09 March, 2008

संतांची कळकळ - २

संतांची कळकळ -


संतांच्या अवताराचा हेतु एकच, "जगत उद्धार, जगत्‌कल्याण". घोर कलियुगात जड जीवांच्या उद्धाराची सर्वात जास्त कळकळ असणारे समर्थ महान पुरुष म्हणजे केवळ संतच.
देवाच्या अवताराच्या - अवतारकार्याच्या भूमिका वेगवेगळ्या आहेत, व संतांच्या कार्याच्या वेगळ्या. ईश्वर अवतारात "विनाशायच दुष्कृताम " नृहसिंह अवतार फक्त प्रल्हादापुरता करुण, बाकी कठोर. परशुराम अवतार - कृपा कमी, कठोर शासनच जास्त. बुद्ध अवतारात शासन कमीच, दया व अहिंसाच जास्त. थोड्क्यांत काय संतांचे अवतार देवापेक्षाही जास्त करुणामय आहेत एवढे मात्र खरे.
भगवंतांनी अवतार घेऊन दुष्टांचा वध केला, आणि संतांनी मात्र दुर्जनांना सज्जन केले. नृसिंहानी हिरण्यकश्यपूला मारला, रामानी रावणाला मारला, श्रीकृष्णानी कंसाला मारला पण आपल्या भगवताचार्य नारदांनी वाल्या कोळ्याला वाल्मीकी ऋषी केले. ज्ञानोबाराय पसायदानांत मागतात "जे खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रती वाढो ॥" जगत कल्याणाच्या बाबतीत सर्वच संतांची कळकळ सारखीच. " बुडता हे जन न देखो डोळा । थेतो कळवळा म्हणोनिया ॥ "
संत हे स्वतः पूर्णच असतात. जगत कल्याणासाठी आपले ज्ञान, अनुभव, बोध, उदार अंतःकरणाने, करुणेने जगताला वाटत राहतात. ह्या कृपाभावामुळे, कळकळीने कधी देवाजवळ, जनसामान्यांसाठी दान मागतात. "तुका म्हणे दान । द्यावे जी अनन्य ॥". प्रसंगी कडक भाषेतपण जगाला चांगले फैलावर घेतात. "मातेच्या पोटे दगड आला पोटासी", कधी कळवळून सांगतात, "ऐके रे जना । तुझ्या स्वहिताच्या खुणा । पंढरीचा राणा । मनामाजी स्मरावा ॥". 'रे' हा शब्द अत्यंत कृपावाचक आहे, कळवळ्यापोटी आहे. प्रसंगी याच करुणेने जगत कल्याणाच्या हेतूने समाजाच्या पाया पडतात. "सकळांच्या पाया माझे दंडवत । आपुलाले चित्त शुद्ध करा ॥".
"मी वासुदेव तत्त्वता", "तुका विष्णु नाही दुजा" एवढ्या अधिकाराचे तुकोबाराय पण आपल्या पायी लागतात - "लागोनिया पाया विनवितो तुम्हाला । करे टाळी, बोला मुखी नाम ।". समोरचा कितीही हीनदीन असला तरी आपला मोठेपणा बाजूला सारून त्याच्या उद्धारासाठी त्याच्या पायी विनवणी करतात. अजून कळकळ ती काय असावी ? अजून उपकार तो काय असावा ?
म्हणून तर तुकोबारायांनी ज्ञानराजाला माऊलीची उपमा दिली. "लेकुराचे हित । वाहे माऊलीचे चित्त । ऐसी कळवळ्याची जाती । करी लाभावीण प्रिती ॥". कळवळ्याच्या बाबतीत आई व संत एकाच जातीचे. पण "करी लाभावीण प्रिती" या बाबतीत संतप्रेमाची विशेषता आहे. व्यवहारी माता मुलावर प्रेम करते. मुलाला लहानाचा मोठा करताना, सांभाळताना हेतू नसतो. पण पुढे मुलगा मोठा झाल्यावर त्याने आपल्याला सांभाळावे ही आशा असते. म्हणजेच त्या प्रेमभावाला हेतूचा डाग लागतोच. म्हणून संतांच्या प्रेमभावाला व्यवहारी मातेची उपमा तोकडीच आहे.
केवळ उपकाराकरतांच ते या भूतलावर येतात, आपल्यात मिसळतात, आचरण करून, प्रसंगी बोटाशी (आणि कधी पोटाशीसुद्धां) धरून आपल्याला चालवतात। असे संत, आनंदाचे अनुकार, सुखाचे सागर, भक्तिप्रेमाचे माजघर असतात.
अण्णा -

4 comments:

Anonymous said...

Links to Daily Pravachans are not working since yesterday

Anonymous said...

Now only the March Pravachans can be accessed. Other months are not accessible!

एकोहम् said...

मित्रा, गूगल पेजस्‌‌ ह्या सर्विसमध्ये काहीतरी घोटाळा झालाय आणि प्रवचनाच्या सर्वच links नाहीशा झाल्यात. आपण सूचित केल्यामुळे मी दुसरा पर्याय वापरून फक्त 'मार्च'ची प्रवचने सुधारली. बाकी सर्व links जोडायला जरा वेळ लागणार आहे. कारण online editing करताना गूगल पेजस्‌ फारच हळू चालते. आपण इथे links काम करत नसल्याचे कळवून फार बरे केलेत. हरकत नसल्यास आपण मला जीमेलच्या eko.aham ह्या ID वर संपर्क साधू शकता. --
एकोऽहम्‌

Anonymous said...

Thanks for the great work you are doing! March corrections are good enough for next 15 days - so you have time to correct April by that time. I generally go to Harichintan to see if there is somethig new added, then go to Pravachan Link from Harichintan homepage. That's a good routine to follow.