30 March, 2008

सुकृतिनो vs दुष्कृतिनो - २


सुकृतिनो vs दुष्कृतिनो - २

सुकृतिनो कोण ? दुष्कृतिनो कोण ? ते असे काय करतात की भगवंतांनी त्यांना असे संबोधावे ? मला आधी वाटले की थोडीशी पार्श्वभूमि तयार करून मग सरळ विषयाला हात घालता येईल. पण ज्या विषयरूपी या जगताचा जीवात्म्यावर, मनुष्यावर इतका जबरदस्त पगडा आहे की त्या भ्रांतिरूप जगताला जीवाने मानलेले सत्यत्व चुकीचे आहे हे जाणून मूळ स्वरूप आत्मतत्त्व जाणणे हे महा दुष्करच होऊन बसले. भगवंत अर्जुनाला सांगतात, अरे बाबा ह्या मायामय मिथ्या जगतामध्येंच फसलेल्यांपैकी हजारो लोकांमध्ये एखादाच आत्मतत्त्व जाणून घेण्यास सिद्ध (पात्र) होतो आणि त्या सिद्धांपैकीं देखील कोणी एखादाच आत्मतत्त्व जाणतो. करितां हे जगत मिथ्या कसे आहे ते पाहणे जरूरी आहे. - मनुष्यानां सहस्रेषु,  कश्चित् यतति सिद्धये । यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वतः ॥
मागे आपण पाहिले की 'मृगजळ' ही एक जलाचा आभास निर्माण करणारी, भ्रांतीने 'तेथे जल आहे' असे दर्शवणारी एक 'वस्तू' आहे. वस्तू म्हणायचे कारण म्हणजे कोणत्याही वस्तूचे मुख्य दोन घटक, जे नाम व रूप, हे इथेही आहेत. आता ही सर्व चिकित्सा करून मृगजळ ही एक भ्रांतीने निर्माण झालेली वस्तू आहे हे मनुष्याला, त्याच्या level of consciousness ला (म्हणजे तीव्र, मंद, व्यवसायात्मिका, अव्यवासायात्मिका, व्यावहारिक इत्यादि बुद्धि नव्हे) त्यातील जलाचे असत्यत्व जाणता येते. पण तेच हरिणाला नाही समजत. consciousness म्हणजे जाणीवेचा स्तर उंचावतो तेव्हां त्याला प्रज्ञेचा प्रांत म्हणतात. प्रज्ञा जागृत झाल्यावर आणखी साधनेने मनुष्य 'तुरीया' अवस्थेत जातो असे म्हणतात. तुरीया अवस्थेत पोचलेल्या ज्ञानी पुरुषावर विषय व इंद्रिये यांचा कांहीच परिणाम होत नसल्यामुळे या जगतातील कोणतीही नाम रूपात्मक वस्तू त्याला सुखी वा दुःखी करू शकत नाही. मग प्रत्येक वस्तू आणि सर्व वस्तूंनी मिळून बनलेले हे जग त्याच्या दृष्टीने मिथ्याच.
मग तो स्वतःला, आपल्या शरीरालाही मिथ्याच समजतो का ? इथेच तर त्याच्या आणि सामान्य पुरुषाच्या दृष्टीमधे फरक आहे. शरीर उपाधीने इतरांना तो एक वेगळा 'मी' आहे असे वाटत असले तरी त्याच्या अंतःकरणात एक वेगळा 'मी' असत नाही. करण तोच हे सर्व जगत्‌ झालेला असतो. त्याचा द्वैत भावच नाहिसा झालेला असतो. मग इतर सर्व वस्तूंकडे तो केवळ साक्षीभावाने पहात असतो. 'द्वा सुपर्णा' (मुंडक उपनिषद) मधील साक्षीभावाने जगताकडे पहात बसलेला पक्षी तो हाच.
पण अशा पुरुषाला "आत्मज्ञान" झाले, तो "ज्ञानी" झाला म्हणजे नेमके काय झाले ? त्याने नेमकी काय कृति केली ? त्याला कशाचे 'ज्ञान' झाले ? त्यालाही नाही सांगता येत. कारण 'ज्ञान' म्हणजे काय हे सांगण्यासाठी उपलब्ध असलेले माध्यम म्हणजे शब्द, विचार, तर्क, जाणीव हे सर्वच त्याचे वर्णन करण्यास अपुरे आहेत. ते सर्वच हतबल होतात. मग ज्ञानीजनही विज्ञान म्हणजे काय, अज्ञान म्हणजे काय हे सांगून ह्यांपैकी जे नाही (नेति, नेति) ते ज्ञान असे श्रीज्ञानेश्वर महाराजांसारख्या ज्ञानी लोकांना देखील सांगावी लागते. कसे ? ते म्हणतात -

मग ज्ञानाचिये वेळे । झांकती जाणिवेचे डोळे ।
जैसी तीरीं नाव न ढळे । टेकलीसांती ॥ ४ ॥
तैसी जाणीव जेथ न रिघे । विचार मागुता पाउलीं निघे ।
तर्कु आयणी नेघे । आंगीं जयांच्या ॥ ५ ॥
अर्जुना तया नांव ज्ञान । येर प्रपंचु हें विज्ञान ।
तेथ सत्यबुद्धि तें अज्ञान । हेंही जाण ॥ ६ ॥
आतां अज्ञान अवघें हरपे । विज्ञान निःशेष करपे ।
आणि ज्ञान तें स्वरूपें । होऊनि जाइजे ॥ ७ ॥

भगवंत सांगत असतांना अर्जुनही गोंधळून गेला, आपला गोंधळ उडणार ह्यात शंकाच नाही. आता हे अज्ञान, विज्ञान कुठून आले ? भगवंत म्हणतात "हे जगत्‌ म्हणजे त्रिगुणात्मक गुणधर्मांनी बनलेल्या अनेक वस्तूंचे store house आहे ना ? पण आत्मस्वरूप / परमात्मस्वरूप तर अद्वैत आहे. तरी त्याचे ठिकाणी विनाशी व जडरूप अशा अनेक प्रकारच्या विशेष (म्हणजे परमात्म्याहून भिन्न, वेगळे) पदार्थाचे ज्ञान होणे हेंच प्रपंचज्ञान. विज्ञान म्हणजे प्रपंचज्ञान. पण परमात्मरूप अद्वैतरूपी आहे, तर त्याहून भिन्न असा प्रपंचच कुठून असणार. म्हणजे प्रपंच भ्रांतीरूपच झाला ना ? आणि तरी त्याचे ठिकाणी तुम्हां लोकाना 'सत्यबुद्धि' आहे. ह्या भ्रांतिरूप प्रपंचाचे ठिकाणी सत्यबुद्धि असणे हेंच अज्ञान. अज्ञान, विज्ञान ओळख आणि विवेकाने ते काढून टाक. उरले ते 'ज्ञान'. " अर्जुन म्हणाला, " God you are Great, पण काही काही समजले नाही. आता शंकराचार्य एक उदाहरण देतात.
'तरंगफेनभ्रमबुदबुदादि सर्वं स्वरूपेण जलं यथा तथा । 
चिदेव देहादि अहं अनंतमेतत्‌ सर्वं चिदेवैकरसं विशुद्धम्‌ ॥** (विवेकचूडामणि - ३९१) 
**
The waves, the foam, the whirlpool and the bubbles etc. are all, in reality water. Similarly, the BMI, PFT and OET are all nothing but the essence of Consciousness [chit-ekarasam] The essence of consciousness is objectless consciousness. The world "Consciousness" can be used only with reference to objects. The essence of Consciousness is pure and uncontaminated by the BMI, PFT and OET. All these are only illumined by the light of Consciousness - तस्य भासा सर्वं इदं विभाति (मुंडक २.२.१०) - Vivekacudamani by Swami Chinmayananda.

BMI = Body Mind Intellect, PFT=Perceives, Feels, Thinks or Perceiver/Feeler/Thinker, OET= Objects, Emotions Thoughts - these terms were coined by Swami Chinmayananda and were frequently used by him in his discourses.

- जल ही वस्तू तरंग, फेस, बुडबुडा, मेघ, डबके, तलाव, नदी अशा अनेक प्रकारे आढळते. वेगवेगळ्या नाम रूपाने अभिव्यक्त झालेला त्यातील प्रत्येक अंश मूळ स्वरूप 'जल' ह्याहून अभिन्न असूनही त्या त्या प्रत्येक उपाधीला जलाहून वेगळे असे 'मी' व ’इतर सर्व’ असे भासणे हाच प्रपंच. तरंग, फेन, नदी ह्या प्रत्येकाचे आपापले विश्व (जगत्‌) असले तरी ते सर्व अद्वैत जलाच्या कारणापासून झालेले कार्यरूप अंशात्मेच होत. तेव्हां या प्रत्येक अंशात्म्याला आपल्या स्थायी भावाचे 'ज्ञान' होईल तेव्हां ते आपल्यातच सर्व आविष्कार पाहतील. म्हणजे आपला मूळ जलापासून निर्माण झालेला नामरूपात्मक विशेष भाव गळून जाईल, तेव्हां त्यांना जाणवेल की आपल्यातच निर्माण झालेले हे सर्व आविष्कार आहेत. पण त्यावेळी जलाहून भिन्न अशा 'स्वतंत्र' अस्तित्वाची जाण असेल का ? असली तरी आपल्या 'स्वतंत्र' अस्तित्वाची "ती" एक कल्पनाच होती, भ्रम होता, अज्ञान होते हेही कळेलच.
पण मग जे हे दिसते ते स्थूल सूक्ष्म जगत्‌ नाहीच का ? आहे ते ही आहे. पण अद्वैत परमेश्वरापासून भिन्न नव्हे. सृष्टीचा हा देखावा, हे स्थूल सूक्ष्म जगत्‌ हे परमेश्वराचे 'शरीर' आहे. माझ्या शरीरावरची त्वचा, नखे, ७२ कोटी नाड्या, हृदय, फुफ्फुस, हाडे हे सर्व मिळून 'मी' आहे. मग त्वचा, डोळा इत्यादि प्रत्येक अंशाने आपल्या स्वतंत्र अस्तित्वाची कल्पना केली तर तो अंशात्मक जीवात्मा झाला. त्याच्या दृष्टीने पाहता त्यानेच मी वेगळा व हे सर्व वेगळे अशी कल्पना केल्याने त्याला सुख-दुःख होते. ह्या संपूर्ण शरीराचा स्वामी जो मी परमात्मा त्याला नाही. मग एखाद्या मासपेशीला "आत्मज्ञान" झाले तर ती शरीररूपी जगताशी एकरूप राहूनच ह्या शरीराच्या मालकाची सगुण भावाने भक्ति करीत सहस्रनामानें स्तुति करेल तेव्हां त्याच्या जगताला म्हणेल 'इदं शरीरम्‌' जसे ज्ञानी भक्त ह्या जगत्‌रूपी मालकाची विष्णुरूपाने सगुण भावना करून त्याची सहस्रनामाने स्तुति करताना त्याला पहिले नाम बहाल करतो " विश्वम्‌ "
आता दुष्कृतिनो, सुकृतिनो ह्यांचे काय झाले ? OK OK पुढच्या भागात आधी तेच.

एकोहम्‌

No comments: