24 January, 2011

श्लोक ७ वा
अग्राह्यः शाश्वतः कृष्णो लोहिताक्षः प्रतर्दनः  ।
प्रभुतस्त्रिककुब्धाम पवित्रं मंगलं परम्  ।।


(५५) अग्राह्यः :  - ज्याचे ज्ञान इंद्रियांचे सहाय्याने होऊ शकत नाही तो 'अग्राह्य ' आहे. तो इंद्रिय ज्ञानाचा विषय नाही तर सर्व प्राणीमात्रांना आपापल्या इंद्रियाने होणारे सर्व ज्ञान ज्याला होते तो प्रत्यक्ष ज्ञाता आहे. स्वतः ज्ञाता कधीच ज्ञेयविषय होऊ शकत नाही. इतर इंद्रियगम्य वस्तूप्रमाणे 'सत्य' हे इंद्रियांचे सहाय्याने ज्ञात होत नाही. सर्वकालामध्ये सर्व प्राणीमात्रांना सर्व इंद्रियांचे द्वारा सर्व विषयांचे ज्ञान ज्याला होते असा तो एकमेव ज्ञाता आहे. इंद्रियज्ञानाचा ज्ञाता तो असतो इतकेच नव्हे तर मनातील भावना व बुद्धीतील विचार जाणणाराही तोच आहे.
    याप्रमाणे इंद्रियांनी तो समजत नाही, मनाला तो भासत नाही व बुद्धिला ज्ञात होत नाही उपनिषदांमध्ये म्हटले आहे “मनासहित शब्द तेथे पोहोचू न शकल्याने परत फिरतात व तोच परमेश्वर आहे” ( यतोवाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह) म्हणूनच तो अग्राह्य आहे, इंद्रियातीत व विचारातीत आहे. केनोपनिषद स्पष्टपणे व ठासून सांगते “ज्याला नेत्र पाहू शकत नाहीत परंतु नेत्र ज्याच्यामुळे पाहू शकतात तेच ब्रह्म (महाविष्णु) आहे असे तू समज. तू इथे ज्याचे पूजन करतोस ते नव्हे.”

(५६) शाश्वत:  -(शश्वत् भवतीति शाश्वतः) :  - जे सर्व कालामध्ये जसे आहे तसेच रहाते ते शाश्वत - जे शाश्वत आहे ते तीनही कालामध्ये विकाररहितच असते. म्हणजेच ते कालबंधना पलिकडे आहे. ते परमसत्य ज्ञान स्वतःच सर्व कालाला प्रकाशित करते व जो प्रकाशक आहे तो प्रकाश्य वस्तूकडून कधीच परिणाम पावत नाही. ते विकाररहित सत्य म्हणजेच 'श्रीविष्णु '.


(५७) कृष्णः :  - संस्कृत भाषेतील कृष्ण या शब्दाचा अर्थ आहे काळा रंग. ज्या सत्याचे बुद्धिने थोडेसे ज्ञान होते परंतु परमार्थतः त्याची प्रतीती येत नाही ते सत्य विशिष्ठ कृष्णपटलाने झाकले आहे असे मानले जाते.
    मूळ (२)  'कृष्' ह्या धातुचा अर्थ आहे 'सत्ता' किवा 'अस्तित्व' व ’ण’ शब्दाचा अर्थ आहे आनंद. हा उल्लेख महाभारतातील उद्योग पर्वात (७०-५) आलेला आहे. म्हणून कृष्ण (कृष्+ण) म्हणजे सत्ता व आनंद अर्थात कृष्ण हे नांवच अत्यंत श्रेष्ठ परमानंदाचे द्योतक आहे. त्याच्या कृष्णवर्णामुळेही त्याला 'कृष्ण' असे संबोधिले जात असे. “माझा वर्ण काळा असल्यामुळे हे अर्जुना मला कृष्ण असे संबोधिले जाते.” असा उल्लेख महाभारताचे शांती- पर्वात आहे. (३४३)
    महाभारतात आपल्याला असे आढळते की श्रीकृष्ण स्वतःच अर्जुनास समजावून सांगतात की - जेव्हा पृथ्वीचे कवच अत्यंत कठीण होते तेंव्हा मी स्वतःच कृष्ण वर्णाचा लोहाचा नांगर होऊन ही भूमी नांगरतो. - कृषी देवता (३)
    वरील अर्थाखेरीज कृष्ण ह्या शब्दाचा जो आपल्या भक्तांना आकर्षून घेतो तो असाही अर्थ होतो. ( आकर्षणात् कृष्णः) सत्य हे प्रत्येकाला आपल्याकडे आकर्षून घेते. व त्याचा प्रतिकार ही होऊ शकत नाही. टीकाकारांनी या अर्थाचे विवरण फार आकर्षक शैलीने व समर्पक रितीने केले आहे. व त्यांचा निष्कर्ष असा की जे भक्त त्याचे ध्यान चिंतन करतात त्यांच्यां हृदयातील पाप  नाहीसे करतो, तो कृष्ण.
    सत्यामध्ये अशी एक आकर्षण शक्ति असते की जी मनुष्याचा अहंकार अगर अहंकेन्द्रित सर्व वासना आपल्याकडे ओढून घेते. या दृष्टीकोनातून पाहिले असतां कृष्ण ही एक सामान्य कृषीदेवता रहात नाही तर मनुष्यांच्या मनोभूमीमध्ये खोल रूजलेल्या दुष्ट पापवृत्ती खणून ती मनोभूमी अत्यंत निरामय आनंद रूजविण्यास तयार करणारी थोर देवता ठरते. व त्या आनंदाचेच सत्य हे एक स्वरूप आहे.


(५८) लोहिताक्षः :  - लाल डोळे असलेला. पुराण वाङ्ग्मयात अनेक ठिकाणी परमेश्वराचे वर्णन ' रक्तकमलाप्रमाणे डोळे असलेला ' असे केलेले आढळते. साधारणतः लाल डोळे क्रोध दर्शवितात. परमेश्वराने दुष्टतेचा नाश करण्याकरतां अनेक अवतार धारण केलेले आहेत. जे परमसत्याकडे दुर्लक्ष करून ऐहिकतेमध्येच रममाण होणारे व खलप्रवृत्तीचे मानव असतात त्यांचेवर परमेश्वराचा कोप होतो.


(५९) प्रतर्दन:  - ( तर्दहिंसांयाम्) :  - मूळ धातू तर्द ह्या शब्दाचा अर्थ विनाश. त्याचे पूर्वी लागलेला 'प्र' हा उपसर्ग आधिक्य दाखविणारा आहे. त्यामुळे 'प्रतर्द ' ह्या शब्दाचा अर्थ होतो पूर्णनाश. प्रलयाचे वेळी रूद्र स्वरूपात अवतीर्ण होऊन जो सर्वांचा विनाश घडवून आणतो तो प्रतर्दन ' श्रीविष्णु'.


(६०) प्रभूतः :  - ह्या पदाचा अर्थ होतो जन्मतःच परिपूर्ण अगर नित्य परिपूर्ण. तो परमात्मा स्वभावतःच परिपूर्ण असल्याने अंतिम सत्य स्वरूपांत किवा अवतार धारण केलेले असतानाही त्याचा जो अविष्कार होतो तोही परिपूर्ण असतो. विशेषतः परमेश्वराने आपला मुख्य व दिव्य अवतार असा जो ' श्रीकृष्णावतार ' त्यामध्ये आपली सर्वज्ञता व सर्व सामर्थ्य प्रकट केले आहे. त्यामुळे तो पूर्णअवतार मानला जातो.
डॉ. सौ. उषा गुणे.


(६१) त्रिककुब्धाम :  - जो तीन विभागांचा (ककुभ) आधार (धाम) आहे तो त्रिककुब्धाम. साधारणता टीकाकार ह्या शब्दाचे विवरण करताना ' उर्ध्व, मध्य व अध' ह्या तीन स्तरांचे सर्व विभाग असे करताना दिसतात. वेदांताच्या भूमिकेवरून विचार करतां हे तीन स्तर म्हणजेच जाणिवेचे जागृत, स्वप्न व सुषुप्ति हे तीन स्तर असे म्हणता येईल. व चवथी अवस्था तूर्यावस्था ही ह्या तीनही अवस्थांचा आधार आहे व परमेश्वर ह्या सर्व अवस्थांचा आधार आहे.


(६२) पवित्रम् - जो अंतःकरणाला शुद्धता अगर पावित्र्य देतो तो. जे भक्त त्याचे ध्यान करतात त्याचे अंतःकरणास शुद्धि देणारा परमेश्वर पवित्र या नावांने ओळखला जातो.
    किवा पवि म्हणजे वज्र. जो आपल्या भक्तांचे इंद्राच्या वज्रापासून रक्षण करतो ( त्रायते) तो पवित्र. वज्र हे आयुध दधिची नामक ऋषींच्या अस्थिंपासून केले असे त्याचे वर्णन आहे. इंद्र हा इंद्रियांचा राजा (इंद्रियाणा राजा) आहे. वेदांता प्रमाणे इंद्र म्हणजेच मन होय. मनातील उलट सुलट विचार संभ्रम, बौद्धिक तडजोड ह्या सर्वाचा परिणाम म्हणजे आपल्याच मनातील संकल्प विकल्पाने घडवून आणलेला आपलाच मनोबलाचा नाश, हे एक इंद्राचे (मनाचे) आयुध आहे व ते अल्पकाळातच साधकाच्या तपश्चर्येचा नाश घडवून आणते.
    पूर्ण भक्ति, निश्चयपुर्वक केलेले ध्यान व श्रीविष्णुवरील दृढश्रद्धा यांच्या सहाय्याने ह्या मनवज्रापासून साधकाचे रक्षण होते म्हणून परमेश्वराचे 'पवित्र' हे नाव सार्थ ठरते.

(६३) परं मंगलम् - मंगल हे दुष्टप्रवृत्तींपासून होणारे दुःख तर नाहीसे करतेच इतकेच नव्हे तर सद्गुणांपासून होणारा आनंदही मिळवून देते. परं मंगलं म्हणजेच श्रेष्ठतम मंगल आहे व ते फक्त परमेश्वरच असणे शक्य आहे. ज्याचे (४) स्मरणामुळे सर्व अशुभांचा नाश होतो. व सर्व शुभ संकल्पांनी हृदय भरून जाते तो परमेश्वर स्वतःच परममंगल आहे. उपनिषत् सांगते जे ब्रह्म केवळ स्मरण केले असतां मनुष्याच्या हृदयातील सर्व अशुभांचा नाश करते ते आम्हास परममंगल कारक होवो.
-----------------------------------
१    यत् चक्षुषानपश्यति येन चक्षुंषि पश्यति  ।

      तदेव ब्रह्मत्वं विद्धि न इदं यदिदमुपासते  ।।

२    कृषीर्भूवाचक शब्दो नश्च निर्वृत्ति वाचकः  ।

      तयौरैक्यं परंब्रह्म कृष्ण इत्यभिधियते ।।

३    कर्षामि पृथिवीं भूत्वा कर्षणाय अयसो हलः ।

४    अशुभानि निराचष्ठे तनोति शुभ संततिम् । स्मृतिमात्रेण यत् पुंसां ब्रह्म तन्मंगलं विदुः ।।




सौ. उषा गुणे.

No comments: