20 February, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक १४

सर्वगः सर्वविद्‌भानुर्विष्वक्सेनो जनार्दनः 
वेदो वेदविदव्यङ्गो वेदाङ्गो वेदवित्कविः  ।।
(१२३) सर्वगः :  - जो सर्वत्र जातो म्हणजेच जो सर्व व्यापक आहे असा. कारण हे नेहमीच कार्यामध्ये व्याप्त होते. ज्याप्रमाणे सोने अलंकारात, सागर लाटामध्ये किवा कापूस वस्त्रामध्ये व्याप्त असतो तसे. ब्रह्म हे जडसृष्टि (क्षेत्र) व सर्वसृष्टिचा ज्ञाता क्षेत्रज्ञ या दोन्ही स्वरूपांत व्यक्त होते. श्रीविष्णु म्हणजेच 'उत्तमपुरूष' या दोन्हीच्या पलिकडे आहे. त्याचे ठिकाणी प्रकृतिही नाही व तिचे 'ज्ञातृत्व'सुद्धा नाही. ते सर्वव्यापक 'परब्रह्म' म्हणजेच महाविष्णु होय.
(१२४) सर्ववित् भानुः :  - जो सर्वज्ञही आहे (सर्ववित्) व तेजस्वरूपही आहे (भानु). ज्ञानप्रकाश हाच सर्व प्रकाशमान वस्तुंनाही प्रकाशित करणारा आहे व तोच प्रकाश अंधःकारासही प्रकाशित करतो. (ज्योतिषामपि तज्ज्योतिः तमसः परमुच्यते । गीता १३-१०) तसेच मांडुक्य उपनिषदांत असा उल्लेख आहे. (तमेव भान्तमनुभाति सर्व तस्यभासा सर्वमिदंविभाति । ४-१०) म्हणजेच केवळ त्याच्याच प्रकाशाने सर्व अनुभवजगत प्रकाशित होते. सर्वविद्+भानु ही संयुक्त संज्ञा आहे व तिचा अर्थ ' सर्वज्ञानवान प्रकाश' असा होतो.
(१२५) विष्वक्सेनः :  -  ज्याचे समोर सर्व असूरांचे सैन्यही पराभूत होते व निष्प्रभ ठरते तो विष्वक्सेन. तो महाप्रतापवान व सर्वसमर्थ आहे त्यामुळे त्याचे समोर कोणतेही सैन्य उभे राहू शकत नाही.
(१२६) जनार्दनः :  - अर्दयति ह्या क्रियापदाचा अर्थ दोन तर्‍हेने होतो. (१) दुःख देणे (२) सुख देणे. अर्थात जो दुर्जनांना दुःख व नरकरूपी संकटे देतो व सज्जनांना सुख व शांती प्रदान करतो तो जनार्दन श्रीविष्णु.
(१२७) वेदः :  - विद् म्हणजे जाणणे ह्या धातुपासून वेद ह्या शब्दाची उत्पत्ती झाली आहे. वेद हे ज्ञान प्रदान करतात. परमेश्वरालाच वेद असे म्हणण्याचे कारण परमेश्वर स्वतःच (वेदप्रणित) 'सत्यज्ञान स्वरूप' आहे. व तोच त्या सत्याचे ज्ञान करून देतो. म्हणून तो स्वतःच वेद आहे. महाभारतात श्री व्यास म्हणतात, ' भगवान् श्रीकृष्ण स्वतःच सर्ववेद आहे. सर्व शास्र स्वरूप आहे, सर्व यज्ञ स्वरूप आहे व सर्वज्ञ आहे. (सर्वे वेदाः सर्व विद्याः सशाखाः सर्वयज्ञाः सर्वज्ञश्च कृष्णः)
     तसेच भगवत्गीतेमध्ये भगवान् म्हणतात, 'केवळ त्यांचेवरील (भक्तांवरील) प्रेमानेच आत्मस्वरूप असलेला मी स्वतःच ज्ञानमय प्रदीपानें त्यांच्यातील अज्ञानाचा अंधःकार नाहीसा करतो.
(१२८) वेदवित् :  - जो वेद जाणतो तो. परमेश्वराचा साक्षात्कार झाल्याखेरीज वेदांचा अर्थ पूर्णपणे समजणे शक्य नाही. मनाच्या पूर्ण निस्पंद अवस्थेतच वेदांचे पूर्ण व खात्रीशीर ज्ञान उपलब्ध होणे शक्य आहे. व अशी अवस्था म्हणजेच परमेश्वराशी, सत्याशी एकरूपता. 'मी वेदांचा कर्ताही आहे व वेदांचा ज्ञाताही आहे असे गीतेत म्हटले आहे. (१५-१५)
(१२९) अव्यंगः :  - ज्याचेमध्ये कुठेही ( कोणत्याही भागात ) अपूर्णता नाही असा. सर्वतः परिपूर्ण असा. व्यंग शब्दाचा दुसरा अर्थ व्यक्ती. म्हणून अव्यंग शब्दाचा अर्थ होईल व्यक्तिरूपाने जो कोणासही कधीही प्रतीत ( ज्ञात ) होत नाही तो अव्यंग. गीता स्पष्टपणेच सांगते ' हे परमतत्व जाणण्यास अवघड, विचारातीत, व विकाररहित आहे. (अव्यक्तोऽयमचित्त्योयऽमविकार्योऽयमुच्यते । गीता २-२५)
(१३०) वेदांगः :  - ज्याची अंगे वेदस्वरूप आहेत तो. केनोपनिषदांत उपसंहार करतांना गुरू स्पष्टपणे सांगतात, 'सर्वज्ञाने त्याची अंगे आहेत.' वेदा सर्वांगानि.... ।
(१३१) वेदवित् :  - (वेदं विचारयति - वेदवित्) जो वेदांचे चिंतन मनन करतो तो. वेदांमध्ये जे सुक्ष्मज्ञान चर्चिलेले आहे त्याचा पूर्णार्थ केवळ शब्द ज्ञानाने होणार नाही. त्यातील उच्च भावार्थ समजण्याकरतां त्यातील विधानांसह सतत चिंतन मनन करणे आवश्यक असते. भगवत् गीतेमध्ये श्रीकृष्ण सांगतात की ते स्वतः केवळ वेदकर्तेच नाहीत तर वेदज्ञातेही आहेत. (वेदांतकृत वेद विदेव चाहम्  । गीता १५ -१५)
     वेदांचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्याने ह्या विधानांचा अर्थ पूर्णपणे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. पोपटपंची केल्याप्रमाणे ते मंत्र मुखोद्गत केल्याने कांहीच साध्य होत नाही. तो रस्त्याच्या कडेला असलेल्या जड अचल स्थाणू (खांब) प्रमाणे केवळ भारवाही होतो.[1] वेदमंत्रांचा अर्थ समजून घेऊन सतत चिंतन मनन करणारा व त्याप्रमाणे जीवनक्रम ( आचरण) असलेला तो साक्षात् परमेश्वर श्रीविष्णुच होय.
(१३२) कविः :  - ही संज्ञा वेदांमध्ये 'द्रष्टा' या अर्थी वापरली जाते. सर्व सामान्यांना येणार्‍या अनुभवांपेक्षा ज्याला काही अधिक (सूक्ष्म) प्रचिती येते त्याला कवी म्हटले जाते. ईशावास्योपनिषदांत आपल्याला उल्लेख सापडतो , ' तो द्रष्टा बुद्धिवान आहे' (कविर्मनीषी परिभूः स्वयंभूः) तसेच बृहदारण्यकोपनिषदात उल्लेख आहे , ' त्याचे खेरीज अन्य द्रष्टा कोणी नाही ( ५-७-२३) गीतेमध्ये आपल्या विभूती सांगताना भगवान् श्रीकृष्ण सांगतात 'कवींमध्ये (मंत्रद्रष्ट्यामध्ये) मी उशनस्- शुक्राचार्य कवी आहे'. ( कवीनामुशनाकविः)
 डॉ. सौ. उषा गुणे



[1]   स्थाणुरयं भारहारः किलाभूत् अधित्यवेदं नविजानाति योऽर्थम्

No comments: