05 March, 2008

मानसमणिमाला (४)

मानसमणिमाला (४)
हिंदी : साधु चरित सुभचरित कपासू ।
निरस बिसद गुनमय फल जासू ॥ ५ ॥
सोल सहि दुख परछिद्र दुरावा ।
वंदनीय जेहिं जग जसु पावा ॥ ६ ॥
मराठी : साधु-चरित शुभ चरित कपासी ।
निरस विशद गुणमय फल ज्यासी ॥
दुःख सहुनि परछिद्रं झांकति ।
जेणे जगति वंद्य यश पावति ॥ प्रज्ञानानंद
अर्थ : ज्याचे फळ निरस असले तरी, शुभ्र उज्ज्वल व गुणमय असते अशा कापसाच्या चरित्राप्रमाणेच साधूंचेही चरित्र शुभ्र गुणमय असते. दोघेही स्वतः दुःख सहन करून दुसर्‍यांची दुखेः (छिद्रे) झाकतात त्यामुळे ते जगांत वंदनीय होतात व उज्ज्वल यश प्राप्त करतात.
कपाशीचे तीन भागांनी झालेले बोंड (फळ) स्वतः अत्यंत निरस असते. इतर फळांप्रमाणे त्याच्यात अजिबात रस नसतो. परंतु त्याच बोंडापासून निघणारा कापूस अनेक गुणांनी युक्त असून माणसाला अनेक तर्‍हेने उपयोगी पडतो. बोंडातील कापूस या अवस्थेपासून प्रत्यक्ष वस्त्राच्या स्वरुपांत जाईपर्यंत त्याला अनेक प्रक्रियांमधून जावे लागते. सालपटे कचरा काढण्याकरितां पिंजणे, पेळू तयार करण्याकरतां पिळणे, धागा तयार करण्याकरतां ताणणे, गुंडाळणे, वस्त्र तयार करण्याकरतां मागाच्या ताणा-वाण्यावर ताणून बसविणे व आडवे उभे धागे गुंफुन घेणे व त्यानंतर रंगविणे, छापणे इत्यादि क्रिया त्याच्यावर कराव्या लागतात तेव्हां आपल्याला सुंदर वस्त्र मिळते. शुभ्र कापूस हे सर्व कष्ट सहन करतो ते केवळ मानवाच्या शरीराचे थंडीवार्‍यापासून रक्षण व्हावे व लज्जारक्षण व्हावे म्हणून ! स्वतः अनेक कष्टदायक अवस्थांतून जावूनही तो माणसाचे दुःख निवारण करतो अ जगामध्ये अत्यंत आदराचे स्थान मिळवितो.
संत सज्जनही आपली उन्नती साधताना अनेक दुःखे सहन करतात। साधना करताना शारिरीक मानसिक कष्ट, स्वजनांचा विरह अगर संताप, इतरेजनांची निंदा नालस्ती, दारिद्र्य सारखी संकटे व कित्येक वेळां आपले ध्येय परमेश्वर प्राप्ती त्याच्याबद्दलची मनातून वाटणारी अनिश्चितता, निराशा यामुळे सज्जनांचे लौकिकातले जीवन कष्टमयच असते. त्यांना लौकिक जीवनांतून काही फायदा तोटा मिळवायचा नसतो, ना धनमानाची अतिरिक्त हांव, ना कीर्तिसाठी धावाधाव. आपले कर्तव्य निरपेक्षतेने व निष्ठेने पार पाडायचे या विचरावर ते स्थिर असतात. त्यामुळे इतरांना असे जीवन अगदीच निरस, रुक्ष वाटण्याची शक्यता असते. परंतु सज्जनांच्या अंतःकरणांत त्याच्याबद्दल कुठलीच तक्रार, प्रतिक्रिया नसते. आपल्या शुद्ध आचरणानें व गुणसंपदेनें परहित साधणे, पीडितांचे दुःख निवारण करणे हेच त्यांच्या जीवनाचे लौकिकातले कार्य असते. त्यातूनच त्यांना भगवंताची सेवा करावयाची असते. त्यामुळे इतरांचे दोष दाखविणे, परनिंदा, मत्सर या गोष्टी ते कटाक्षाने टाळतात. या उलट त्यांचे दोष झाकून किंवा दुरुस्त करून त्यांना भविष्यांतील दुःखापासून वाचविण्याचाच ते प्रयत्‍न करतात. त्यामुळे ते जगात आदरणीय ठरतात व भगवंत त्यांच्या कार्याला यश देतो.

डॉ. सौ. उषा गुणे.

No comments: