18 March, 2008

सुकृतिनो vs दुष्कृतिनो

सुकृतिनो vs दुष्कृतिनो


भगवद्‍गीतेच्या ज्ञानविज्ञान नामक सातव्या अध्यायात जीवात्म्याला जगताचा प्रत्यय नाहीसा होऊन केवळ अद्वैत ब्रह्मस्वरूपाचा प्रत्यय यावा हा हेतूने भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला आधी ज्ञानरूप परमेश्वराचे निरूपण करतात. मग ज्ञानाने जगत्‌ ठरवावे आणि भगवंताच्या प्रेमभक्तिने जगताचा मिथ्या भासही नाहीसा करायचा असे सांगतात. जगत्‌ म्हणजे नाम व रूप असलेले सर्व काही. आधी मिथ्या म्हणजे काय ? हे दृष्यरूप जगत्‌ अस्तित्वातच नाही की काय ? तसे नव्हे. जगत्‌ अस्तित्वात नक्कीच आहे. मी ह्या संगणकावर टंकलेखन करतोय, मग संगणक खरा नाहीच, मिथ्या, भ्रांतीरूप, आभासमय आहे असे कसे म्हणायचे ? वसिष्ठांपासून सांप्रत काळातील सर्वच ऋषी व संत 'हे दृष्यमय जगतच काय आपला देहदेखील उपाधीरूपाने मिथ्याच आहे,' असे म्हणतात. अहो पण मला जेव्हा तहान लागते तेव्हा 'हे पाणी मिथ्या आहे, माझी तहान मिथ्या आहे, ज्या मन वा बुद्धीला ती तहान जाणवली ते मन-बुद्धि मिथ्याच आहेत' असे म्हणून गप्प राहता येते का ? मग मिथ्या म्हणजे नेमके काय हे कुणीच का स्पष्ट करून सांगत नाहीत ? मला 'जगत्‌ मिथ्या' चा जो अर्थ उमगला तो असा. जीवात्म्याचे सर्वच्या सर्व व्यवहार सतत सुख कसे मिळवावे (वा दुःख निवृत्ति), सतत म्हणजे नित्य आनंदस्थिति कशी साधायची ह्यासाठीच असतात. कोणत्याही व्यवहारात, कोणत्याही कृतीच्या मागे दुसरी कोणती प्रेरणा असूच शकत नाही. आणि ह्या दृश्य जगतात अशी कोणतीच वस्तु नाही की जिला शाश्वर वा नित्य म्हणता येईल. सर्व वस्तू परिवर्तनशील व नाशिवंत आहेत. देवांसहित सर्वच जीवांना ठराविक आयुमर्यादा आहे, यन्‌ मर्त्यं तन्‌ नष्टम्‌ असे नामरूपात्मक सर्वच दृश्याचे स्वरूप आहे. ज्यात जीवाला सुख वाटते अशा कोणत्याही वस्तू वा परिस्थितीमध्ये परीवर्तन झाले की सुखाच्या डीग्रीमध्ये फरक पडणारच. पण जगातील एकूणएक वस्तू परिवर्तनशील आहे, आणि त्याच्याशी 'संग' झाल्यामुळे वाटणारे सुख वा आनंद देखील टिकणारे नाही म्हणजे अनित्य व मर्यादितच झाले. मग नित्य, अमर्याद, चिरंतन, शाश्वत सुख - ज्याला आनंद म्हणता येईल - ते जे काही अनंत, अमर्याद, चिरंतन, शाश्वत अशा वस्तूशी 'संग' केल्यानेच मिळू शकेल. अशी जी कोणती वस्तू आहे तिला 'सत्‌' म्हणायचे. आणि गंमत म्हणजे हे 'सत्‌' नामरूपात्मक जगताचा भाग नाही. पण त्याच 'सत्‌'ला मनुष्यमात्राने परत एक नाम (रूप नव्हे) देऊन त्याला भगवंत म्हणून टाकले. आता 'मी नित्य आनंदस्वरूप असावे' अशा स्थितीच्या प्राप्तीच्या दृष्टीने पाहता ह्या नामरूपात्मक जगतात एक 'सत्‌' सोडून नित्य, अपरीवर्तनशील असे काहीच सापडत नसल्याने त्या जगतातील सर्व काही म्हणजे संपूर्ण जगतालाच आनंद मिळवलेल्या, ज्ञान प्राप्त झालेल्या संतांनी 'मिथ्या' म्हणून टाकले. तरीपण हे जग भासमय, भ्रांतीमय, मिथ्या कसे हा प्रश्न राहिलाच. ह्यासाठी शास्त्रग्रंथांतून, संत वाङ्‍मयातून बरेच वेळेला एकाच उदाहरणाचा उल्लेख सापडतो. ते म्हणजे 'मृगजळ'. पटल्यासारखे वाटते पण शंका काही फिटत नाही. आपणही मानतो, मृगजळ आभासमय आहे - ठीक आहे - पण त्यालाही नाम रूप आहे ना ? आपल्यालाही ते 'दिसते' आणि ते काहीतरी आहे हेही नाकारू शकत नाही. पण ते आपल्या उपयोगाचे नाही एवढे मात्र खास. त्या वस्तूचा सुख, आनंद सोडाच, पण कोणत्याही हेतूने वापर करता येत नाही. मग आपल्यासाठी ते मिथ्या, भ्रांती, आभास वगैरे वगैरे आहे. तद्‌वत तुरीया अवस्थेचा अनुभव घेतलेले सर्व ऋषी व संत यांच्या दृष्टीने आनंदप्राप्तीसाठी हे जगत्‌ मिथ्याच आहे. मग फरक कुठे झाला. फरक फक्त दोघांच्या अवस्थेत झाला, मृगजळाचा अनुभव हरिणही घेते व माणूसही घेतो. या दोघांच्या अवस्थेत जो फरक आहे तोच फरक मूढ पुरुष व ज्ञानी पुरुष (संत) यांच्यात असावा. ज्ञानी पुरुषाला आपल्या अज्ञानी बांधवाबद्दल कळकळ असते. दोघांची भाषा एक असल्यामुळे संत अज्ञानी पुरुषाला समजावया प्रयत्‍न करतो की, 'अरे हे सर्व मिथ्या, आभासमय आहे, त्याचा नाद सोड'. तशी कळकळ अज्ञानी पुरुषाला हरिणाबद्दल वाटत नाही, आणि वाटली तरी सांगता येत नाही. बरे हरिणाची भाषा अवगत झाली आणि 'मृगजळ मिथ्या आहे' असे सांगायचा प्रयत्‍न केला तरी ते हरिण ऐकणार थोडेच. ते म्हणणार - काय सांगता राव, मला ते थोड्याशा अंतरावर चक्क दिसते आहे आणि तुम्ही त्याला मिथ्या म्हणता - better mind your business. मीही संताला तेच म्हणतो. मला तहान लागलीय. आणि हे समोर दिसते ते पाणी (नामरूप असलेले जगत्‌) आणि माझी सुखाची तहान हे दोन्ही मिथ्या ? भल्या गृहस्था, जरा कींव कर, मला पाणी पिऊ दे, माझी तहान भागू दे. तूही असा भणंगासारखा भटकू नकोस, तूही पाणी पी आणि सुखी हो. संत म्हणतो - "आपण दोघे त्या पिंपळावर बसलेल्या दोन पक्ष्यांप्रमाणे आहोत - द्वा सुपर्णा सयुजा सखाया, समानं वृक्षं परिषस्वजाते | तयो अन्यः पिप्पलं स्वादु अत्ति, अनश्नन्‌ अन्यो अभिचाकशीति (मुण्डक ३.१.१.) - mark my word - पाणी आणि तहान (जगत्‌) दोन्ही मिथ्याच बरं. तिथे आनंद नाहीच. शिकशील हळूहळू."
अहो पण 'ज्ञानविज्ञान', गीतेचा ७ वा अध्याय, दुष्कृतीनो इ. चे काय झाले. पाहू नंतर. आधी तहान लागली आहे. थोडे पाणी पिऊन येतो.

एकोऽहम्‌ -

No comments: