13 July, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक ५०

स्वापन स्ववशो व्यापी नैकात्मा नैककर्मकृत् 
वत्सरो वत्सलो वत्सीरत्नगर्भो धनेश्वरः  ।।
(४६) स्वापनः :  - जो लोकांना निद्रावश करतो, मोहवितो तो. भगवान विष्णु स्वतः ईश्वर आहे व दैवी माया हे त्याचे साधन आहे व तिच्या सहाय्याने त्याने स्वतःस ईश्वररूपात (नारायण )प्रकट केले आहे. परंतु त्याच मायेनें सर्व जीव आवृत्त करतो व त्यांना आपल्या दिव्य स्वरूपाचे अज्ञान होते. या मायेच्या आवरण शक्तिमुळे जीवांच्या मनांत अनेक विक्षेप निर्माण होतात, व ते लौकीक विषय मिळविण्यास प्रवृत्त होतात अशा तर्‍हेने ईश्वर आपल्या मायेने जीवांना मोहवितो म्हणून त्याला स्वापन अशी विशेष म्हणजेच मोहमयी शक्ति अशी संज्ञा मिळाली.
(४६) स्ववशः :  - जगतातील प्रत्येक वस्तू ज्याच्या आधीन आहे असा. जो पूर्णपणे स्वतंत्र आहे असा. तो परमेश्वर असल्यानें सर्व प्राणीमात्रांस व पंचमहाभूतांना त्यांची कार्यशक्ति व अस्तित्व त्याचे कृपेमुळेच प्राप्त झालेले आहे. व त्याच्याच शक्तिने त्यांना आपले कार्य करता येते. जर परमेश्वरानें आपले पालकत्व आवरून घेतले तर विश्वातील प्रत्येक वस्तू क्षणांत कार्यशून्य होऊन जाल. सर्व जगताला जरी त्याच्या शक्तिची आवश्यकता असते तरी तो मात्र त्या जगतापासून पूर्णपणे अलिप्त असतो. स्वयंपूर्ण असा तो व्यक्त जगतावर कधीही अवलंबून नसतो म्हणून तो पूर्णपणे 'स्ववश' आहे. तरंगाना सागराची गरज असते परंतु सागर तरंगाच्या असण्या-नसण्यापासून पूर्ण स्वतंत्र आहे.
(४६) व्यापी :  - सर्वास व्यापून राहिलेला. तत्वज्ञानाप्रमाणे व्याप्यत्व म्हणजे सूक्ष्मत्व. जे सर्वव्यापी आहे ते सूक्ष्माहूनही सूक्ष्म आहे.. भौतिक जगताचे अवलोकन केले तरी हीच कल्पना प्रत्यक्षांत उतरलेली दिसते. कारण हे सर्व कार्यांना व्यापून रहाते - जसे सुवर्ण हे सर्व अलंकारांना व्यापून असते. तसे हे सर्व विश्व कार्यस्वरूप असून परमात्मा कारणरूप आहे, त्यामुळे तो सर्वांस सर्ववेळी व्यापून आहे. त्यामुळे व्यापी ही संज्ञा असे सुचविते की तो परमात्मा ह्या जगताचे मूलभूत कारण असून त्यानेच हे सर्व नित्यतेने व्यापलेले आहे, तो जगतातील सर्व वस्तूंमध्ये त्यांच्या सर्व कार्यकर्मामध्ये, स्वभावांमध्ये सर्व वेळी उपस्थित आहे.
 (४६) नैकात्मा :  - अनेकात्मा. तो परमात्मा जरी एकच आहे तरी विश्वरूपाने व्यक्त होताना अनेक रूपात व्यक्तदशेस येतो. सर्व पंचमहाभूतात्मक सृष्टि व त्याची कार्ये व त्यांची क्रीडा चालू ठेवण्याकरतां तो परमात्मा स्वतः सृष्टिकर्ता, पालनकर्ता व संहारकर्ता अशाही अनेक रूपानें व्यक्त होतो.म्हणूनच त्रिमूर्ती (अनेकमूर्ती) रूपाने व्यक्त होते ते विष्णुतत्त्व.
(४६) नैककर्मकृत् :  - जो अनेक कार्य करतो तो. तो सृष्टिचे सृजन करतो, पालन करतो व विलयही करतो म्हणून तो अनेक कार्य करणारा आहे. व जेथे तो नाही तेथील कार्य थांबून जाते.
(४७०) वत्सरः :  - भगवंताचे अधिष्ठान. तो आपल्या प्रत्येकाच्या अंतर्यामी असल्यानें अंतरंगात वसणारा आहे परंतु त्याचवेळी सर्वव्यापी आहे. ज्याचे सर्व विश्वाचेच तो अस्तित्व आहे म्हणूनच आपण सर्व प्राणीमात्र त्याच्यातच रहातो, श्वासोच्छ्वास करतो व कार्य करतो. सर्व जीवांचे अधिष्ठान (आधार) असल्याने तोच अनंत कालही आहे व अमर्याद आकाशही आहे. व्यक्त जगत् हे दिक्कालातच राहू शकते.
तसेच संस्कृतमध्ये वत्स म्हणजे गाईचे वासरू. म्हणून ’वत्सर’ या संज्ञेचा विचार करता तिचा अर्थ होईल जो वत्सांचे दान करतो तो. शत्रूंनी हरण करून केलेली गाई वासरे भगवान श्रीकृष्णाने गोपालांना परत मिळवून दिली म्हणून तो 'वत्सर' आहे असा हा पौराणिक संदर्भ आहे.[1]
(४७) वत्सलः :  - अत्यंत प्रेमळ. आपल्या भक्तांवर निरतिशय प्रेम करणारा. जगातील सर्व मातापित्यांची ममता एकत्र केली तरी तिच्याहून कितीतरी अधिक ममता तो आपल्या भक्तावर करतो म्हणून तो नारायण वत्सल आहे. आत्यंतिक प्रेम हा वत्सल शब्दाचा शद्बार्थ तर नारायण मूर्तिमंत प्रेम स्वरूपच आहे.
(४७) वत्सी :  - पिता. ज्याला अगणित बालके आहे असा जगताचा माता पिता, सर्व प्राणीजगतास तो आपल्या मुलाप्रमाणे सांभाळतो, वाढवितो. कारण तो त्यांना आपली प्रजा असेच मानतो. दुसरा अर्थ जो कळपातील वासरांना सांभाळतो, शिक्षण देतो तो वत्सी.
(४७) रत्‍नगर्भ :  - ज्याचे गर्भात रत्‍ने आहेत असा - समुद्र. सागराप्रमाणे ज्याने आपल्या गर्भात विपुल संपत्ती साठविली आहे तो.[2] त्यामुळे असे म्हणता येईल की आपल्या भक्तांना अपेक्षित असे सर्व देण्यामध्ये तो तत्पर आहे असा 'रत्नगर्भ' श्रीविष्णु होय.
(४७) धनेश्वरः :  - सर्व धनाचा स्वामी. हया ठिकाणी धन या संज्ञेमध्ये जगतातील सर्व सुखकारक व चांगल्या गोष्टींचा अंतर्भाव केला आहे. पुराणांमध्ये त्याचे वर्णन लक्ष्मीपती असे केले आहे आणि खरोखरच तो सर्व संपत्तीचा स्वामी आहे. सर्वश्रेष्ठ संपत्ती म्हणजे 'मुक्ती' व ती देणारा तर श्री नारायणच तिचा स्वामी आहे. मायेच्या आवरणामुळे निर्माण होणार्‍या सुखदुःखापासून व बंधनापासून भक्तांना मुक्ती देणारा श्री नारायण 'धनेश्वर' आहे.



[1]   वत्सर शब्दाची अशी उकल होऊ शकते - वत्सान् राति इति वत्सर:
[2]   सरसामस्मि सागर । (गीता १०.२४)

No comments: