03 February, 2008

मानसमणिमाला - रत्‍न १ ले


मानसमणिमाला (१)


गोस्वामी तुलसीदासांचे 'रामचरितमानस' सर्वश्रुत आहेच. प.पू. प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी यांनी 'रामचरितमानस'चे समश्लोकी समछंद असे मराठीतून रुपांतर केले आहे. रामचरितमानस जरी रामकथा असली तरी त्यात कित्येक चौपायांतून सिद्धांत प्रतिपादन केला आहे. त्यातील काही निवडक चौपाया/दोहे (ओव्या) वेचून त्यांची 'मानसमणिमाला' गुंफून त्यातील प्रत्येक रत्‍नावर सौ. उषा गुणे यांनी सुंदर विवरण केले आहे. तेच क्रमशः येथे उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.
एकोऽहम्‌

* * * * * * * * *


हिंदी : मूक होई वाचाल पंगु चढ‍ई गिरीवर गहन ।
जासु कृपासी दयाल द्रव‍उ सकल कलिमल गहन ॥ बालकाण्ड
मराठी : मूक होई वाचाल - पंगु चढे गिरीवर गहन ।
कृपयायस्य दयाल द्रवु तो सब कलिमल दहन ॥ प्रज्ञानानंद.
अर्थ : मुक्या माणसास वाचा प्राप्त होईल, आणि पायाने अधु, पंगु मनुष्यही अत्यंत दुर्गम असे गिरीपठार चढून जाऊ शकेल. हे सर्व ज्याच्या कृपेने घडते तो सर्व कलिमलाचे दहन करणारा प्रभु माझ्यावर द्रवून कृपा करो.

परमेश्वराच्या कृपेने मुका मनुष्य वाक्‌पटु होऊ शकतो किंवा अधु मनुष्यही पर्वत ओलांडण्यासारखे अवघड कृत्य करून जातो. ज्ञानेश्वर माऊली आपल्या ज्ञानेश्वरीत (१०.८) म्हणतात - "आपुलिया स्नेहाची वागेश्वरी । जरी मुकेयाते अंगिकारी । तो वाचस्पतीशी करी । प्रबंधु होडा ॥" गुरुराया, आपण जर एखाद्या मुक्याचा प्रेमाने अंगिकार केलात, तर तो पैजेने बृहस्पतीशी देखील स्पर्धा करू शकेल. परंतु याचा अर्थ असा नव्हे किं त्या व्यक्तिनें स्वतः कांहीही न करतां परमेश्वराने आपल्या कृपेच्या सामर्थ्याने त्याला एकदम पर्वतावर आरूढ करावे किंवा त्याला एकदम पण्डीत करावे. ज्याची स्वतःची प्रेरणा आणि प्रयत्‍न दुर्दम्य असतील आणि भगवंतावर अतूट श्रद्धा ठेवून कार्य हाती घेण्याची उमेद असेल तर असंख्य अडचणी संकटे यांचे निवारण होऊन त्याचे कार्य पूर्णतेला जातेच जाते. अशा उमेदिकरितां, आत्मविश्वासाकरितां भगवंताजवळ कृपायाचना करावयाची.
संत तुलसीदासांनी 'रामचरितमानस' लिहायचा मानस प्रभुजवळ व्यक्त करून कार्यसिद्धि व्हावी याकरितां त्याचेच चरणी ही कृपायाचना व आशिर्वाद मागितले आहेत. सुप्रसिद्ध 'मूकं करोति वाचालं पंगु लंघयते गिरीम्‌' । या श्लोकाचेच हे अत्यंत सुंदर, सुगम, अर्थवाही रुपांतर आहे. पण त्याहिपेक्षां मूळ श्लोकांत नसलेले 'सर्व कलिमलाचे दहन' हे फलही येथे सूचित केले आहे. माझ्या हातून अशक्यप्राय वाटणारे कार्य तुझ्या कृपेने पार पडो असे तर म्हटलेच आहे परंतु त्याहिपुढे जाऊन कलियुगांत प्रत्येक कर्मामध्ये निर्माण होणारे दोषही नाहिसे होवोत अशी प्रार्थना केली आहे. कलीयुगांत तीव्र वित्तेषणा, लोकेषणा, स्पर्धा, ईर्षा, मत्सर व त्यातून निर्माण होणारे संघर्ष अपरिमित असतात. निष्काम कर्म कुणालाच नको असते.
परंतु स्वतः तुलसीदास मात्र म्हणतात "स्वांतःसुखाय तुलसी रघुनाथ गाथा - या ग्रंथाची रचना अगदी हेतुरहित निर्मळ आनंदाकरितां माझ्या हातून व्हावी ! अत्यंत निष्काम भावनेने श्रीरघुनाथाच्या सेवेप्रित्यर्थ हे कार्य हाती घेतलेले आहे " अशा तर्‍हेने अत्यंत सरलभावाने केवळ आनंदाप्रित्यर्थ, निष्ठेने कार्य करण्याचे उदाहरण स्वतः तुलसीदासांनी आपल्यासमोर ठेवले आहे.
ही रामकथा त्यांनी सात अध्यायांत - कांडामध्ये सविस्तर वर्णन केली आहे, व त्या सात काण्डांचा निर्देश अगर प्रास्ताविक त्यांनी सुरुवातीला सात संस्कृत श्लोकांमध्ये केले असून त्यातून वस्तुनिर्देश मंगलाचरणही केले आहे. वस्तुतः तुलसीदासांना संपूर्ण कथा संस्कृतमध्येच रचावयाची होती. परंतु प्राकृत हिंदी बोली भाषेचे दैव खरोखर बलवत्तर ! प्रत्यक्ष भगवान्‌ शंकरांनीच आदेश दिल्यामुळे तुलसीदासांनी 'भाषा निबंध मति मंजुल' अशी हिंदी मधूनच रचना केली व भगवंतांनी ती स्वतः पाहून अत्यंत प्रसन्नतेने त्यावर स्वाक्षरी केली - 'सत्यं शिवं सुंदरम्‌' !
डॉ. सौ. उषा गुणे

No comments: