृती धर्मसंस्थापने करतांच असते तो वृषकर्मा. गीतेमध्ये म्हटलेच आहे की 'धर्माची स्थापना करण्याकरतां मी प्रत्येक युगांमध्ये अवतीर्ण होत असतो. (गीता ४-८)
(११३) वृषाकृतीः :  - ज्याची प्रत्यक्ष आकृती धर्मस्वरूप आहे असा. त्याची फक्त कृतीच धर्ममूल असते असे नव्हे तर तो स्वतःच 'धर्मरूप' आहे. जगतामध्ये धर्मतत्वाचे शासन व्हावे म्हणून जो वेगवेगळया आकृती (अवतार) धारण करतो तो असाही ह्या संज्ञेचा अर्थ होतो.
 डॉ. सौ. उषा गुणे

No comments: