09 February, 2008

अरुपाचे रूप..

अरुपाचे रूप..


"अरूपाचे रूप दावीन" अशी श्रीगुरु ज्ञानराज माऊलीची प्रतिज्ञा. "रूप दाखविणे", "रूप करणे" असे शब्द प्रयोग त्यांनी आपल्या ग्रंथात अनेक ठिकाणी आणि अनेक अर्थांनी उपयोजिलेले आहेत. "अहिंसा रूप किजैल", "गुरु सामर्थ्या रुप करू", "नेणे रुप करू देवा", अशा सारख्या ठिकाणी वर्णन करणे, रूप दाखविणे, मर्म स्पष्ट करून सांगणे, अशा अर्थांनी ज्ञानराज "रुप करणे" हा शब्दप्रयोग वापरतात.
समग्र वाङ्मय व्यवहारच / साहित्याची निर्मिती, हा सगळा अक्षर प्रपंचच अरुपाला रूप देण्यातून साकारत असतो. साहित्यिकाच्या मनातील अमूर्त भावना, भावभावना आणि कल्पना या शब्दांच्याच माध्यमातून अभिव्यक्त होत असतात. लेखकाच्या मनात जे अव्यक्त असते ते याच अक्षर माध्यमातून व्यक्त होते. अरुप रूपवान होते. यालाच शब्दचित्र असे पण म्हणतात. आता ही ओवी बघा - " नाना कथा रूपे भारती । प्रकटली असे त्रिजगती । आविष्करोनि महामती । व्यासाचिये ॥ " कशी आणि किती बोलकी आहे ना ? भारती म्हणजे प्रत्यक्ष वाग्देवताच. महाभारत कथेच्या रूपाने, व्यासांच्या विशाल बुद्धीला नित्य स्फुरण देत या त्रिभुवनात प्रगटली असे श्रीज्ञानराज म्हणतात. पण "अरूपाचे रूप दावीन" यांत केवळ वाङ्मयीन अभिव्यक्तीच्याच उद्देशाने म्हणतात असे नाही, तर एखादे सर्वथैव असाध्य साध्य करण्याच्या ताकदीने, अभिनिवेशाने म्हणतात -
तेणे कारणे मी बोलेन । बोली अरुपाचे रूप दावीन । अतिंद्रिय परी भोगवीन । इंद्रियांकरवी ॥
या ओवीच्या शब्दाशब्दातून ज्ञानदेवांना काय अभिप्रेत आहे याचा विचार फार महत्त्वाचा आहे. हा शब्द तसा दुर्बोध नाही, पण त्याचबरोबर तो आपल्याला वाटतो तेवढा सुबोधही नाही.
मन, ज्याला रूप नाही त्याला रूप देणे हा "अरूप" शब्दाचा वाच्यार्थ आहे. पण वाच्यार्थातून नेमका आशय आपल्या लक्षात येत नाही. ही ओवी आली आहे ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायाच्या मंगलाचरणांत, म्हणजेच या अध्यायाच्या प्रास्ताविकांत. या अध्यायांत योगाचे विवेचन आहे. कुंडलिनी मार्गाचे सविस्तर वर्णन आहे. योगाद्वारे साधकाने प्रगती कशी साधावी ते या अध्यायांत सांगितले आहे. तरी सुद्धा या सहाव्या आध्यायापुरतेच फक्त योगविद्येच्या संदर्भांत श्रीगुरुमहाराज ज्ञानदेव "अरूपाचे रूप" दावीन असे म्हणत नाहीत तर, अरूप म्हणजे "निर्गुण निराकार परब्रह्म" एवढा सखोल अर्थ श्रीज्ञानदेवांना अभिप्रेत असल्याचे लक्षात येते.
ज्ञानेश्वरीत केवळ सगुण साकार अशा- "तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा ॥" एवढेंच वर्णन / रूपवर्णन आहे असे नाही. परतत्त्वाच्या संदर्भातच ज्ञानेश्वर महाराज "अरुपाचे रूप दावीन" असे म्हणतात. परतत्त्व दाखविणे हे सामान्याचे काम नाही. श्रीज्ञानराजांसारखाच थोर आत्मसाक्षात्कारी संतश्रेष्ठांचीच ती योग्यता.

अण्णा -

No comments: