28 March, 2008

गुरु तेथे ज्ञान

गुरु तेथे ज्ञान
श्रीगुरुंची अनेकानेक रुपे-स्वरुपें पाहतां पाहतां श्रीगुरु अरुपातच विलीन होऊन राहतात. श्रीगुरु काय ? श्रीगुरु काय ? याची संकल्पना आठवू म्हटले तर शेवटी एवढेच जाणवते - "गुरु तेथे ज्ञान".
मूर्तिमंत आत्मस्वरूपातच गुरुंना पाहावे. ज्ञानाशी अगदी निकट संबंधीत म्हणून जरी श्रीगुरुच्या संदर्भात गणेश, शारदा यांची आठवण, रूपकें झाली, गुरुस्नेहभावावरून जरी आपण त्यांची मायमाऊलीशी तुलना केली, श्रीगुरुला अगदी चित्‌सूर्य म्हटले, तरी पण अखेरीस श्रीगुरुचे माहात्म्य वाचातीत आहे. आणि मग सरते शेवटी एकच तरणोपाय म्हणजे नतमस्तक होणे.
श्रीगुरु सामर्थ्याचे वर्णन करणे आपल्या शक्तिबाहेरचे काम. सूर्याला उटणे लावावे, कल्पवृक्ष टवटवीच्या फुलांनी शृंगारावा, कापराला अन्य सुगंधी द्रव्याने सुगंधीत करावे, चंदनाला लिंबाच्या खोडाची उटी लावावी, हे जसे, जितके हास्यापद आहे, तितकेच काय, पण त्याच्याहून जास्तच थट्टा म्हणजे श्रीगुरुचे शब्दांनी वर्णन करणे.
'विशदबोधविदग्धा', 'विद्यारविंदप्रबोधा', 'संसारतमसूर्या' अशी विशेषणे सुद्धा त्यांचे वर्णन करण्यास असमर्थच. पण ती त्यांच्या ज्ञानदायी सामर्थ्यावर प्रकाश टाकतात एवढे खरे.
श्रीगुरुच्या पाऊलापाशी काय पिकत नाही ? ज्ञानोबाराय एके ठिकाणी म्हणतात - 'पिके सारस्वत तुझिया पाऊली' ! 'पिके' हा शब्दच मुळी नवनिर्मितीसूचक आहे. 'पिकणे' ह्यात सृजनाची, सृजनात नवनिर्मितीची आणि नवनिर्मितीत चेतनाची (ब्रह्मचैतन्याची) गर्भित अशी आशय घनता आहे. आध्यात्म शास्त्रदृष्ट्या गुरु स्नेहाळ माऊलीप्रमाणे परिपुष्ट करणारे आहेतच, पण साधकाच्या सर्व स्तरावरील विकासात, उन्नतीत, सर्वोदयास हातभार लावणारे असतात.
प्रभावसंपन्न, प्रतिभासंपन्न, ऐश्वर्यसंपन्न गुरुमाऊलीच्या, श्रीमंत गुरु‍अंबापदाचे केवळ स्मरणच प्रभुत्व आणि राऱ्याच संपत्तीची निर्मिती अगदी सहज करत असते. स्मरणासरशीच लक्ष्मी-मोक्षलक्ष्मी पायाशी लोळण घेते असा आजवरचा अनुभव आहे.
केवळ आणि केवळ गुरुसामर्थ्यामुळेच प्रापंचिक आणि अध्यात्मिक - पारमार्थिक अशी सगळी उद्दिष्टे साध्य होत असतात असा आपला दृढ विश्वास असावा. एकाच वेळी आत्मज्ञानाची जिज्ञासा आणि प्रपंचाची लालसा तृप्त करण्याचा गुण श्रीगुरुच्या रुपाने अवतरलेला आहे. श्रीगुरुला व्यावहारिक पातळीवरून न पाहता आत्मसत्तेच्या स्तरावरून पाहावे. नाही का ? श्रीगुरु साधकाकडे व्यावहारीक सत्तेतून कधीच पाहात नसतात, तर आत्मभावाने पाहतात. साधक हा कायम साधकच न राहतां तो आपल्यासारखा "गुरु"स्वरूप व्हावा अशी ज्याची तळमळ तो खरा "श्रीगुरु". ही साधक परिपूर्ण व्हावा अशी तळमळ - कळकळ त्या श्रीगुरुच्या सगळ्या कृतीतून, उक्तीतून सारखी, अखंड निथळत असते. साधकांनी पण ही श्रीगुरुच्या अंतरीची आत्मीयता नको का जाणायला ? गुरुप्रेमाला व्यवहाराचा स्तर नाही. आहे तो निखळ - निरपेक्ष अध्यात्मिक प्रेमभाव.

अण्णा -

No comments: