21 March, 2008

डोळ्या अंजन भेटे..

डोळ्या अंजन भेटे..

आपल्याला आत्मज्ञानाची प्रगाढ अशी इच्छा असावी. ज्ञाननिष्ठाही ज्वलंत असावी. त्यासाठी सारे अध्यात्मग्रंथ, वेदग्रंथ, संतग्रंथ अभ्यासावेत. परंतु ग्रंथ फक्त आपल्याला शब्दज्ञान देतात. केवळ शब्दाने "आत्मज्ञान" होऊ शकत नाही, तर आत्मज्ञानाला अनुभूतीची नितांत गरज असते.
अध्यात्माचा पाया, पाया नाहीतर इमारतच मुळी अनुभूतीवर अधिष्ठित आहे. हे अनुभविक ज्ञान केवळ संतांकडूनच, श्रीगुरुंकडून लाभत असते. म्हणून देव आणि 'श्रीगुरु' यांत 'श्रीगुरु' हे अंतीम शरण्य मानले आहे.
अगदी उपनिषद काळापासून गुरुसंस्था चालत चालत आलेली आहे. गुरुशिवाय ज्ञानप्राप्ती अशक्यच आहे. ही आपल्या भारतीयांची धारणा आहे. बहुश्रुत, व्युत्पन्न, ज्ञानसंपन्न, आणि आत्मानुभवाने परिपक्व अशा श्रीगुरुंचे जीवनात फार महत्त्वाचे स्थान आहे.
अध्यात्मशास्त्रीय, स्वानुभूतिप्रधान ज्ञानपरंपरा देहधारी (पण देहबुद्धी नाही) अशा गुरुंनीच तेवत ठेवली आहे. सगळ्याच महात्म्यांनी ही परंपरा तर पाळलीच आहे, पण श्रीराम, श्रीकृष्ण अशा साक्षात परब्रह्माच्या अवतारांनी 'गुरु' ही संकल्पना अधिक तेजस्वी, भरदार आणि जास्त उज्ज्वल केली आहे. आपल्या श्रीज्ञानदेवांनी गुरुच्या रूपांत मूर्तिमंत 'ज्ञानच' उभे केले आहे.
श्रीमत निवृत्तिनाथ हे ज्ञानराजांचे गुरु तसेच ते त्यांचे वडील बंधूही होते. परंतु गुरु म्हणून वा वडील बंधू म्हणून, निवृत्तिनाथांचे बाह्य स्थूल वर्णन, माऊलीनी आपल्या ग्रंथात कुठेही केलेले नाही. अमूर्त अरूप अशा ज्ञानपुंजालाच ज्ञानराजानी गुरुस्वरुपात पाहिले आहे- वर्णन केले आहे. आपल्या स्वतःला होणाऱ्या अनुभवाच्या पातळीवरील ज्ञानालाच ते आपल्या अंतरंगात राहणाऱ्या गुरुरूपात अनुभवतात. ज्ञानरुपाने श्रीगुरुच आपल्या हृदयी राहतात अशी निष्ठा. म्हणूनच ते म्हणतात - "मज हृदयी सद्‌गुरु । जेणे तारिलो हा संसारपुरु । म्हणऊनि विशेषे अति आदरु । विवेकावरी ॥"
गुरुमुळे ज्ञानदृष्टी लाभते. "जैसे डोळ्यां अंजन भेटें । ते वेळी दृष्टीस फाटा फुटे । मग वास पाहिजे तेथ प्रगटे । महानिधी ॥". डोळ्यात विशिष्ट अंजन घातले की पायाळू माणसाला जमीनीतले निधान (गुप्तधन) दिसू लागते, त्याचप्रमाणे गुरुकृपादृष्टी लाभली की आपल्याच ठिकाणी असणारा ज्ञानाचा साठा, म्हणजेच भगवंत स्पष्ट अनुभवाला येतो.
झाडाच्या मुळाशी घातलेले पाणी शेंड्यापर्यंत पोंचते, आणि झाडाचे सारे लहान मोठे शाखापल्लव सारख्याच तन्मयतेने टवटवीत करून सोडते. त्याचप्रमाणे श्रीगुरुच्या कृपा सहवास संगती एकरूप समरसतेने सर्व प्रकारची अभिलाषिते पूर्ण होतात आणि सारे जीवनच आत्मचैतन्याने, आत्मानंदाने अंतर्बाह्य बहरून जाते.
गुरुच्या ठायी आत्मज्ञान असते. त्यामुळे आपल्याला आत्मतत्त्व दिसते, आणि आत्मदर्शनाने समाधान लाभते.
अण्णा -

No comments: