03 February, 2008

संतांचिया गांवी..

संतांचिया गांवी..

परमार्थ हे ध्येय ठरल्यावर प्रपंच हा परमार्थाचे साधन म्हणून करावयाचा. तेव्हां परमार्थाला उपयोगी पडेल अशा रीतीनेंच प्रपंच करावयाचा, टाकावयाचा नाही. 'मानीला प्रपंची आनंद । केला परमार्थी विनोद ॥' ह्या समर्थवचनाप्रमाणे करावयाचें नाही.
परमार्थांत श्रीगुरु-शिष्य हे नातें पवित्र, मधुर, पुण्यमय असून महद्‌भाग्याने जोडले जाणारे आहे. श्रीगुरु हे एक स्थूल, पांचभौतिक शरीर नसून परम सत्याचा एक अनुभवी आकार आहे. मातपिता, आप्तबंधू, पुत्रपौत्र यांच्यापेक्षाही श्रीगुरु/देवाबद्दल अधिक जवळिक व आपुलकी हा फार महत्त्वाचा भाव आहे.
यस्य देवे पराभक्ति, यथा देवे तथा गुरौ । ज्याची भगवंतावर [म्हणजे जशी त्या भगवंतावर आहे, तशीच ह्या भगवंतावर नाही असे नव्हे] पराभक्ति आहे, तो नामधारक. 'आत्मज्ञं अर्चयेत भूतिकामः' ज्याला परमार्थात अगर प्रपंचात वैभव, ऐश्वर्य पाहिजे असेल त्याने आत्मदर्शी अशा श्रीगुरुंची भक्ति करावी, असें उपनिषदें सांगतात.
अशा महापुरुषांचे दर्शन, संगती, सहवास, कृपाशिर्वाद म्हणजे प्रत्यक्ष ईश्वराचेंच दर्शन. ज्याची प्राप्ती करून घ्यावयाची त्या भगवंताची मूर्त म्हणजेच असा महात्मा. देवाची सगुण साकार कृपामृताचा वर्षाव करणारी मूर्तच म्हणून त्यांच्याकडे पाहतां येते. अशी श्रीगुरुस्वरूपाची महती आहे."जाको दरसें । साहेब दरसे ॥" असे कबीराने त्यांचे गुणगान केले आहे. जगाला न दिसणाऱ्या अशा परमात्म्याच्या गुप्त रूपाशी ऐक्य पावलेला पुरुष म्हणजे श्रीगुरु.
जड, निर्जीव पदार्थ (त्यांनाही अल्प प्रमाणांत जीव आहेच) वनस्पति, सूक्ष्म जीव, मानवेतर मोठे प्राणी, व मानव या भिन्न भिन्न जाति, त्यांच्या त्यांच्या ठिकाणी असणार्‍या देवाच्या चढत्या प्रकाशामुळें झाल्या आहेत. देवाचा अधिक प्रकाश मानवांत आणि सर्वाधिक प्रकाश श्रीगुरु/संताच्या ठिकाणी असतो. ते देहधारीच असतात, देहधारीच दिसतात, तरी त्यांचा आत्मा परमात्म्याशी एकरूप झालेला असतो. भगवंत हा सागर, तर हा महात्मापुरुष त्यावरील तरंग. दोन्ही एका समान गुणधर्माचे पाणीच. त्यांच्या ठिकाणचा उज्ज्वल देवप्रकाश संपर्कात येणार्‍याला प्रकाशित करून सोडतो.
भाव भक्ति वाढवण्याचे उत्तम साधन म्हणजे श्रीगुरु भक्ति-प्रेम, असा सर्वच्या सर्व सत्‍पुरुषांचा सिद्धांत आहे. "आत्मज्ञाने चोखडीं । संत ते माझी रूपडी ॥ " निराकार देव दिसत नाही, त्याला भेटतां येत नाही, त्याच्याशी बोलतां येत नाही. ही उणीव भरून काढणार्‍या देहातल्या मूर्ती म्हणजेच श्रीगुरु. "देव ते संत, देव ते संत । निमित्त त्या प्रतिमा ॥ "
त्यांच्या संगतीने, उपदेशानें, प्रबोधनानें, शिकवणीनें निधडे झालेले चित्त ब्रह्मासारखे संशयरहित होते. श्रीगुरु हे श्रेष्ठ तीर्थ आहे. त्यांच्या संगतीने भ्रांतालाही ब्रह्मभाव प्राप्त होतो. त्यांच्या सहज स्मरणानें त्यांचीच योग्यता प्राप्त होते. श्रीगुरु हे देवाचेच रुपडें. जसा भाव देवावर ठेवावयाचा तसाच, तोच भाव श्रीगुरुवर/संतावर ठेवावयाचा. महात्म्यांच्या या वचनांवर दृढ श्रद्धा ठेवायची.
एक थोर सत्पुरुष म्हणत असत कीं, तुम्ही आपल्या श्रीगुरुंना मनुष्य समजता म्हणून तुमचे साधन चांगले होत नाही. आपल्या श्रीगुरुंना देव मानल्यावर उत्तम अनुभव येतात. खरी सगुणभक्ति म्हणजे संतांवरील/श्रीगुरुवरील भक्तिभाव. याच भक्तिभावानें भगवंतावरील भक्तिभाव वाढतो. साधनावरील [म्हणजे नामावरील] श्रद्धा दृढ होते. भय नष्ट होऊन अभयादि दैवीसंपत्ती लाभते.
नामस्मरण होण्याला सर्वांत उत्तम साह्य (भावरूपी) श्रीगुरुसंगत. "संतांचे संगती । मनोमार्ग गति ॥ " श्रीगुरु/संत भक्ति-प्रेमच देतात व भक्ति-प्रेमच घेतात. आपण संतांच्या घरी भिकारी होऊन कां गेलो हे श्रीतुकोबारायांनी फार सुंदर वर्णन करून सांगितले आहे. आपल्या पूर्वपुण्याईनें संतच घरी आला.
संतांचिया गांवी प्रेमाचा सुकाळ ।
नाही भयशंका तळमळ ॥ १ ॥
तेथें मी राहीन होऊन याचक ।
घालतील भीक तेचि मज ॥ २ ॥
संतांचिया गांवी वसे भांडवल ।
अवघा भक्तिप्रेमभाव घनचित्त ॥ ३ ॥
संतांचे भोजन अमृताचे पान ।
करिती नामस्मरण सर्वकाळ ॥ ४ ॥
संतांचा उदीम उपदेशाची पेठ ।
भक्तिप्रेम सुख देती घेती ॥ ५ ॥
तुका म्हणे तेथे आणिक नाही परी ।
म्हणोनि भिकारी झालो त्यांचा ॥ ६ ॥

अण्णा -

No comments: