25 February, 2008

संतांचा "मी" ..

संतांचा "मी" ..

श्रीगुरु ज्ञानदेवांना ज्या परमतत्त्वाची जाण आहे, त्या परतत्त्वाच्या संदर्भात ते "मी बोलेन । बोली अरुपाचे रूप दावीन ।" असें म्हणतात. या चरणांत "मी" हा कर्ता आहे. "मी" म्हणजे एक ज्ञानेश्वर नामक व्यक्ती असे वर पाहता प्रथमदर्शनी वाटेल, पण हा "मी" व्यक्तिवाचक एकवचनी मी नाही. तो केवळ ज्ञानदेव नामक व्यक्तीचा सूचक नाही.
हा "मी" सर्वात्मक शक्तिशाली आत्मरूपाचा वाचक आहे. व्यक्ति आणि समष्टी यांच्यातील एक अपूर्व एकरुपता, एकात्मता, एकरसता या "मी" मध्ये सातत्याने जाणवत असते. त्यांच्या "मी" मध्ये अवघे विश्व सामावलेले आहे. आणि त्यांचा "मी" विश्वात विस्तारला आहे.
जेव्हां "मी" असा विश्वात्मक होतो, तेव्हा मी मध्ये स्वार्थाचा किंचितही लवलेश नसतो. "हे विश्वचि माझे घर" एवढा तो व्यापक, उन्नत असतो. विश्वकल्याणार्थ समग्रतेची एक सर्वव्यापी सर्वंकश धारणाच तेथे "मी"च्या स्वरुपांत कार्यरत झालेली असते.
या दृष्टीने खुद्द श्रीज्ञानराजच स्वतःचे "अरुपाचे रूप" (ब्रह्म) असे आहेत. "दिसो परतत्त्व डोळा" (म्हणजे परब्रह्मसुखाचा अद्वैताच्या पातळीवर अनुभव यावा) ही देखील एकट्या ज्ञानदेवांचीच, ज्ञानदेव नामक एका व्यक्तीची स्वतःपुरती वैयक्तिक आकांक्षा नाही तर या विश्वरूप "मी"ने परतत्त्वदर्शनद्वारा अवघ्या विश्वसुखाची मागणी विश्वात्मक आत्मदेवाजवळ केली आहे. म्हणूनच तर त्यांना ज्ञानराजमाऊली म्हणतात. "दिसो परतत्त्व डोळा । पाहो सुखाचा सोहळा । रिघो महाबोध सुकाळा । माजि विश्व ॥" समग्र विश्वाला महाबोधाचा सुकाळ व्हावा आणि परिणामी विश्वाने सर्वसुखाचा सोहळा अनुभवावा हीच ज्ञानेश्वरमहाराजांची अभिलाषा आहे.
गुरुमाऊलीचा "मी" असा सर्वात्मक असल्याने "अहं ब्रह्मास्मि" (मी ब्रह्म आहे) या वेदातील महावाक्यात असणार्‍याच "मी"शी त्यांचे अद्वैताचे अतूट, अनन्य, घनिष्ट नाते आहे. "अयमात्मा ब्रह्म" (हा माझा आत्माच ब्रह्म आहे) किंवा "तत्त्वमसि" (ते ब्रह्म तूच आहेस) या सगळ्याच महावाक्यातील अद्वैत पातळीवरची "मी-तू" अशी द्वैतरहित परिभाषाच श्रीज्ञानराजांच्या जाणिवेला व्यापून बसली आहे. आणि त्यामुळेच हीच सर्वात्मकता, त्यांच्या अमृतापेक्षा रसाळ अशा बोलांतून अखंड ठिबकत असते, पाझरत असते, एवढेच नाही तर ओसंडून वाहात असते. श्रीगुरुंच्या रोमारोमांत एकच सर्वात्मभाव भिनलेला आहे.
श्रीज्ञानेश्वर महाराजांसारख्या सगळ्याच संतांचा "मी" असा विश्वात्मक असल्याने, इतरेजनांना जे "अरूप" (म्हणजे अनुभवापलीकडील) आहे, न दिसणारे आहे, ते परब्रह्म त्यांना स्पष्ट दिसत असते। नरेंद्रांनी एकदा श्रीरामकृष्णांना विचारले, "जगन्मातेविषयी सारखे बोलतां, पाहिली आहेत का ?" तेव्हां परमहंसांनी उत्तर दिले, "नरेंद्रा, तू जितका या चर्मचक्षूंचा प्रत्यक्ष विषय आहेस, त्यापेक्षा कित्येक पटींनी "माता" माझ्या अनुभवाची आहे". या आत्मदर्शनाने ते आनंदाकार झालेले असतात, आणि ही आनंदाकारता अवघ्या मानव समाजास प्राप्त व्हावी हीच त्यांची विश्वात्मक अभिलाषा असते. "मागणं" जेव्हां विश्वात्मक होते, तेव्हां त्यात स्वार्थ नसतो तर केवळ आणि केवळ "जगत्‌कल्याण" हाच एकमेव विचार असतो.
अण्णा -

1 comment:

Anonymous said...

अण्णांची पत्रे अतीशय उत्तम आहेत! ती पुस्तक रूपाने प्रसिद्ध करण्यासाठी आपण जरूर प्रयत्न करावा. Internet वर ही पत्रे किती लोक वाचतील?