17 July, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक ५१

धर्मगुब्धर्मकृद्धर्मी सदसत्क्षरमक्षरम् 
अविज्ञाता सहस्त्रांशुर्विधाता कृतलक्षणः  ।।
(४७) धर्मगुप् :  - जो धर्माचे रक्षण करतो तो. भगवत् गीतेमध्ये भगवंत म्हणतात, ' प्रत्येक युगांमध्ये धर्माच्या संस्थापनेकरतां मी अवतार घेतो.[1]
(४७) धर्मकृत् :  - जो धर्म आचरतो, कृती करतो तो. जरी ते परमचैतन्यस्वरूप सर्व धर्म व अधर्म यांच्या पलीकडे राहूनच सर्व ज्ञान प्रकाशित करते तरी नारायण रूपाने तेच स्वतःच्या वर्तनाने धर्माचा योग्य व सत्य अर्थ उलगडून दाखविते. म्हणूनच त्याला धर्मप्रवर्तक म्हटले जाते. आपल्या भोवताली असलेल्या परिस्थितीचे नित्य परिवर्तनशील क्रीडास्वरूप पाहूनही त्यामध्येच राहून धर्मशील कसे रहावे हे मानवांना स्वतःच्या वर्तनाने दाखवून देण्याकरतां भगवंतांनी अवतार धारण केलेले आहेत म्हणून ते धर्मकृत आहेत.
(४७) धर्मी :  - धर्माचा आधार - म्हणजेच सर्व धर्माचे अधिष्ठान. ज्याप्रमाणे तरंग समुद्राच्या आधाराने असतात, पट किवा तंतु कापसाच्या आधाराने असतात किवा अलंकार सोन्याच्या आधाराने असतात त्याचप्रमाणे सत्यस्वरूप भगवान् श्रीनारायण, हेच सर्व ब्रह्मांडाचे मूल तत्व आहे. व त्याचा आधार आहे. श्रीनारायण्च धर्माचे अधिष्ठान, सिंहासन आहे. त्याच्या साक्षात् संबंधाखेरीज धर्माला काहींच अर्थ उरत नाही जसे राज्यशासन कोसळले तर त्याची कायद्याची पुस्तके केवळ कोरी पानेच होऊन जातील, तसे भगवंताचा आधार नसेल तर सर्व धर्म व्यर्थहोऊन जातील.
(४७) सत् :  - सर्व प्राणीमात्रांतील, वस्तूजातातील 'अस्तित्व' हे सदा समच असते व ते सर्वव्यापी असते. सूर्याला अस्तित्व आहे व सूर्य व पृथ्वीमधील अंतराळालाही अस्तित्व आहे. समुद्रास अस्तित्व आहे. व त्याचवेळी त्यातील जलचरांसही अस्तित्व आहे. सर्व प्राण्यांची शरीरे, इंद्रिये, त्यांची कार्ये तसेच मन व त्याचे कार्य, बुद्धि व तिचे चांचल्य या सर्वांना अस्तित्व आहे. या सर्वांच्या नित्य अस्तित्वाचे तत्व आहे श्रीनारायण. सर्व परिवर्तनामध्ये जे अपरिवर्तनिय आहे, त्याचेमध्ये विकार होत नाहीत, जे भूतकाल, वर्तमान व भविष्यातही तेच व तसेच असते त्यांस वेदांतामध्ये 'सत्य' असे म्हटले जाते, व हे सर्व धर्म ज्याचे आहेत तो सत्पुरूष. उपनिषदांमध्ये त्या परब्रह्मास 'सत्य' असे म्हटले आहे. 'हे, वत्सा, हेच सत्य प्रथम होते.'[2]  परिवर्तनशील प्रकृतीमधील अविकारी ब्रह्माचे वर्णन करतांना गीतेमध्ये भगवंत म्हणतात, [3]'ज्याने हे सर्व विश्व व्यापलेले आहे ते तत्व अविनाशी असून त्याचा कुणीही नाश करूं शकत नाही.
(४७) असत् :  - बद्ध, मर्यादित. जो या वर्तमानांत मर्यादित झाल्याप्रमाणे भासत आहे व त्यामुळेच सर्व विश्वातील वैचित्र्यांमध्ये बद्ध झाल्याप्रमाणे भासत आहे ते असत्. ज्याला प्रत्यक्ष अस्तित्व नसते परंतु जे आहे असे भासते त्याला 'भ्रम' असे म्हणतात, व त्यालाच अ-सत् असे म्हटले जाते. वेदांत परिभाषेप्रमाणे 'परमतत्व' हे सदैव विनिर्मुक्त व अनंत आहे. व जे सर्व व्यक्त सृष्टि व प्राणीमात्रांमध्ये अंतर्भूत असते ते 'अपरम-तत्व' मर्यादित व नाशिवंत असते. श्रीनारायण आपल्या 'अपर' अवस्थेमध्ये या सृष्टिरूपाने व्यक्त होतो. त्यालाच आपण जग म्हणून ओळखतो. म्हणून भगवंत गीतेमध्ये अर्जुनाला स्पष्ट करतात, [4]'मी एकाचवेळी मृत्यु व अमृत स्वरूपही आहे, तसेच मी 'सत्'ही आहे व 'असत्'ही आहे.'
(४८०) क्षरम् :  - जे क्षर पावते, नाश पावते असे. जो निर्विकारी आत्मा आहे तोच सर्व वस्तूंच्या संबंधाने परिवर्तित विकारी झालेला दिसतो, तरीही सर्व परिवर्तनामध्ये तो अपरिवर्तनीय आहे. सर्व सृष्टितील उत्पन्न वस्तूजात व प्राणीमात्र परिवर्तनीय आहेत व हे परिवर्तन त्याच्याच आधाराने होते. म्हणून त्या अविकारी अनंत सत्याला येथे 'क्षर' असे म्हटले आहे. सतत रूप बदलणार्‍या व नाहीशा होणार्‍या लाटा म्हणजे दुसरे काही नसून स्थिर असा सागरच असतो.
(४८) अक्षरम् :  - अविनाशी - विकार अगर बदल समजण्याकरतां जे स्वतः कधीही बदलत नाही व ज्याला बदलाचे ज्ञान असते असे तत्व आवश्यक असते. एका दागिन्यातून दुसरा दागिनाकरावयाचा असला तरी त्यांना आधार देणारे सोने सतत तेच व तसेच असते. त्याचप्रमाणे या सृष्टिच्या क्रीडेमध्ये चालणारे नित्य परिवर्तन ज्याच्या आधाराने चालू शकते असे अपरिवर्तनीय अविकारी मूलतत्व आवश्यक आहे. व तेच अक्षर तत्व आहे श्रीनारायण. भगवत् गीतेमध्ये श्रीकृष्ण सांगतात, 'सर्व उत्पन्न प्राणीमात्रांनी मिळून होतो तो क्षर पुरूष व त्या प्राणी मात्रांत अविकारी असतो तो [5] 'अक्षर पुरूष' होय.
(४८) अविज्ञाता :  - न जाणणारा. या ठिकाणी प्रथम 'ज्ञाता' ही संज्ञा स्पष्टपणे समजून घेतली पाहिजे. सर्व विचार, भावना जाणणारा प्राणीमात्रातील 'आत्मा' हाच ज्ञाता आहे. तो शरीर, मन,बुद्धिशी बद्ध झालेला आहे. आणि ह्या साधनांद्वारा कार्य करून विज्ञाता भाविक अगर संवेदक होतो. त्यालाच वेदांताच्या परिभाषेमध्ये 'जीव' असे म्हटले जाते. या दुःखपूर्ण घडामोडींच्या जगतात अहंकेंद्रित व्यक्तितत्त्वच कर्ता आणि भोक्ता होत असते श्रीनारायण हे शुद्ध आत्मतत्व असल्याने ह्या दुःखदायक विक्षेपात्मक अशा प्रकृतीच्या आवरणाने डागाळत (झाकत) नाही. म्हणून ते शुद्ध आत्मतत्व श्रीविष्णु 'अविज्ञाता' आहे. तोच ’जीव’ आहे.
(४८) सहस्त्रांशुः :  - ज्याला हजारो किरणे आहेत असा. शुद्ध ज्ञानस्वरूप आत्मा अत्यंत प्रकाशमान आहे. उपनिषदे म्हणतात की चंद्र सूर्य व नक्षत्रेही आपला प्रकाश त्याच्याकडूनच प्राप्त करतात. खरे तर सर्वच जीवांना आपले तेज मिळते ते त्याचेपासूनच असा उपनिषदांचा निष्कर्ष आहे.[6] तसेच या संज्ञेचा दुसरा अर्थ होईल सूर्याचे स्वरूपातील श्रीनारायण.. त्याच्या हजारो किरणामुळे सृष्टितील सर्वजीवांना तेज मिळते, प्रकाश मिळतो कारण संस्कृत्मध्ये त्याचे नावच आहे ’सहस्त्रांशु’. म्हणूनच सूर्याची स्तुती सूर्यनारायण अशी करतात.
(४८) विधाताः :  - सर्वांचा आधार. सर्वांचा मूलाधार असल्यानें तो परमात्मा सर्व चराचर विश्वाचा एकमेव आधार आहे व त्याला दुसरा कोणाचा आधार आवश्यक नसल्याने तो स्वतःचाही आधार आहे. तो परमात्मा एकाचवेळी जगताचे उपादान व निमित्त कारण आहे व कर्ताही आहे.
(४८) कृतलक्षण :  - तो आपल्या सहा लक्षणांनी प्रसिद्ध आहे असा.[7] पुराणातील वर्णनाप्रमाणे  भगवंतांनी आपल्या वक्षावर भृगुमहर्षीचे पदचिन्ह (लक्षण) धारण केले आहे म्हणून तो कृतलक्षण आहे. वस्तुतः शुद्ध वेदांताप्रमाणे नित्य शुद्ध असे परब्रह्म हेच प्रत्येक जीवाचे अंतिम लक्ष्य असले पाहिजे म्हणून तो कृतलक्षण आहे. तसेच लक्षण म्हणजे वेदग्रंथ व ते ज्याने केले (कृत) तो कृतलक्षण श्रीविष्णु.
  
 डॉ. सौ. उषा गुणे.


[1]   परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् । धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगेयुगे । (गीता ४.८)
[2]   सदैव सौम्येदमग्र आसीत् – (छादोग्य ६-३)
[3]    अविनाशी तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततम्  ।। गीता २-१७
[4]   अमृतं चैव मृत्युश्च सदसच्चाहमर्जुन ।। गीता ९-१९
[5]   क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते  । (गीता १५-१६)
[6]   तदेव भान्तमनुभान्ति सर्वं तस्यभासा सर्वमिदं विभाति  ।। मुंडकोपनिषत् २-२१०
[7]  ती लक्षणे अशी आहेत - ऐश्वर्य, धर्म, यश, संपत्ती, ज्ञान व वैराग्य.
 

No comments: