06 February, 2008

मानसमणिमाला रत्‍न २ रे


मानसमणिमाला (२)


हिंदी : कुंद इंदु सम देह उमारमण करणाअयन ॥
जाहि दीनपर स्नेह कर‍उ कृपा मर्दनमदन ॥ बालकाण्ड मं. ४
मराठी : कुंद इंदु सम देह उमारमण करुणायतन ॥
जो करि दीनी स्नेह करो कृपा मर्दन मदन ॥ प्रज्ञानानंद
अर्थ : कुंदाच्या वेलीचे शुभ्र फूल, व शुभ्र शीतल चंद्राप्रमाणे ज्यांचे शरीर गौरवर्णाचे आहे असे उमापती भगवान्‌ शंकर करुणानिधान आहेत. ते अत्यंत दीन भक्तांवर अतिशय प्रेम करतात म्हणून ते मजवर कृपा करून माझ्या अंतःकरणातील कामादि दोष नष्ट करोत.

कुंदाचे पुष्प अत्यंत शुभ्र, नाजुक व सुगंधित असते. बघणार्‍या माणसाच्या मनांत सात्त्विकतेचे भाव निर्माण करते. त्याचप्रमाणे पूर्ण प्रकाशमान चंद्र आपल्या शुभ्र शीतल चांदण्याने भक्ताच्या मनांत प्रेम आल्हाद व शांति निर्माण करतो. असेच सर्वभाव भगवान्‌ शंकराची गौरवर्ण मूर्तीचे दर्शन केले असतां अंतःकरणात जागृत होतात शांत, स्थिर आसनांत बसलेले भगवान शंकर आपल्या तेजस्वी गौरवर्ण कांतीने भक्तांच्या केवल नेत्रांनाच सुखकर नाहीत तर भक्ताच्या मनांत ती शांतता, स्थिरता सहजतेने संक्रमित करतात. त्याचे विकार, विचार हळूहळू लय पावू लागतात. मनुष्य आपल्या चिंता, विवंचनांनी कितीही त्रस्त झालेला असला तरी शांत शीतल चांदण्याचा स्पर्श त्याला खूपच आश्वासक वाटतो, तसेच भगवान शंकराच्या गौरवर्ण, शांत, गंभीर दर्शनाने मनाला आश्वासन मिळते. प्रभु माझ्यावर खचितच कृपा करतील कारण ते करुणेचे निवासस्थान आहेत अशी त्याची खात्री असते.
त्यांची कृपा करण्याची रीतीही अगदी आगळी वेगळीच आहे. मनुष्याने आपणच निर्माण केलेले, स्विकारलेले व दैववशात त्याच्यावर आरूढ झालेले विकार, कामादि दोष स्वतःच्या प्रयत्‍नाने पूर्णपणे नष्ट करूं शकत नाही. तितकी विचक्षण बुद्धि, वैराग्य व दृढता त्याच्यात साधारणतः नसतेच. पण भगवान शंकरांनी तर या विकारांचे दहनच करून टाकले ! कसे ? तर आपला तृतीय नेत्र उघडून ! म्हणजेच तृतीय नेत्रातील ज्ञानाग्नीने सर्व कामादि विकार नष्ट करतां येतात हे प्रत्यक्ष उदाहरणानेच त्यांनी दाखवून दिले.
सर्व जीव हे शिवाचेच अंश असल्याने प्रत्येक व्यक्ति जवळ हा तृतीय नेत्र ज्ञानचक्षु उपलब्ध आहे. व त्यातील ज्ञानाग्नीने सर्व विकार भस्मसात करून माणसाला आपले अंतःकरण शुद्ध शांत करता येणे शक्य आहे. असेच भगवंत सुचवित आहेत.
धन्य भगवंताची करणी ! एकाच वेळी दाहक आणि शीतल, उग्र आणि प्रशांत, संहारक आणि संजीवक अशी करुणा !
अशा भगवान शंकराला संत तुलसीदासांनी आपला प्रथम गुरु मानलेले आहे. तोच आपल्याला आपल्या इष्ट दैवतापर्यंत प्रभु रामचंद्र यांच्यापर्यंत नेऊन पोहोचविणार आहे अशी त्यांची दृढ श्रद्धा आणि विश्वासही आहे. म्हणून आपल्या रामचरितमानस ग्रंथाच्या संस्कृत मंगलचरणांत ते म्हणतात : -
वंदे बोधमयं नित्यं गुरुं शंकर रूपिणम्‌ ।
यमाश्रितो हि वक्रोऽपि चंद्रः सर्वत्र वंद्ययते ॥
नित्य ज्ञानमय अशा गुरूंना भगवान शंकरांना नमन असो. त्यांच्या आश्रयाला राहिल्यामुळे वाकडा (द्वितीयेची कोर असलेला) चंद्रही जगाला वंद्य झाला आहे. द्वितीयेच्या चंद्राचे दर्शन अवश्य घेतले जाते. म्हणूनच माझ्या सारख्या दीन मतिहीन भक्ताला जवळ करण्यांत कांहीच अडचण येणार नाही. भगवान शंकरांना प्रिय असलेल्या प्रभु रामचंद्रांची कथा आतां मी सांगणार आहे म्हणून ते मला निश्चितच जवळ करतील. अशा गुरुंना त्रिवार वंदन !

डॉ. सौ. उषा गुणे.

No comments: