21 July, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक ५२

गभस्तिनेमिः सत्वस्थः सिंहो भूतमहेश्वरः 
आदिदेवो महादेवो देवेशो देवभृत् गुरूः  ।।
(४८) गभस्तिनेमिः :  - जो दिव्य नक्षत्र मंडलाच्या केंद्रस्थानी आहे असा. संस्कृत भाषेमध्ये गभस्ति शद्बाचा अर्थ किरणे असा होतो. नेमि म्हणजे चक्राच्या आरा. त्यामुळे या संपूर्ण संज्ञेचा अर्थ '' आपल्या ज्याच्या तेजाची किरणे सर्व दिशांना पसरविणार्‍या प्रकाशचक्राचा केंद्रबिंदू तो गभस्तिनेमि'' असा होईल. खगोल शास्त्राप्रमाणे सूर्यमंडलाचा केंद्रबिंदू असलेला 'सूर्य' असा अर्थ होइल. जीवाच्या दृष्टिने तो स्वयंप्रकाशी आत्मा 'केंद्रस्थ' असून त्याचे तेज प्रकृतीच्या चक्रांतून (पंचकोशातून) बाहेर पडत असते.
(४८) सत्वस्थः :  - जो सत्वामध्ये रहातो तो. माया तीन गुणांनी युक्त आहे व ते तीन गुण म्हणजे सत्वगुण (नैष्कर्म), रजोगुण (कर्मप्रवणता) व तमोगुण (निष्क्रियता). मायेतील सत्वगुणांचे प्राबल्याने असते तेंव्हा तो गुणच परब्रह्मास ईश्वर स्वरूपांत व्यक्त होण्यास वाहन होतो व तोच 'श्रीनारायण' होय. तो ईश्वर सत्वगुण प्रधान आहे म्हणून भगवंत 'सत्वस्थ' आहे. त्याचे स्वरूप शुद्ध सत्य स्वरूप असे आहे. दुसरा अर्थ होईल 'जो सर्व जीवांमध्ये सत्वांमध्ये रहातो (स्थ) तो श्रीविष्णु.
(४८) सिंहः :  - सिंह. दुष्प्रवृत्तींबरोबर झगडण्यामध्ये सर्वांपेक्षा अत्यंत पराक्रमी असा तो सिंह ह्याच नांवाने निर्देशिला आहे. आपल्या अवतारकार्यात सर्व प्राण्यांपेक्षा पराक्रमी अशा सिंहासारखे कार्य केले आहे. संस्कृत भाषेप्रमाणे एकाद्या नामाचा कांही भाग त्या संपूर्ण नामाचा निर्देश करू शकतो जसे 'भीम' शद्ब भीमसेन ह्या नामाचा किवा 'भामा' हा शद्ब सत्यभामा ह्या नावाचा निर्देश करतो तसेच सिंह ह्या शद्बाने परमेश्वराच्या नृसिंह ह्या नामाचा निर्देश केला आहे. भगवंतांनी नर+सिंह असे रूप धारण करून पृथ्वीला हिरण्यकश्यपूच्या जाचातून सोडविले व ईश्वरशरण भक्त प्रल्हादावर कृपा केली.
(४८) भूतमहेश्वर:  - सर्व भूतमात्रांचा स्वामी. जो स्वामी असतो तो आज्ञा करतो, नियमन करतो व सर्व कार्याचे अध्यक्षत्वही त्याच्याचकडे असते. भगवंतही शासक होऊनही सर्व कार्ये करतो म्हणून भूतमहेश्वर आहे.
(४९) आदिदेवः :  - प्रथमेश. किवा दुसरा अर्थ जो आदि प्रथम आहे व प्रकाशमानही (देव) आहे. तसेच प्रथमदेव असल्यानें सर्व देवांचाही देव आहे असाही अर्थ होईल.. आदि म्हणजे स्विकार किवा खाणे, व देव म्हणजे प्रकट होणे दोन्ही शद्ब मिळून अर्थ होतो, जो नामरूपात्मक सृष्टिचा स्विकार अगर ग्रहण करून जो  प्रकट होतो तो. व्यक्तिशः अर्थ होईल की ज्या प्रमाणांत साधक आपणास स्वतःमधील सर्व नामरूपात्मक असत्यापासून परावृत्त करील व जसजसा अंतर्मुख होत जाईल तसा त्याला स्वतःमधील भगवंताचा दैवी अनुभव येत जाईल. हा अथ लक्षात घेऊन संज्ञेचे विवरण होईल भगवंत सर्व नामरूपाचे ग्रहण करून (विलय करून) स्वतःस प्रकट करतात म्हणून ते 'आदिदेव' आहेत.
(४९) महादेवः :  - महान् देवता. परमात्मा सर्व चैतन्याचे उगमस्थान आहे. व त्याचेपासूनच सर्व देवता व प्राणीमात्र निर्माण झाले म्हणून त्यास 'महादेव' म्हणणेच योग्य आहे.
(४९) देवेशः :  - सर्व देवांचा स्वामी. देवांचाही आत्मा असलेला तो देवेश आहे. त्याचे श्रेष्ठत्व सिद्धच आहे म्हणून तो देवेश आहे.
(४९) देवभृतगुरूः :  - जो देवांचा अधिपती (देवभृत) आहे (इंद्र) व देवांचा गुरूही आहे असा. म्हणजेच तो देवांच्या अधिपतीचाही रक्षणकर्ता व उपदेशक, मार्गदर्शक आहे.
 डॉ. सौ. उषा गुणे.

No comments: