25 July, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक ५३

उत्तरो गोपतिर्गोप्ता ज्ञानगम्यः पुरातनः 
शरीरभूतभृद्भोक्ता कपीन्द्रो भूरिदक्षिणः  ।।
(४९) उत्तरः :  - जो आपले संसार सागरातून उद्धरण करतो तो. तसेच दुसरा उत्कृष्ठ अर्थ होतो की 'जो सर्व देवांमध्येही उत्तर (श्रेष्ठ) व उदार आहे असा. ऋग्वेदांत म्हटले आहे,[1] तो सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे.
(४९) गोपतिः :  - गाईचे रक्षण करणारा. ज्याने कृष्ण अवतारामध्ये गवळयाचेही काम नाट्यरूपाने केले तो. संस्कृतमध्ये 'गो' शद्बाचे चार अर्थ होतात. (१) गो - गाय. (२) गो - पृथ्वी. (३) गो - वाणी (४) गो - वेद. व या सर्वाचा तो पति आहे. अर्थात (१) सर्व गाइंर्चा-प्राणीमात्रांचा पति, (२) पृथ्वीचा पति - आधार (३) वाणीचा (इंद्रियाचा) पति- (आत्मा) (४) सर्व वेद ध्येय रूपाने सतत त्याचाच निर्देश करतात म्हणून वेदांचा पति.
(४९) गोप्ता :  - रक्षणकर्ता. तो सर्व जीवांचा रक्षणकर्ता आहे. इतकेच नव्हे तर त्याचे खेरिज जीवांचे अस्तित्वही अशक्य आहे. तो अस्तित्व रूपानें सर्व प्राणीमात्रांत उपस्थित आहे.
(४९) ज्ञानगम्यः :  - ज्याची प्राप्ती केवळ अत्यंत सूक्ष्म ज्ञानानेच होते असा. तो कुठल्या कर्मानें मिळवतां येत नाही, संतति, संपत्तीनेही मिळविता येत नाही. केवळ शुद्ध ज्ञानानेच त्याची प्राप्ती होवूं शकते (ज्ञान प्रसादेन). या ठिकाणी 'ज्ञान' शद्बाचा अर्थ लौकीक अर्थ विषयांचे ज्ञान असा करता कामा नये. सत्याचे ज्ञान जेव्हा बुद्धिच्याही पलिकडे जाता येते तेंव्हाच होते. जेव्हा अविद्येच्या बंधनातून मुक्तता होते तेंव्हाच साधक ध्यानाने त्या सत्याचे ज्ञान करून घेतो. व या 'साक्षात' अनुभवालाच या ठिकाणी 'ज्ञान' असे म्हटले आहे. व ह्याच प्रक्रियेने केवळ साधकास त्या अनंताची प्राप्ती होते म्हणून तो ज्ञानगम्य होय.
(४९) पुरातनः :  - जो कालाच्याही पूर्वीचा आहे. कालाची संकल्पना त्याचेपासूनच निर्माण झाली असल्यामुळे ते अनंततत्व होय. व ते सत्य कालाच्या मापाने मोजता येत नाही. तो कालातीत आहे म्हणून त्यास पुरातन म्हटले आहे.
(४९) शरीरभूतभृत् :  - शरीरांना उत्पन्न करणार्‍या पंचमहाभूतांचेही जो भरण पोषण करतो तो. तो परमात्मा सर्व पंचमहाभूतांचा नियामक आहे.
(५००) भोक्ता : - भोक्ता किवा रक्षणकर्ता. ही संज्ञा दोन अर्थाने स्पष्ट करता येईल. (१) रक्षणकर्ता[2] (२) उपभोग घेणारा.[3] वेदांताच्या मते निर्गुणावस्थेत तो परमात्मा कर्ताही नसतो व भोक्ताही नसतो. तरीही या ठिकाणी त्याला भोक्ता म्हटले आहे कारण अनुभव घेणारा 'अहं' जीवरूपाने दुसरा कोणी नसून परमतत्वाचाच अंश आहे.
(५०) कपीन्द्र :  - सर्व कपींचा स्वामी - श्रीरामचंद्र. कपी ह्या शद्बाचा दुसरा अर्थ वराह.[4]
(५०) भूरिदक्षिणः :  - जो मोठी दक्षिणा देतो तो. यज्ञामध्ये शेवटी दक्षिणा दिली जाते. जेव्हां मनुष्य शरीर, मन, बुद्धी यज्ञाकरतां समर्पित करतो तेंव्हा त्याचे हातून (यज्ञ) कर्म होते. व अशा कर्माचे फल देणारा (कर्मफल दाता) तो श्रीनारायण होय. म्हणून त्याला येथे 'भूरिदक्षिण' असे म्हटले आहे.
 डॉ. सौ. उषा गुणे.



[1]  'विश्वस्मात् इन्द्रः उत्तरः  । (ऋ.१०-६-१) 
[2]  भुनक्ति इति भोक्ता - रक्षणकर्ता 
[3]   भुंक्ते इति भोक्ता - उपभोग घेणारा. 
[4]   कपीर्वराह इन्द्रश्च वराहवपुरास्थितः

No comments: